डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या इमेल्स हॅक झाल्या त्या प्रकरणाशी ट्रम्प ह्यांचा संबंध जोडण्याचे क्लिंटन तीमने ठरवल्यावरती काही प्रश्न उभे राहिले. आरोप करणे एक भाग झाला पण जनतेला आपल्याबरोबर ओढून घेऊन आपल्या आरोपांमध्ये तथ्य आहे असे पटवणे गरजेचे झाले. म्हणजेच कमिटीच्या इमेल्स हॅक करण्यामागे ट्रम्प ह्यांना विजयी करण्याचा हेतू आहे आणि म्हणून रशिया - ट्रम्प ह्यांनी एकत्र येऊन ही चोरी केली आहे असा सिद्धांत तयार झाला. ह्या कामामध्ये किंवा ह्या कामासाठीच सिम्पसन आणि स्टील ह्यांच्याशी करार करण्यात आले होते. त्यांच्या मदतीने कमिटीच्या इमेल्स हॅक करण्यासाठी काही अमेरिकनांनी रशियाला मदत केली - देशहिताचा विचार न करता - ह्या आरोपांना गळी उतरवण्याचे अवघड काम सुरु झाले.
जसे अध्यक्ष बुश ह्यांनी "America is at war - war against terrorism" अशी संकल्पना मांडली तेव्हा त्यांनादेखील युद्धामध्ये आपला शत्रू कोण ह्याकडे बोट दाखवावे लागले होते. वास्तविक पाहता वेगवेगळे दहशतवादी गट अमेरिकेच्या विरोधात उभे ठाकले होते. पण जनतेला समजावणे सोपे जावे म्हणून युद्धामधला शत्रू म्हणून अल कायदा आणि त्याचा नेता ओसामा बिन लादेन हा खलनायक लोकांसमोर उभे करण्यात आले. तसेच कमिटीच्या इमेल्स हॅक करण्यातून देशाचे नेमके काय नुकसान झाले आहे आणि ते कोणी केले आहे हे चित्ररूप जनतेच्या डोळ्यासमोर उभे राहणे आवश्यक होते. तसे बघितले तर डेमोक्रॅटिक पक्षाचे ऑफिस कोणी फोडले नव्हते की तिथे घुसून कोणी कागदपत्रांची चोरी केलेली नव्हती. हॅकर्स आपले काम असे करतच नाहीत. ते दूरवर कुठेतरी बसून - शक्यतो अमेरिकेबाहेर बसून - एकट्याने इंटरनेट वापरून काम करत होते. खरे तर त्यांना अमेरिकन भूमीवरती कोणत्याही नागरिकाकडून मदतीची गरज नव्हती आणि अपेक्षाही नव्हती. मग इथे शत्रूला मूर्तरूप द्यायचे कसे?
हा यक्षप्रश्न स्टीलने सोडवला होता. कारस्थानाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ट्रम्प ह्यांच्या सहकार्यांनी हॅकर्सना भरघोस मदत केली असा अहवाल स्टीलने सादर केला. "डेमोक्रॅटिक कमिटीच्या आणि हिलरीच्या इमेल्स हॅक कराव्यात ही कल्पनाच मुळी ट्रम्प ह्यांच्या गटाची - इमेल्स चोरी करायच्या मग त्या विकिलिक्सना पुरवायच्या - विकिलिक्सने त्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनाच्या सुमुहुर्तावरती प्रसिद्ध करायच्या असा प्लॅन ठरला. ह्यातून बर्नी सॅंडर्स ह्यांचे पाठीराखे हिलरींना सोडून ट्रम्पच्या मागे यावेत अशा पद्धतीमध्ये ह्याला प्रसिद्धी द्यायची असे ठरले आहे" - असा अहवाल स्टीलने बनवला. अहवालामुले हिलरी आणि "देशाचा" शत्रू कोण ह्याला मूर्तरूप (tangible) आले. ह्या अहवालामुळे ट्रम्प आणि त्यांचे सहकारी अपराधी आहेत हे जनतेच्या मनावरती ठसवता आले असते.
पण लोकांना एखाद्या घटनेमागे कारस्थान आहे हे सहजासहजी पटवता येत नाही. कारस्थानांचे दावे जनता लवकर स्वीकारत नाही. कारस्थान म्हटले तर त्यामध्ये भाग घेणार्य़ा व्यक्ती दिसाव्या लागतात आणि त्यांनी केलेल्या "कामाबद्दल" ठाशीव पुरावे सादर करता यावे लागतात. ह्यासाठी ट्रम्प ह्यांचे विश्वासू सहकारी कोण - त्यांच्यावरती ट्रम्प ह्यांनी काय कामगिरी सोपवली होती - कोणकोणते सहकारी अमेरिकेतून सूत्रे हलवत होते - कोण रशियामध्ये जात होते - ते कोणाला भेटत होते - त्यांच्या भेटीला दुजोरा काय - भेटीचा दृश्य परिणाम काय दिसून आला - असे अथपासून इतिपर्यंत कथानक जोडणे आवश्यक होते. आणि ही माहिती विश्वसनीय असायला हवी होती. रशियन डेस्कचे प्रमुख आणि रशियामध्ये वास्तव्य केलेले स्टील ह्यांना ह्यामुळे कथानकात वेगलेच महत्व होते. स्टील ह्यांना माहिती पुरवणारी सूत्रे महत्वाची ठरली. ह्या सूत्रांनी "दिलेल्या" माहितीनुसार कथानकामध्ये संपूर्ण कारस्थान रचण्याचे शिल्पकार म्हणून ट्रम्प ह्यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार कार्टर पेज ह्यांचे नाव पुढे करण्यात आले. तर रोजच्या रोज निरोप पोचवण्याचे काम पॉल मानाफ़ोर्ट करत होते अशी स्टोरी रचण्यात आली.
स्टील ह्यांचाच अहवाल - विरोधकांची माहिती काढण्याच्या कंत्राटातून मिळवलेला - वापरून एफबीआयने कार्टर पेज ह्यांच्या विरुद्ध कोर्टाचे FISA वॉरंट (फॉरिन इंटेलिजन्स सर्व्हायलन्स अक्ट) १९ ऑक्टोबर रोजी मिळवले. ह्या वॉरंटच्या अधिकारामुळे एफबीआयला पेज ह्यांचे प्रत्येक संदेश - त्यांच्या संपर्क यादीमध्ये असलेल्या कोणाचेही संदेश वाचण्याचे स्वातंत्र्य मिळाले. अशा तर्हेने ट्रम्प ह्यांच्या संपूर्ण प्रचारयंत्रणेवरती लक्ष ठेवण्याचे साधन एफबीआय आणि पर्यायाने ट्रम्प विरोधी गटाच्या हाती लागले.
ट्रम्प ह्यांच्या विजयानंतर सुद्धा डेमोक्रॅट नेते ठामपणे सांगत होते की तीन वर्षांच्या आतच ट्रम्प ह्यांच्यावरती महाभियोगाचा खटला चालवण्यात ये ईल. हा आत्मविश्वास नेमका कुठून येत होता? त्यामागे कोणत्या शक्ती होत्या? ट्रम्प ह्यांच्या किती सहकार्यांना पुढच्या काळामध्ये एफबीआयला सामोरे जावे लागले - त्यात कोणते डावपेच खेळले गेले - आणि एक एक करून हिलरी गट कसा उघडा पडत गेला हीच एक मोठी कहाणी आहे.
ह्या कथेमध्ये हिलरींच्या बाजूने पक्षपातीपणा करणार्या अधिकार्यांना अनेक बेचक्यातले प्रश्न कधी विचारलेच गेले नाहीत.
चौकशी पुढे रेटण्यामागे सीआयए डायरेक्टर ह्यांची नेमकी भूमिका काय होती?
प्रकरणाची माहिती कोणाकडून प्रथम मिळाली? अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी ती पुरवली होती का?
मित्रराष्ट्रांकडे असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सर्व्हायलन्समध्ये अंतर्भूत असलेल्या माहितीमधून ट्रम्प गटाच्या इमेल्सवरती लक्ष ठेवण्याचे काम सीआयएने केले का? अशी विनंती सीआयएने त्या राष्ट्रांना केली होती का? असेल तर नेमक्या कोणत्या सामंजस्यावरती ह्या राष्ट्रांची मदत प्रकरणामध्ये घेण्यात आली होती?
पापादूपोलोस ह्यांच्या कारवाया ब्रिटनच्या भूमीवरती केल्या गेल्या. तिथे एफबीआय नव्हे तर सीआयए कार्यरत असू शकते. मग एफबीआयकडे ही माहिती नेमकी कुठून आली होती? की सीआयएनेच माहिती गोळा करून चांदीच्या ताटात घालून एफबीआयकडे पुढील कारवाईसाठी सोपूर्द केली होती?
चौकशीला सुरुवात करण्याचा निर्णय घेणारे कागदपत्र कोणते? ते चौकशी समितीसमोर का दिले गेले नाहीत?
ओबामा ह्यांच्याशी कोमींनी एफबीआय ह्या प्रकरणामध्ये काय करत आहे ह्याची चर्चा केली तेव्हा कार्टर पेज ह्यांच्या भूमिकेची चर्चा केली होती का? तेव्हा काय माहिती ओबमा ह्यांना देण्यात आली? ह्या माहितीचा उगम स्टील ह्यांचा अहवाल आहे हे ओबामा ह्यांना सांगितले गेले होते का? ब्रेनान आणि रीड म्हणतात तसे करा म्हणून ओबामा ह्यांनी कोमींना सुचवले का?
ह्या प्रकरणामध्ये सीआयएनेच चुकीची माहिती स्टीलपर्यंत पोचवण्याची आधी "सोय" केली आणि मग त्याने दिली म्हणून ती माहिती विश्वसनीय मानून तर कारवाईला सुरुवात करण्यात आली नव्हती ना? सीआयएने अमुक पुरावे दिले असे दाखवता येत नसल्यामुळे असे पुरावे फ्यूजन जीपीएस आणि ऑर्बिस कंपन्यांकरवी कोर्टासमोर तर आणले गेले नाहीत ना?
ह्या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. हिलरी ह्यांच्या उमेदवारीला सर्वात मोठा धक्क शेवटच्या आठवड्यात बसला तो एफबीआय डायरेक्टर कोमी ह्यांच्या घोषणेमुळे. मतदानाला शेवटचे पाच सहा दिवस उरले असता म्हणजे २८ ऑक्टोबर रोजी कोमी ह्यांनी जाहीर केले की हिलरी ह्यांच्या बेनघाझी प्रकरणातील इमेल्सची चौकशी पुनश्च करण्यात येईल. हुमा अबेदिन ह्यांचे पती वायनर ह्यांच्या विरोधात नोंदण्यात आलेल्या एका खाजगी तक्रारीचा तपास करत असताना त्यांच्या लॅपटॉपवरती हिलरींच्या हजारो इमेल्स सापडल्या. तपासा अंती दिसून आले की हुमा ह्यांच्या सर्व इमेल्स वयनर ह्यांच्या आयडीवरती "आपोआप" फॉर्वर्ड करण्याचे सेटींग करण्यात आले होते. अशा तर्हेने हिलरी ह्यांच्या गायब इमेल्स पुन्हा "तरंगून" वरती आल्या होत्या. त्याआधी जेमतेम काही दिवस त्यांचे प्रचारप्रमुख जॉन पोडेस्टा ह्यांच्या इमेल्सदेखील चोरल्या गेल्याचे उजेडात आले होते. ह्या धक्क्यांमधून हिलरी सावरल्या नाहीत. शेवटच्या दिवसात ट्रम्प ह्यांनी रशियाच्या मदतीने काळा पैसा पांढरा करून निवडणुकीत वापरला असे आरोप केले जात होते पण ते निष्प्रभ ठरले.
ट्रम्प जिंकले - त्यांचा विजय सीआयए रोखू शकली नाही. पण विच हंट चालूच राहिली. एका इमेलची करामत म्हणून मी लिहिलेला लेख ब्लॉगवरती पाहावा. (https://swatidurbin.blogspot.in/2018/02/blog-post_15.html) ओबामा - हिलरी - क्लिंटन - त्यांचे अधिकारीवर्गातील पाठिराखे ह्यांच्या कारवाया इतक्यात थंडावणार नाहीत. त्या आजपावेतो चालूच आहेत.
जागतिक चांडाळचौकडीचा आजवरती तीन वेळा जबर पराभव झाला आहे. पहिला म्हणजे मे २०१४ साली मोदींचा विजय - जून २०१६ मध्ये ब्रिटनने युरोपियन युनियनमधून बाहेर पडावे ह्या निर्णयावरती ब्रिटनच्या जनतेने उठवलेली मोहर आणि तिसरा म्हणजे ट्रम्प ह्यांचा विजय. ह्या तीन घटनांमधून चांडाळचौकडी जबर जखमी झाली आहे. आणि निकराने अस्तित्वाचा लढा देत आहे. २०१९ मध्ये मोदी ह्यांना हरवणे त्यांच्यासाठी एक अनिवार्य खेळी बनून गेली आहे. जो घटनाक्रम ट्रम्प ह्यांच्या निवडणुकीत दिसला तो इथे २०१९ च्या निवडणुकीत भारतामध्ये दिसू शकतो किंबहुना त्याची चोर पावले आताच पडताना दिसत आहेत.
सावध रहा. इतिहासाची पुनरावृत्ती तर होते पण सगळेच तपशील जसेच्या तसे नसतात!!
अप्रतिम लेखमाला.
ReplyDelete