सोबत दिलेले छायाचित्र बघून कोणाच्याही पोटात गोळा येईल. कोरियन सैनिकांनी किम जॉन्ग उनला दोन्ही हाताला पकडले आहे - त्याला कोरियन पीपल्स आर्मीच्या लार्ज कंबाईन्ड युनिट नंबर ७६१ ह्या मुख्यालयात आणण्यात आले आहे आणि ते सैनिक त्याला काहीतरी दाखवायला नेत आहेत अथवा काही तरी दाखवून त्याला परत नेले जात आहे असे फोटोमध्ये दिसत आहे. हा फोटो एखाद्या सत्ताधीशाचा नक्कीच नाही. हा तर एखाद्या अपहरण करून ताब्यात असलेल्या कैद्याचा - सावजाचा फोटो वाटतो. त्याच्या चेहर्यावरचे भाव स्पष्ट आहेत. त्याला कोणती दृश्ये बघायची सक्ती करण्यात आली होती? त्य पारदर्शक चेहर्यावरती तो कोणाला तरी प्रचंड घाबरल्याची बाब लपून राहत नाही. उन कोणाच्या तरी तावडीत आहे. स्वतंत्ररीत्या निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे असे अजिबात दिसत नाही.
केवळ उन नव्हे तर त्याचे सगळे कुटुंबच दहशतीच्या छायेत जगत असावे. गतवर्षी याच्या भावाला मलेशियामध्ये ठार मारण्यात आले. उनचे वडिल किम जॉन्ग इल ह्यांनी खरे तर उनच्या त्या भावाला आपला वारस म्हणून नेमल्याचे संकेत दिले होते. १९९९ मध्ये जोन्ग इलने त्याला कोरियाच्या अंतर्गत सुरक्षा विभागामध्ये कामाला सुरुवात कर असे सांगितले होते ह्या विभागाकडे कोरियाचे गुप्तहेर खाते देखील आहे. ह्या निर्णयापूर्वी जोन्ग इलचे वैयक्तिक सुरक्षेतील जवान आणि कोरियन सैनिक ह्यांच्यामध्ये चकमकी झाल्याच्या बातम्या होत्या. ह्यानंतर आपला खून हो ऊ शकतो हे गृहित धरून राज्याला वारस असावा ह्या हेतूने जोन्ग इलने किम जोन्ग नाम ह्या उनच्या भावाला सत्तेमध्ये आणले असावे. कोरियामधली नेमकी परिस्थिती काय आहे ह्याची पूर्ण कल्पना ह्या भावाला असावी. उनच्या विरोधी शक्तींनी नामला गतवर्षी परदेशात ठार तर मारलेच पण वरती असे आदेश उनने दिले असल्याचा आभास तयार केला. त्याच्या काकांना अटक झाली. इतकेच नव्हे तर त्यांना तीन दिवस मुद्दाम उपाशी ठेवलेल्या १२० कुत्र्यांच्या तोंडी देण्यात आले. त्या जीवंत माणसाचा फडशा कुत्र्यांनी अवघ्या एक तासात उडवला. सोबतच्या फोटोमधले उनच्या चेहर्यावरचे प्रचंड घबराटीचे भाव काकाचे मरण सक्तीने बघायला लावल्यामुळे तर उठलेले नाहीत? कोणाच्या ताब्यात आहे उन? जर ह्या शक्तींचा एव्हढा ताबा आहे त्याच्यावरती तर मग असा हा फोटो त्यांनी बाहेर येऊच कसा दिला असेल् बरे? हा फोटो प्रसिद्ध करण्यामागे काय हेतू असावा? कोणी बंड करण्याच्या मनःस्थितीत असेलच तर तुमची काय अवस्था होऊ शकते हे उदाहरण डोळ्यासमोर दाखवण्यात आले आहे. हा इशारा केवळ बंडाला उद्युक्त हो ऊ शकणार्या शक्तींना नसून किम घराण्यातील प्रत्येक व्यक्तीला देण्यात आला आहे. इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जर किम जॉन्ग उन परिषदेला आला असेल आणि तेही एयर चायनाच्या विमानामधून तर त्याला चीनने मारूनमुटकून परिषदेला पाठवण्यात आले असावे असे दिसते. ह्याचे अनुमान काय असू शकते? की चीनने कोरियन सरकारच्या प्रत्येक विभागावरती आपले नियंत्रण ठेवले असून उनच्या हाती फारसे काही उरलेले दिसत नाही?
परिषदेनंतर डॉनल्ड ट्रम्प भाषण करत असताना चाचरलेला जोन्ग उन अधिकच केविलवाणा दिसतो. (इच्छुकांनी व्हिडियो पुन्हा बघावा). प्रत्यक्ष करारावरती सह्या झाल्या तेव्हा दोन पेन्स ठेवण्यात आली होती. दोन्हीवरती "डॉनल्ड ट्रम्प" असे नाव कोरलेले दिसते. पण सही करण्याच्या क्षणी उन बरोबर घाईघाईत तिथे पोचलेल्या त्याच्या बहिणीने आपल्या खिशामधून एक पेन काढून त्याच्या हातामध्ये खुपसले आणि सही होताच ते परत काढून स्वतःच्या खिशात टाकले. ही दृश्ये विचार करायला लावणारी आहेत. मागे लिहिल्याप्रमाणे कोरियाचा पेच सोडवण्यासाठी ज्या दोन महिलांनी पुढाकार घेतला त्यामधली एक आहे ती उनची ही बहिण. असे दिसते की ती त्याच्या सोबत छायेसारखी राहते. परिषदेनंतर ज्या करारावरती सह्या झाल्या त्यापेक्षाही प्रसिद्धीला देण्यात आलेले संयुक्त निवेदन अधिक बोलके आहे. यात म्हटले आहे की "President Trump committed to provide security guarantees to the DPRK and Chairman Kim Jong Un reaffirmed his firm and unwavering commitment to complete denuclearisation of the Korean Peninsula,' said a joint statement issued after their historic summit in Singapore." म्हणजेच उत्तर कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत आणि त्याबदल्यात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारली आहे. आजपर्यंत कोरिया सांगत होता की स्वसंरक्षणासाठी आम्हाला अण्वस्त्रांची गरज आहे. तेव्हा संरक्षणाची हमी आम्ही देतो - तुम्हाला हवे तर ह्यावरती करारही करू असे ट्रम्प ह्यांनी सांगितले आहे.
तेव्हा उत्तर कोरियाच्या निमित्ताने चीन काय खेळ करत होता हे लक्षात येते. आधी कोरियाला शस्त्र म्हणून वापरत - बघा तो हल्ला करेल तुमच्यावरती म्हणून धमक्या द्यायच्या आणि मग कोरिया तर फक्त आमचेच ऐकतो तेव्हा आम्हाला प्रसन्न करा तर कोरिया तुमच्यावर हल्ल करणार नाही ह्याची खात्री बाळगता ये ईल. हाच युक्तिवाद त्यांनी पाकला धरून केला तर नवल वाटायला नको. फरक एव्हढाच आहे की कोरिया इतका पाकिस्तान जगापासून अलिप्त नव्हता. आणि वर्षनुवर्षे अमेरिकेची सूत्रे पाकिस्तानमध्ये आपला वचक ठेवून आहेत. अमेरिकेचा प्रभाव संपवण्यासाठीच तर चीनला ओबोर सारख्या योजना आणून पाकिस्तानचे सार्वभौमत्व स्वतःच्या हाती घ्यायचे आहे.
परिषदेनंतर अमेरिका जर कोरियाला - पर्यायाने प्रथम किम जोन्ग उनला आणि त्याच्या कुटुंबाला वैयक्तिकरीत्या - संरक्षण पुरवणार असेल तर अमेरिकेला त्या व्यवस्थेमध्ये चंचुप्रवेश मिळाला आहे असे म्हणता ये ईल. म्हणजे खरी परिस्थिती अशी उद् भवणार आहे की ज्या अधिकार्यांशी अमेरिकेला व्यवहार करायचे आहेत त्यांचे खरे बॉस बीजींगमध्ये बसले आहेत. म्हणजेच अशा तर्हेने अमेरिका कोरियामध्ये बसू लागली की वस्तुस्थिती काय आहे आणि कोणत्या क्षेत्रात - कुठपर्यंत चीनचे नियंत्रण कोरियावर आहे ह्याची नेमकी माहिती मिळायला सुरुवात होईल. (आजपर्यंत कोरियाबद्दलची बव्हंशी - तुटपुंजी - माहिती फुटीर अधिकारी अथवा तिथे वकिलाती असलेल्या देशांच्या सूत्रांकडून मिळत होती.) असे झाले तरच चीनचा दुटप्पीपणा जगासमोर येऊ शकेल. आजपर्यंत म्हणजे सत्तेमध्ये आल्यानंतर २०१७ पासून डॉनल्ड ट्रम्प ह्यांनी कोरियाला वेसण घालण्यास मदत करा म्हणून चीनला संदेश दिला होता पण आमचे संबंढ तर खूप जुने झाले आता आमच्या हाती तिथे काही उरले नाही आमची सूत्रे सुद्धा आता तिथे नाहीत असे चीन दडपून खोटे सांगत नव्हता काय? कोरियाच्या मुद्द्यावरती सहकार्य हा कळीचा मुद्दा बनवल्यामुळे ट्रम्प ह्यांनी दोन फळे खिशात टाकली आहेत. एक म्हणजे चीनचे खरे स्वरूप जगासमोर आणणे - चीन थापा मारत होता हे सिद्ध करणे. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. ट्रम्प ह्यांची प्रतिमा त्यांच्या विरोधकांनी बकबक करणारा - आढ्यताखोरी करणारा - कोणत्याही विषयात गम्य नसल्यामुळे अमेरिकन हित विहिरीत ढकलून देणारा आचरट अध्यक्ष अशी केली होती. पण करार होण्याला झुकते माप देऊन अमेरिकेचे महत्वाचे मुद्दे मागे ठेवून देखील ट्रम्प ह्यांनी लवचिकता दाखवली आहे. कोरियाची अण्वस्त्रे हा सामान्य अमेरिकनाच्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. ट्रम्प ह्यांना मिळालेले यश आता जनतेपासून लपून राहणार नाही. पण चीनला वेसण घालणे हेच मुळी जिथे त्यांच्या विरोधकांना पसंत नाही त्यांच्याविषयी काय बोलावे?
ट्रम्प ह्यांनी प्रचंड संयमाने घडवून आणलेला हा करार पुढे उत्तर व दक्षिण कोरियाच्या विलीनीकरणाने अधिक प्रबळ हो्ईल. विलीनीकरण हे एक मोठे अस्त्र अमेरिकेने बाहेर काढले आहे. दोन देशामधली भांडणे आणि एकाचे नियंत्रण आपल्या हाती अशी पाचों उंगलियां घी में अशी यापूर्वीची चीनची सामर्थ्यवान स्थिती आहे. अमेरिकेने योग्य पावले टाकली तर ती आता हळूहळू ढसळत जाऊ शकते. दुसरीकडे उन आपल्या हाती नाही अशी जाणीव झालीच तर चीन त्याचाही खेळ संपुष्टात आणू शकतो. उन जीवंत राहणे ही अमेरिकन धोरणाची गुरुकिल्ली आहे. ह्या अवस्थेत उन ह्यांना मृत्यू आला तर संशयाची सुई कुठे जाईल हे उघड आहे.
हेच जर का परिस्थितीचे आकलन असेल तर मुळात चीनने गोष्टी इथपर्यंत पोचूच कशा दिल्या हा प्रश्न नाही का पडत? खरे आहे. ह्याचाच अर्थ निदान काही गोष्टी कोरियामध्ये अशा बदलल्या आहेत की चीनला आपल्या भूमिकेचा फेरविचार करणे भाग पडले आहे. ही गोष्ट सोपी नाही. आपली भूमिका चीन सहजासहजी सोडत नाही. आणि आता जर त्यामध्ये दोन पावले जरी मागे येणे भाग पडले असेल तर कोरियामधली आतली परिस्थिती थोडीतरी बदलली आहे असे वाटते. इतकेच नव्हे तर किम जोन्ग उनला अथवा त्याच्या बहिणीला विश्वासात घेऊन आणि त्यांच्या जिवाची हमी देऊन त्यांचे सहकार्य मिळवण्यात आले आहे असे दिसते. परिषदेमध्ये डॉनल्ड ट्रम्प वडिलकीच्या भूमिकेत वावरताना दिसत होते. आपल्या वागण्याबोलण्यातून उनला धीर देताना दिसत होते. ह्या दृष्टीने विचार करताना परिषदेमध्ये नोंदलेल्या काही गोष्टी उद् ध्रूत करते. ट्रम्प ह्यांच्या किमान सात मिनिटे आधी उन तिथे पोचला. आशियामध्ये वडिलकीला मान देण्याची ही पद्धत आहे. कोरियन लोक परक्या व्यक्तीला कशी स्पर्श करत नाहीत आणि आपल्यापेक्षा वडिल माणसालाही नाही. पण हस्तांदोलन वगळता किम जोन्ग उन किती सहजपणे ट्रम्प ह्यांच्या हाताला धरून काही क्षण चालला हे विशेष आहे - ह्याचा अर्थ असा की ट्रम्प ह्यांना असा स्पर्श करण्याची आपल्याला "परवानगी" आहे हे त्याने गृहित धरले आहे. कोरियन संकेतांनुसार तो ट्रम्प ह्यांना आपला जवळचा दोस्त मानतो असे त्याने दाखवले आहे. परिषदेदरम्यान उन किमान दहा वेळातरी म्हणाला की भूतकाळ विसरून आम्ही एकत्र येत आहोत. प्रत्यक्षात त्याने वापरलेल्या कोरियन शब्दाचा अर्थ असा आहे की आमचा (मतभेद आणि) भूतकाळ आम्ही "गाडून" टाकला आहे. "गाडून टाकणे" हा "विसरून जाणे" ह्यापेक्षा अधिक जोरकस अर्थाचा शब्दप्रयोग आहे. केवळ उन नव्हे तर त्याच्यासोबत आलेले जनरल किम जोन्ग चोल व अन्य सहकारी देखील ट्रम्प ह्यांच्या सान्निध्यात थोडे मोकळेढाकळे वागत होते. आम्ही त्यांना भेटलो तर चालेल का असे चोल ह्यांनी विचारताच ट्रम्प ह्यांनी होकार देत सर्व कोरियनांशी हस्तांदोलन केले - अगदी किमच्या बॉडीगार्डस् बरोबर सुद्धा. मग टम्प ह्यांच्या सहकार्यांशीही हस्तांदोलनाची फेरी झाली. चोल ह्यांचा हसरा फोटो मिळत नाही. २००६ नंतर पहिल्यांदा ते ट्रम्प ह्यांच्या संगतीमध्ये हसताना दिसले. कोरियन सहकार्यांवरचे मणामणाचे ओझे उतरल्यासारखे ते वागत होते. चिनी लोक त्यांना गुलामासारखे - आपल्यापेक्षा त्यांची पातळी खाली असल्याचे दाखवत हीन वागणूक देतात. ट्रम्प ह्यांनी त्यांना समानतेच्या पातळीवरून वागवले - हा सन्मान त्यांना कित्येक दशकानंतर मिळाला असावा.
परिषदेचा परिणाम म्हणून कोरियाने आपली अण्वस्त्रे नष्ट करावीत असे जगासमोर सांगितले गेले आणि ह्याला चीनचा विरोध आहे असे भासत असले तरी चीन व रशिया दोघांनाही आज कोरियाकडची अण्वस्त्रे नकोच आहेत. कोरिया ही बाजारपेठ म्हणून खुली करण्याचा निर्णय उनने आता घ्यावा अशी "अलिखित" अपेक्षा आहे. आणि ही बाब सर्वांनाच हवीशी आहे. अण्वस्त्रे नष्ट केल्यानंतरच निर्बंध उठणार आहेत. करारामध्ये अण्वस्त्रे नष्ट झाली का हे पडताळून पाहण्याविषयी उल्लेख नसला तरी अमेरिकेला प्रत्यक्षात तसे करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. म्हणून अण्वस्त्रांखेरीज मुक्त अर्थव्यवस्थेची सुरूवात आणि दोन्ही कोरियांचे विलीनीकरण हा खरा कार्यक्रम असावा. (आपण रशियासोबत उत्तर कोरियामध्ये काही प्रकल्प करू इच्छितो असे चीनने आधीच जाहीर केले आहे)
परिषदेमध्ये ट्रम्प ह्यांनी आणखी एका महत्वाच्या विषयाला हात घातला आहे तो म्हणजे "मानवाधिकार". हे एक अतिमहत्वाचे शस्त्र आहे. मानवाधिकाराचे शस्त्र जर कोरियामध्ये बाहेर आले तर चीनच्या सगळ्या पिट्ट्यांना सत्तेमधून डच्चू देता येईल इतके भयानक गुन्हे ह्या मंडळींनी एकहाती सत्ता वापरत गेली कित्येक वर्षे केले आहेत.
परिस्थितीमधला हा बदल घडवून आणण्याची ताकद खरे तर होतीच पण तसा निश्चय करणारा नेता लागतो आणि आपण तसा नेता आहोत हे मध्य पूर्व भारत सिंगापूर म्यानमार थायलंड जपान लाओस कंबोडिया व्हिएतनाम फिलिपाईन्स आदिंना सोबत घेऊन त्यांनी करून दाखवले आहे. काही दशकांच्या जाचामधून आपली सुटका होत असल्याची भावना मनात घेऊन कोरियन शिष्टमंडळ परत गेले आहे. इथून पुढच्या हालचाली हे भविष्य घडवतील का ह्याचे उत्तर काळच देणार आहे. हे अवघड काम करून दाखवणारे ट्रम्प मनात आणलेच तर इराण पाकिस्तान सिरिया ह्यांना ही शेंडीला धरून बदल घडवून आणू शकतात - ही त्यांची ताकद आता नाकारता येत नाही. जसे उत्तर व दक्षिण कोरिया एकत्र आले तसे भारत पाकिस्तान एकत्र येऊ शकतात का ह्यावर निदान विचार करण्याला कोणी घातले आहे बंधन?
Simply fantastic
ReplyDeleteSuperb, thank you.
ReplyDeleteवेगळाच दृष्टिकोन. हा विचार आजपर्यंत कोणी मांडला नव्हता. मागच्या लेखानंतर माझ्या मनात प्रश्न आला होता की ह्या सगळ्या प्रकरणात भारताची भूमिका काय? त्याचं उत्तर आजआज मिळालं.
ReplyDeleteसर्वाना धन्यवाद
ReplyDelete