ऑक्टोबर १९४९ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट सत्ता स्थापन झाल्यानंतर ह्या राजवटीकडून अमेरिकेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा एक उपाय होता कोरियामध्ये युद्ध छेडण्याचा. त्याचे काही फायदे होते. एक तर आपल्या दृष्टीने कोरिया महत्वाचा नाही असे अमेरिकेने जहीर केले होते. त्यामुळे अमेरिकन सैन्य कोरियामध्ये नव्हते - ते जपानमध्ये होते. दुसरे म्हणजे किम इल सॉन्गची आक्रमण करण्याची तयारी पूर्ण झाली होती. दक्षिण कोरियामध्ये रशियाधार्जिणे गट सर्व स्तरावरती कार्यान्वित झालेले होते. मॉस्कोचा अंदाज होता की मुसंडी मारून सॉन्गचे सैन्य आत घुसले की त्याला अडवणारे कोणी नव्हते. अगदी तसेच घडले. पहिला हल्ला झाल्यापासून जपानमधून मदतीला सैन्य पोचायच्या आतमध्ये उत्तर कोरियन सैन्याने दमदार आक्रमण करत दक्षिण कोरियाची राजधानी सोल शहर जिंकून घेतले. सॉन्गच्या सैन्याच्या मदतीला गावागावामधले रशियाधार्जिणे गट युद्धात उतरले होते. हे गट दळणवळणाची साधने उद् ध्वस्त करून तसेच वाहतुकीचे रस्ते अडवून उत्तर कोरियाच्या सैन्याला मदत करत असत. दक्षिण कोरियाकडे युद्ध लढण्यासाठी पुरेशी माणसेही नव्हती. त्यामुळे अमेरिकन सैनिकांना मैदानात उतरावे लागले. ऑक्टोबर १९५० पर्यंत अमेरिकेने बाजी पलटवली आणि उत्तर कोरियामध्ये चांगलीच मुसंडी मारली होती. इथे मॉस्कोच्या सांगण्यावरून माओने तीन लाख सैनिक कोरियामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेला समजणार नाही अशा तर्हेने लपत छपत यलु नदी पार करून हे सैन्य उत्तर कोरियामध्ये पोचले. दोन महिन्यात ह्या सैन्याने अमेरिकनांना मागे रेटले आणि सोल शहर पुन्हा जिंकून घेतले. यासाठी केवळ चीन नव्हे तर रशियालाही आपले सामर्थ्य युद्धात उतरवावे लागले. काही ठिकाणी विमाने चीनची तर वैमानिक रशियन असेही होत होते. दक्षिण कोरियामधील कम्युनिस्ट युनिटस् नी आपले मुक्तीदाते म्हणून स्वागत केले. यानंतर अमेरिकेनेही आपली ताकत लावत एप्रिल १९५१ पर्यंत पुन्हा एकदा उत्तरेकडे कूच करत ३८ वी अक्षांश रेषा गाठली. २७ जुलै १९५३ रोजी युद्धबंदीवरती सह्या होईपर्यंत ही परिस्थिती फारशी बदलली नाही. कोरियाच्या दोन तुकड्यांमध्ये झालेली ही युद्धबंदी आजवर तशीच राहिली होती. दरम्यानच्या काळामध्ये कोरियाच्या राजकारणामध्ये अनेक उलाढाली झाल्या. रशियन फौजांनी सिग्नल इंटेलिजन्स सारखे तंत्रज्ञान वापरून आपण अमेरिकेच्या पुढे आहोत हे सिद्ध केले. तसेच रशियाने जे हेर पाश्चात्य गुप्तहेर संस्थांमध्ये पेरले होते (किम फिल्बी, ब्लेक आदि) त्यांनी पाश्चात्य जगताच्या अनेक डावपेचांची माहिती मॉस्कोला पुरवली होती असे पुढे उघडकीला आले.
ज्या युद्धाने कोरियाचे दोन तुकडे केले त्या क्षणापर्यंतचा इतिहास बघितला - आता उत्तर कोरियाने आपली शस्त्रसज्जता कशी मिळवली - खास करून अण्वस्त्रे कशी मिळवली ह्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ. इतिहासकाळापासून अलिप्त राहण्याची आणि जगापासून संपर्क तोडूनही जीवन जगण्याची कोरियाला सवय आहे. आपण आतापर्यंत पाहिले की - काही शतकापासून चालत आलेले - सर्वसामान्य घरातले देखील - साक्षरतेचे उच्च प्रमाण - जपानी आधिपत्याखाली मिळालेले तंत्रज्ञानाचे शिक्षण - महायुद्धकाळापासून कारखानदारी चालवण्याचा अनुभव - जपान्यांसाठी बनवलेला माल आशिया युरोपपर्यंत पाठवण्यासाठी लागणारे लॉजिस्टिक्स पद्धतीचे ज्ञान - अनेक शतके मंगोलियन चिनी रशियन आणि जपानी प्रभाव पचवूनही आपली संस्कृती आणि वैशिष्ट्ये जपण्याची महत्वाकांक्षा अशा राजकीय सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवरती गुप्ततेच्या पडद्या आड राहून उत्तर कोरियाने तंत्रज्ञानात्मक प्रगती साधली तिचे फलित म्हणून आज अमेरिका देखील त्यांच्या आक्रमणाचा धोका ओळखून ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहे. आज तिसर्या जगामधली चौथ्या नंबरचे सैन्य - रासायनिक अस्त्रास्त्रे आणि जैविक अस्त्रास्त्रे हाताळणारी तिसर्या जगातील तीन नंबरची सेना - ह्या घातक अस्त्रास्त्रांचा प्रचंड साठा - आण्विक अस्त्रे - बॅलिस्टिक मिसाईल्स - न्यूक्लियर जैविक रासायनिक अस्त्रांचा मारा करणारी क्षेपणास्त्रे - एव्हढा पसारा नेमका कधी उभारला गेला - त्याविषयी जगाकडे नेमकी किती माहिती होती - असा शस्त्रसाठा उभा करण्यापासून उत्तर कोरियाला थांबवण्याची क्षमता असेलच तर कोणाकडे आणि तसे प्रयत्न तरी झाले का असे मुद्दे उपस्थित होतात. किम इल सॉन्गने एक ज्योत प्रत्येक कोरियनाच्या हृदयामध्ये पेटवली होती - आपण अजिंक्य आहोत - युद्ध झाले तर ते आपण जिंकणार ह्यात काहीही संदेह त्यांच्या मनामध्ये नव्हता आणि आजही नाही. हे ध्येय गाठण्यासाठी प्राणाचे बलिदान द्यावे लागले तरी बेहत्तर अशा भावनेवरती कोरियनांच्या काही पिढ्या पोसल्या गेल्या आहेत. असे करणे ही त्यांच्या जगण्यासाठी बनलेली एक गौरवाची बाब आहे. त्याचा यथार्थ अभिमान कोरियनांच्या घराघरातून निर्माण करण्यात आला आहे. आपण अजिंक्य आहोत - असायला हवे ही भावना येते ती त्या देशाच्या लाल तत्वज्ञानाच्या बांधिलकीमधून. आपले तत्वज्ञान सर्व जगापर्यंत (किमान दक्षिण कोरियापर्यंत) पोचवून तिथे कम्युनिस्ट राजवट स्थापन करण्याची "नैतिक" जबाबदारी ह्या बांधिलकीमधून निर्माण झाली होती. जसजसे वर्षे जात राहिली तसतसे दक्षिण कोरियाच्या तुलनेमध्ये आपण मागे तर नाही ना पडणार - (पर्यायाने युद्ध झाले तर हरणार तर नाही ना) ह्या भावनेमधून हा देश आधुनिक तंत्रज्ञानाच्या शोधामध्ये राहिला आहे. एका बाजूला लष्करी प्रशिक्षण घेतलेली आणि प्रसंगी गनिमी युद्ध करू शकेल अशी बहुसंख्य प्रजा - तिच्या हाती त्या पद्धतीची शस्त्रास्त्रे वेळ येईल तेव्हा सोपवण्याची तयारी - आणि त्यासोबत प्रोफेशनल सैन्य हा युद्धसज्जतेचा मार्ग निवडण्यात आला होता. उत्तर कोरियाचा पराभव म्हणजे सोव्हिएत रशियाचा पराभव असे जे चित्र उभे झाले होते त्याचा फायदा घेत कोरियाने आपल्या बजेटचा मोठा हिस्सा लष्करासाठी खर्च करण्याचे ठरवले होते. चीन तसेच रशियाने सुद्धा वेळोवेळी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे तिथे पाठवली.
आण्विक शस्त्रास्त्रे उभारणीच्या योजनेचे प्रमुख पद किम इल सॉन्गने आपल्या मुलाकडे - किम जॉन्ग इल कडे सोपवले होते. त्यातूनच अशी अस्त्रास्त्रे आपल्याकडे असावीत हे किती प्रकर्षाने त्याला पटले होते ते दिसते. सैन्याच्या प्रशिक्षणामध्ये आण्विक शस्त्रास्त्रे वापरून आक्रमण नीती असा विषय वरिष्ठ अधिकार्यांना शिकवला जात होता. १९८० पासून कोरियाने प्रयत्न सुरु केले त्यानंतर त्यांनी चिनी वा रशियन नव्हे तर सर्व कठिण कसोट्या पार केलेले अमेरिकन व युरोपीय नमुन्याचे अणुकेंद्र उभारले होते. तसेच त्यासाठी लागणारा कच्चा माल असेच तंत्रज्ञान दोन्हीमध्ये आपण स्वयंपूर्ण असल्याचे लक्ष्य कोरियाने ठरवले होते. पहिल्यापासून कोरियाने भूमिगत केंद्राची योजना आखली होती. अशी केंद्रे बांधायला कठिण असतात पण कोरियाला आपल्या तंत्रज्ञानाबाबत योग्य आत्मविश्वास होता असे दिसते. याशिवाय त्यांच्या तंत्रज्ञांना जर्मन तंत्रज्ञानाची तोंडओळख लिबिया - सिरिया आणि इराण द्वारा देण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी स्टक्सनेट नामक व्हायरस वापरून इराणच्या अणूकेंद्रातील यंत्रे निकामी कशी करण्यात आली ह्याची कथा आपण वाचली असेल. हा व्हायरस सीमेन्स ह्या जर्मन कंपनीच्या सर्व्हरवरील ऑपरेटींग सिस्टीमसाठी खास तयार करण्यात आला असावा असा अंदाज होता. ह्याचाच अर्थ इराणमधील अणुकार्यक्रमामध्ये जर्मन तंत्रज्ञान वापरले गेले असावे ह्या तर्काला पुष्टी मिळते. तसेच लिबियामध्येही हेच तंत्रज्ञान वापरले गेल्याचे पुढे आले होते. सिरियामध्ये बशर अल असद इस्राएल व अमेरिकेला का नको आहे ह्याची पुसट कल्पना ह्या तपशीलामधून मिळू शकते. अर्थात ह्या सर्वांसाठी न्यूक्लियर वॉलमार्ट कोण चालवत होते आणि त्यांचे प्रशिक्षण कोठे झाले होते हे मी सांगण्याची गरज आहे काय? शिवाय हे वॉलमार्ट आपली पथारी दुबईमध्ये पसरून होते. ते का व कसे हे तरी कशाला सांगायला हवे? दुबई सरकारने असे वॉलमार्ट ज्यांच्या मदतीने चालवले जाते त्यांच्यावरती काय कारवाई केली हे आपण वृत्तांमध्ये वाचलेले आहेच. पाकिस्तानचे अण्वस्त्रे तंत्रज्ञान व उत्तर कोरियाची क्षेपणास्त्रे ह्यांच्या अदलाबदलीच्या व्यवहाराविषयी बरेच काही वाचावयास मिळते.
म्हणून भारताच्या दृष्टीने उत्तर कोरियाच्या प्रश्नाकडे पाकिस्तान संदर्भ सोडून बघता येत नाही. अशा कोरियनांच्या हाती जेव्हा घातक शस्त्रास्त्रे असतात तेव्हा जगासाठी भीतीदायक परिस्थिती निर्माण होते. एखादे राष्ट्र जेव्हा ह्या मानसिकतेमध्ये जगाशी संपर्क तोडून काही दशके जगते आहे त्याला त्या युद्धाच्या खुमखुमीतून बाहेर काढणे आणि अन्य देशांच्या व्यवहाराशी जुळते घेत सामावून घेणे किती अवघड काम असेल बरे. संपूर्णपणे रशियाच्या म्हणण्यानुसार चालणारे किम इल सॉन्ग आणि त्यांच्या साली झालेल्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले त्यांचे रशियामध्ये जन्मलेले सुपुत्र किमजॉन्ग इल ह्यांच्या कडून बदलाची अपेक्षा करणे व्यर्थ ठरले असते. पण आज किम जॉन्ग उन जे सत्ताधीश आहेत त्यांचे शिक्षणच मुळी पाश्चात्य देशामध्ये झाले असल्यामुळे आणि आयुष्याची अत्यंत संवेदनशील वर्षे त्यांनी परदेशात काढली असल्यामुळे तर आजचा बदल बघायला मिळत नसेल ना?
तुमची कोरिया ची लेख मालिका संपली का? सातवा भाग नाहीये का?
ReplyDeleteMay I request you to write world history of about hundred years prior to first world war, with particular reference to Eastern, Mid Eastern countries.
ReplyDelete