१९९० च्या सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर जगामध्ये ’लिबरल्स’चे नवे पीक आले आहे. हे लिबरल्स स्वतःची एक इकोसिस्टीम तयार करतात. भारतामध्येही बोकाळलेले लिबरल्स आपल्याला पाहायला मिळतात. उदा. President, Vice-president, Loksabha speaker, CJI, CEC, CVC, CAG R&AW IB CBI ED DRI Chief आणि काही महत्वाचे आयोग ह्या मोजक्या जागांवरती जरी "आपली" माणसे पेरली तर ही इकोसिस्टीम पदसिद्ध राज्यकर्त्यालाही न जुमानता अशा गटांच्या हातामध्ये खेळू शकते हा आपला अनुभव आहे. आज काही दशकांच्या राजकारणानंतर अमेरिकेमध्येही हेच सत्य बघायला मिळते. मग त्यांचे विरोधक म्हणवणार्या पक्षातील काही घटक सुद्धा ह्या इकोसिस्टीमला शरण जातात आणि त्यांच्यात विलीन होतात - लोकांसमोर त्यांच्या हातामध्ये स्वतःच्या पक्षाचा झेंडा असला तरीही आतून मात्र ते एकमेकांना वाचवणार्या खेळी खेळत राहतात.
बेन गाझी प्रकरणापासून सुरु झालेला छुप्या ईमेलसचा सिलसिला जसजसा हिलरींना आणि खुद्द ओबामांना सतावणार असे स्पष्ट होऊ लागले तसतसे प्रकरण दडपण्याचा उद्योग सुरु झाला. मार्च २०१६ मध्ये CBS चॅनेल ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओबामा म्हणाले होते की हिलरी ईमेल्स साठी आपला खाजगी सर्व्हर वापरतात हे मला माहिती नव्हते. इतरांना जसे बातमीमधून कळले तसेच मलाही त्या बातमीमुळे हा प्रकार कळला होता असे ओबामा म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य ऐकताच हिलरीच्या आणि त्यांच्या समर्थकांची तारांबळ उडाली. ओबामा आताच जे TV वरती बोलले ते झाकायचा प्रयत्न करा असा संदेश सर्वत्र पोचवला गेला. कारण हिलरीची प्रचारयंत्रणा सांभाळणाऱ्या वरिष्ठांना हे नक्की माहिती होते की ओबामा हिलरींना स्वतः टोपण नावाने ईमेल पाठवत असत.
ओबामा अशी ग्वाही जाहीरपणे देत होते तर दुसरीकडे FBI ह्या प्रकरणाची चौकशी करतच होती. हिलरी ह्यांची स्वीय सचिव हुमा अबेदींन ह्यांना जेव्हा FBI ने पाचारण केले तेव्हा त्यांना ओबामा ह्यांनी हिलरींना पाठवलेल्या ईमेल्स दाखवण्यात आल्या. पण ह्या ईमेल्स हुमा ओळखू शकल्या नाहीत कारण त्या एका टोपण नावाने ओबामा ह्यांनी हिलरींना पाठवल्या होत्या. ह्याचाच अर्थ FBI आणि त्याचे प्रमुख कोमी दोघांनाही माहिती होते की ओबामाना हिलरी अशा प्रकारे खाजगी ईमेल्स सर्वर वापरतात इतकेच नव्हे तर खुद्द ओबामाच हिलरींना टोपण नावाने अशा ईमेल्स पाठवत होते. हिलरीं जेव्हा जेव्हा अमेरिकेबाहेर जात तेव्हा तेव्हा त्या खाजगी मेलचा वापर करीत. एकदा त्यांनी रशियामध्ये असताना ओबामांना ईमेल पाठवली आणि त्याचे उत्तरही आले होते असे निष्पन्न झाले. इतकी मोठी घोडचूक झाल्यानंतर रशियन तज्ज्ञांनी हिलरीच्या ईमेल्स हॅक केल्या नसत्या तरच नवल. कोमी ह्यांचे अंतर्मन त्यांना खात असावे असे मी लिहिले होते. ही पार्श्वभूमी माहिती असूनही आपल्याला झाकावी लागत आहे ह्याचे दुःख त्यांना असणार हे उघड आहे.
जिथे स्वतः विद्यमान अध्यक्ष ओबामा आणि डेमोक्रॅट पक्षाच्या अधिकृत उमेदवार हिलरी क्लिंटन अडकल्या होत्या त्या प्रकरणात त्यांना सोडवण्यासाठी लिबरल्सची कशी तारांबळ उडाली असेल बघा. कोमी ह्यांनी ५ जुलै रोजी वार्ताहर परिषद घेण्यापूर्वी साधारण आठ दहा दिवस आधी म्हणजे २७ जूनला एक घटना घडली. ठिकाण होते अरिझोना राज्य शहर फिनिक्स. अटॉर्नी जनरल लिंच आणि माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन एकाच वेळी एकाच विमानतळावरती होते. दोघांचीही विमाने तिथे पार्क करण्यात आली होती. क्लिंटन साहेब आपल्या विमानातून उतरून लिंच ह्यांच्या विमानात गेले. तिथे दोघांची जवळ जवळ अर्धा पाऊण तास चर्चा झाली. दोघांचेही सुरक्षारक्षक बुचकळ्यात पडले होते. कारण ही भेट ठरलेल्या कार्यक्रमात नव्हती. (एयरपोर्टच्या टार्मकवरती अशी भेट होउ शकते आणि दोघांनी एकाच वेळी तिथे असावे आणि दोघांनाही जवळपास पार्किंग मिळावे हा योगायोग असेल का? विश्वास ठेवणे कठीण आहे. आणि जरी ठेवला तरी आपल्या बाजूच्या विमानात कोण आहे हे पाहून उत्स्फूर्त भेट झाली असेही म्हणणे कठीणच नाही का?) बेन गाझी प्रकरण आणि त्यातील ईमेल्स हिलरींच्या अंगाशी येत होत्या. त्यावरती एके काळ अध्यक्ष असलेल्या बिल ह्यांनी विद्यमान अटॉर्नी जनरलची भेट घेऊन काय चर्चा केली असावी? संशयाचे ढग दाट होत होते. ही भेट सुद्धा गुप्त ठेवण्याची जबाबदारी एफबीआय वरतीच येऊन पडली. पण तरीही बातमी फुटलीच. टार्मकवरती उपस्थित असलेल्या एका सुरक्षा कर्मचाऱ्याने ही बातमी वर्तमानपत्रांना दिली आणि ती सर्वत्र पसरली. हिलरी ह्यांच्या ईमेल्स संदर्भात आमचे काहीच बोलणे झाले नाही असे बिल सांगू लागले. तर एफबीआयच्या आतील गोटामध्ये बातमी फोडणाऱ्या कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून "सरळ" करण्याच्या चर्चा सुरु झाल्या.
ह्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी बेन गाझी प्रकरणातील चौकशीमधील रिपब्लिकन हाऊसमननी आपला अहवाल २८ जून रोजी प्रकाशित केला. त्यामध्ये अध्यक्ष ओबामा, हिलरी क्लिंटन, सीआय ए आणि संरक्षण खात्यावरती अमेरिकन उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना वाचवण्यात अपयशी ठरले असा ठपका ठेवण्यात आला होता. बेन गाझी ईमेल्स विवादाला "तपास" असे न म्हणता "प्रकरण" म्हणावे अशी सूचना लिंच ह्यांनी केली होती. आता आपल्या निवेदनामध्ये कोमी ह्यांनी नेमके काय म्हणावे - कोणते शब्द वापरावेत ह्यावर काथ्याकूट सुरु झाला. "हिलरी क्लिंटन आपल्या खाजगी ईमेल सर्व्हरचा वापर अमेरिकेत व खास करून देशाबाहेर असताना - म्हणजे शत्रू देशातून सुद्धा - करत. ह्यामध्ये त्यांच्या व अध्यक्ष ओबामा ह्यांच्यातील ईमेल व्यवहार देखील अंतर्भूत आहे" असे मूळ निवेदन होते. पण ते बदलून अध्यक्षांचा संदर्भ गाळण्यात आला. कोमी ह्यांनी प्रसृत करायचा मसुदा अशाप्रकारे पक्का झाल्यानंतर १ जुलै रोजी लॉरेटा लिंच ह्यांनी आपले निवेदन प्रसृत करून एफबीआय प्रमुख ह्या प्रकरणात जी भूमिका घेतील ती मला मान्य आहे असे सोळभोकपणे बिनदिक्कत सांगितले. २७ जून रोजी झालेली क्लिंटन - लिंच भेट - तिला मिळालेली प्रसिद्धी आणि २८ जून रोजी रिपब्लिकनांनी प्रसिद्ध केलेला अहवाल ह्यामुळे तप्त झालेल्या वातावरणामध्ये लिंच ह्यांचे सारवासारव करणारे वक्तव्य प्रसिद्ध झाले होते. लिंच ह्यांच्या वक्तव्यानंतर लीझा पेज आणि पीटर स्ट्रेझॉक ह्यांच्यामध्येही मल्लिनाथी झाली. एवीतेवी आरोप दाखल करायचे नाहीच आहेत हे लिंच ह्यांना माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी निर्धास्तपणे आपले निवेदन दिले आहे असे मत पेज – स्ट्रेझॉक जोडी व्यक्त करत होती.
इतकी तजवीज झाल्यानंतर २ जुलै रोजी हिलरी बाईसाहेब प्रथमच एफबीआय टीमसमोर प्रश्नोत्तरासाठी बसल्या. आपल्यावरती आरोप दाखल होतील अशी जरा जरी शंका असती तरी त्यांनी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळले असते. हिलरींच्या बरोबर त्यांच्या बाजूने दोन वकिलांना बसण्याची अनुमतीही देण्यात आली होती. आरोप ठेवायचा निर्णय झालेला असत तर वकिलांना बसण्याची परवानगी मिळाली नसती. ह्याच चौकशीमध्ये एफबीआयने हिलरींना C अक्षर असलेल्या ईमेल्स दाखवून ह्या गोपनीय परिच्छेदांचा समावेश ईमेल मध्ये का केलात असे विचारले होते.
एकूणच घटना कोमी प्रवाहापतिताप्रमाणे निर्णय जाहीर करणार ते दर्शवत होत्या. अपेक्षेप्रमाणे ५ जुलै रोजी कोमी ह्यांचे "हलगर्जीपणा - आणि आरोप ना ठेवण्याचे" निवेदन आले. क्लिंटन गट जितकी लपवाछपवी करू पाहत होता त्यामुळे मामला अधिक गंभीर होता चालला होता. कारण प्रतिस्पर्धी गटही त्यांच्या चुकांवरती नजर ठेवून होता. ट्रम्प ह्यांच्या प्रतिस्पर्धी गटात सगळेच होते - डेमोक्रॅट्स आणि काही रिपब्लिकन! स्वतःच्या पक्षाने अंतर्गत निवडणुकीत निवडून दिलेल्या ट्रम्प ह्यांच्यापेक्षा त्यांना कारस्थानी हिलरी जवळची वाटत होती. ट्रम्प हा लोकशाहीवरचा सर्वात मोठा घाला आहे असे त्यांचे ठाम मत होते. हिलरींच्या इमेल्सची भानगड वाढतच चालली असताना ट्रम्प ह्यांना आवर घालायचा तर ते कसे देशद्रोही शक्तींबरोबर हातमिळवणी करतात हे जनतेसमोर आणायचा घाट घातला जात होता. अमेरिकेमध्ये एफबीआय ही स्वायत्त संस्था मानली जाते. तिच्या कामामध्ये अध्यक्षाने ढवळाढवळ करू नये असे संकेत आहेत. पण हे अध्यक्षपद कोमी ह्यांच्याकडे होते. आणि "आपल्याला" पाहिजे तसे कोमी वळतीलच ह्याची इकोसिस्टीमला खात्री नव्हती. म्हणून एकीकडे हिलरी-इमेल्स प्रकरणाची चौकशी करण्यासाठी "आपली" माणसे आहेत ह्याची खात्री पटल्यानंतर पुढच्या कारवायांना प्रारंभ झाला. आता ह्या राजकीय पार्श्वभूमीवरती सीआयए कार्यरत झाली असे संकेत मिळतात. सीआयएचे प्रमुख ब्रेनान अध्यक्षांच्या आशिर्वादाने पुढाकार घेताना दिसू लागले.
No comments:
Post a Comment