Saturday, 31 March 2018

हिलरी ह्यांचे षड्यंत्र भाग ७


Image result for glen simpson

ग्लेन सिम्पसन


फ्यूजन जीपीएस ह्या कंपनीची नेमणूक करून डेमोक्रॅटिक पक्षाने निवडणुकीत बाजी मारायचे ठरवले होते. ह्या कंपनीची नेमणूक थेट पक्षाने केली नव्हती तर पक्षाचे कायदेविषयक सल्लागार पर्किन्स कॉय ह्या फर्मने केली होती. विरोधकांची माहिती काढण्याचे काम ही फ्यूजनची ख्याती होती. डेमोक्रॅटिक पक्षाने फ्यूजनची निवड का केली असावी हे गुपित नव्हे. फ्यूजन जीपीएसचे संस्थापक ग्लेन सिम्पसन हे आपल्या पूर्वायुष्यात व्यवसायाने पत्रकार होते. सुरुवातीला रोल कॉल ह्या प्रकाशनामध्ये ते काम करत. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी काम करणार्‍या GOPAC ह्या संस्थेमधल्या भानगडी छापायचे काम रोल कॉल हे प्रकाशन करत असे. ह्याखेरीज ते इंटरनॅशनल असेसमेंट अँड स्ट्रॅटेजी सेंटर ह्या अमेरिकन थिंक टॅंकमध्ये सिम्पसन काम करत होता. अमेरिकेला भेडसावणार्‍या राष्ट्रीय सुरक्षेच्या समस्यांवरती ही संस्था काम करते. त्या पद्धतीची कामे त्यांना अमेरिकन सरकारकडून दिली जात होती. पुढे द वॉल स्ट्रीट जर्नल ह्या प्रतिष्ठित प्रकाशनामध्ये ते पत्रकार म्हणून २००९ पर्यंत काम करत होते. इथे काम करत असताना सिम्पसन नेहमीच सनसनाटी स्टोरी आणत आणि त्यांच्याकडे विश्वसनीय पुरावे नसतानाही ती प्रसिद्ध व्हावी असे ते प्रयत्न करत. डेमोक्रॅटस् आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांवरती रशियाचा प्रभाव कसा आहे हे शोधण्यात आणि ते चव्हाट्यावरती आणण्यात मला रस होता असे तो म्हणत असे. पण वॉल स्ट्रीट जर्नल मात्र ह्या प्रकाराला कंटाळले होते. शेवटी विरोधकांची बिंगे बाहेर काढण्यामध्ये तरबेज असलेल्या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्याचे सिम्पसन ह्यांनी ठरवले आणि त्यामध्ये आपल्या एका सहकार्‍याला सामिल करून घेतले होते. 

सिम्पसन ह्यांची पत्नी मेरी जॅकोबी देखील रोल कॉल प्रकाशनामध्ये पत्रकार म्हणून काम करत असे. तिचे वडिल जॉन जॅकोबी स्टीफन्स आर्कान्सास राज्यातील इनकॉर्पोरेशन कंपनीमध्ये अधिकारी पदावरती काम करत. ह्या कंपनीचे आणि क्लिंटन परिवाराचे इन्व्हेस्टमेंटसंबंधातील व्यवहारांवरती संशयाचे ढग आहेत. हिलरी क्लिंटन ह्यांची लॉ फर्म स्टीफन्स इनकॉर्पोरेशनचे काम बघत असे. आणि मेरी ह्या लॉ फर्ममध्ये काही काळ काम करत होती. स्टीफन्स कंपनीमध्ये जनरल वेस्ली क्लर्क निवृत्तीनंतर काम करत. मेरीने रोल कॉलमधील आपली नोकरी सोडून जनरल साहेबांची प्रेस सेक्रेटरी म्हणून काम स्वीकारले होते. पुढे मेरीचे वडिल ही कंपनी सोडून मॉन्संटॊ फर्ममध्ये प्रमुखपदावरती रुजू झाले. ह्या कंपनी तर्फे केल्या गेलेल्या जमीन खरेदी गैरव्यवहारामध्ये क्लिंटन कुटुंब अडकले आहे असे सांगितले जाते. थोडक्यात ग्लेन सिम्पसन क्लिंटन परिवाराचा निकटवर्ती होता हे उघड आहे. 

क्लिंटन यांचे प्रतिस्पर्धी डॉनल्ड ट्रम्प ह्यांची माहिती काढण्याचे कंत्राट सिम्पसनला मिळाले पण त्यासाठी ब्रिटनचा नागरिक असलेल्या ख्रिस्टोफर स्टीलची मदत घ्यावी असे त्याने कसे ठरवले असेल? स्टीलचा अनुभव तसाच वैशिष्ट्यपूर्ण होता. कॅंब्रिजमध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्याला ब्रिटनच्या MI6 ह्या गुप्तहेर संस्थेने आपल्या फॉरिन अंड कॉमनवेल्थ ऑफिसमध्ये सरळ भरती केले होते. नंतर त्याची नेमणूक रशियामध्ये करण्यात आली. त्यानंतर काही वर्षे पॅरिसमध्ये तर काही वर्षे अफगाणिस्तानच्या बागराम शहरामध्ये त्याने काढली. २००६ ते २००९ पर्यंत MI6 मध्ये रशिया डेस्कचा प्रमुख म्हणून तो काम बघत असे. २००६ मध्ये लिट्विनेन्को ह्यांना ब्रिटनच्या भूमीवरती पोलोनियम विष देऊन मारण्यात आले. त्या प्रकरणाच्या तपासाचा तो प्रमुख होता. मार्च २००९ मध्ये त्याने आपला सहकारी ख्रिस ब्राऊन्स सोबत ऑर्बिस बिझिनेस इंटेलिजन्स ही कंपनी त्याने सुरु केली. २०१४ ते २०१६ च्या दरम्यान ह्या कंपनीद्वारे रशिया आणि युक्रेन विषयावरती जवळजवळ १०० अहवाल तयार करण्यात आले होते. हे अहवाल अमेरिकेतील गुप्तचर संस्थांनी तपासले होते. ह्यामुळे स्टीलच्या रशियासंबंधी ज्ञानाबद्दल ह्या संस्था "आश्वस्त" होत्या. स्टील ह्यांनी पार पाडलेले आणखी एक महत्वाचे काम म्हणजे प्रॉजेक्ट शार्लीमॅन. युरोपियन युनियनच्या सर्वनाशासाठी रशियाने फ्रान्स इटाली जर्मनी तुर्कस्थान आणी ब्रिटनमध्ये चालवलेल्या "माहिती युद्धाच्या" तपासाचे काम. हा सर्व अनुभव बघता स्टीलकडे रशियासंदर्भात अगदी वैशिष्ट्यपूर्ण माहिती असणार हे दिसत होते. 

२०१८ ते २०२२ च्या दरम्यान इंटरनॅशनल फ़ेडरेशन ऑफ फ़ूटबॉल असोसिएशन  (FIFA) फीफा वर्ल्ड कप स्पर्धा ब्रिटनमध्ये भरवण्याचा निर्णय झाल्यानंतर ब्रिटनच्या फूटबॉल कमिटीने स्टीलला फीफाच्या चौकशीचे कंत्राट दिले. २०१५ मध्ये फीफामधील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एफबीआयची युरेशियन ऑर्गनाईज्ड क्राईम विषयक तुकडी स्टीलला भेटली. आणि ह्या कामामध्ये त्याची मदत त्यांनी घेतली. त्यानुसार स्टीलने रशियाचे उपपंतप्रधान इगोर सेशिन ह्यांनी २०१८चे फीफा कंत्राट देताना भ्रष्टाचार केल्याचा अहवाल एफबीआयला दिला होता. ह्याच कामासाठी त्याचा एफबीआय हॅंडलर रोम शहरामध्ये होता. ट्रम्प ह्यांचा विवाद्य व्हिडियो रशियाकडे असल्याचा अहवाल स्टीलने ह्याच हॅंडलरकडे रोममध्ये ५ जुलै रोजी सोपवला होता. 

ग्लेन सिम्पसन आणि ख्रिस्टोफर स्टील ह्यांची ही पार्श्वभूमी पाहता ही मंडळी एफबीआय तसेच सीआयएसाठी नवखी नव्हती तर त्यांच्या वर्तुळात आधीपासूनच सुपरिचित असावीत असे दिसते. ही बाब अशासाठी महत्वाची आहे की सिम्पसन आणि स्टील ह्यांनी जी पत्रकारीय स्टोरी रचली होती - "ट्रम्प गटाच्या मागणीवरून पुतिन ह्यांच्या रशियाने अमेरिकन निवडणुकीमध्ये ढवळाढवळ करून कोणत्याही परिस्थितीमध्ये हिलरी न जिंकता ट्रम्प जिंकतील अशा प्रकारे खोटी माहिती प्रसृत करून अमेरिकन लोकांची दिशाभूल करण्याचे षड् यंत्र रचले आहे" तिच्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहत नाही का? हीच स्टोरी प्रत्यक्षात मात्र उलटी असेल तर? ओबामा आणि हिलरी ह्यांच्या आग्रहावरून ट्रम्प ह्यांचा खोटा व्हिडियो असल्याचे नाटक करून त्यांना बदनाम करून ते रशियाशी हातमिळवणी करत असल्याचे आरोप तरखोटे नव्हते? सत्तेवरील ओबामा ह्यांच्या सीआयए व एफबीआय मधील पिट्ट्यांनी "उपयुक्त" इसमांपर्यंत हिलरींच्या प्रचारयंत्रणेला पोचवण्याचे काम तर केलेले नव्हते? की असे काही होते की MI6 आणि CIA ह्यांनी मिळून स्टीलला पुढे करून आपल्याकडे आधीच असलेली माहिती सत्यासत्याचे बेमालूम मिश्रण करून एफबीआयपर्यंत पोचवली जेणेकरून एफबीआयला वाटावे की ही माहिती खर्‍या सूत्रांकडून येत असून विश्वासार्ह आहे? 

हातमिळवणी आपण करायची आणि बोंबा मात्र ट्रम्प ह्यांच्या नावाने मारायच्या असे तर हे कारस्थान नव्हते? DNC ने तटस्थ राहून पक्षांतर्गत निवडणूक निःपक्षपातीपणे का होऊ दिली नाही? सॅण्डर्स ह्यांचा पराभव व्हावा म्हणून हिलरींच्या सोबत जाऊन प्रच्छन्नपणे नियम धाब्यावर बसवून कामे का केली? ह्या गैरप्रकाराबाबत हिलरी ह्यांना दुःख नाही. त्यांना आपल्या इमेल्स गुप्त ठेवण्याच्या अधिकारावरती आलेला घाला नको होता आणि तसे करणारा रशियाच्या मदतीने आपल्याला पाडू पाहत आहे असे त्या निर्लज्जपणे सांगत होत्या ना? 

इंडिया टूडे च्या कॉन्क्लेव्ह मध्ये तुमचे आणि पुतिन ह्यांचे काय वाकडे आहे असा प्रश्न विचारला गेला असता हिलरी म्हणाल्या की "मी पुतिन ह्यांना भेटले आहे. भेटीदरम्यान मला असे काही आढळले नाही. पण रशियामधील निवडणुकीच्या आधी आपण पुतिन ह्यांच्या विरोधात विधाने केली आणि त्यांना निवडून दिले जाऊ नये म्हणून जनतेला आवाहन केले. पण अमेरिकेच्या स्टेट सेक्रेटरी पदावरून मी हे केले आणि त्याचा राग पुतिन ह्यांनी धरला असावा". मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हे तर अमेरिकन हिताच्या दृष्टीने ते विधान केले होते असे हिलरी खरे सांगत आहेत. समजा असे गृहित धरले तरी रशियन निवडणुकीमध्ये अमेरिकेने केलेला हा हस्तक्षेप नव्हे का? त्याचे समर्थन करताकरता रशियाने तेच अमेरिकन निवडणुकीत केले तर त्याचा निषेध कसा करता येतो? इतक्या वर्षांचा इतिहास तपासला तर अमेरिका अन्य देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये नेहमीच ढवळाढवळ करत आलेली नाही का? मग ह्या चोराच्या उलट्या बोंबा नाही ठरत का? 

असो - आपल्यकडची माहिती लोकांसमोर आणण्यासाठी सिम्पसन आणि स्टील ह्यांनी काय उद्योग केले ते पुढील भागमध्ये पाहू.

(अपूर्ण)

No comments:

Post a Comment