Friday, 6 April 2018

हिलरी ह्यांचे षड्यंत्र भाग ९


Image result for harry reid


हॅरी रीड

अमेरिकन निवडणुकीमधील रशियन हस्तक्षेप ह्या संकल्पनेभोवती हिलरींची प्रचारयंत्रणा काम करेल अशी योजना होती. पण तेव्हढ्याने भागणार नाही हे कळत असल्यामुळे पुढचे आयोजनही व्यवस्थित केले जात होते. अगदी ऑगस्ट महिन्यापर्यंत निदान एफबीआयमधील सूत्रे असे मानत होती की अमेरिकन निवडणुकीमध्ये गोंधळ उडवून देणे इतकाच रशियाचा हेतू असावा. पण क्लिंटन प्रचारयंत्रणेचे आकलन अगदी स्पष्ट होते - हिलरी ह्यांना हरवून ट्रम्प ह्यांना विजयी करण्याच्या उद्देशाने रशिया अमेरिकन निवडणूकीमध्ये हस्तक्षेप करत आहे!!! जुलै महिन्याच्या शेवटाला अमेरिकेचे नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर जेम्स क्लॅपर म्हणाले होते की डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमिटीच्या इमेल्स हॅक तर झाल्या आहेत पण त्या पुतिन वा रशियाने हॅक केल्या असे आम्ही आज तरी म्हणू शकत नाही. म्हणजेच जुलै महिन्याच्या शेवटापर्यंत इमेल्स नेमक्या कशा हॅक झाल्या ह्याचे (न्यायालयात मान्य होतील इतके सबळ) पुरावे तपासयंत्रणांकडे नव्हते. असे स्पष्ट विधान येऊन सुद्धा हिलरीप्रणित मीडिया आणि त्यांची स्वतःची प्रचारयंत्रणा मात्र ट्रम्प - पुतिन साटेलोटे ह्यावरच लक्ष केंद्रित करून होते. 

पण मिडिया - हिलरी - त्यांची प्रचारयंत्रणा एकटेच हे काम करत नव्हते. ओबामा राजवटीमध्ये बसलेले सगळेच लिबरल्सच्या त्यांच्या दिमतीला हजर होते. ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये सीआयएने नेमकी काय भूमिका निभावली ह्यावरती अनेक प्रश्नचिन्हे आहेत. २६ एप्रिल २०१६ रोजी पापादूपोलोस प्रो. मिफसूद ह्यांना भेटला तेव्हा रशियाकडे इमेल्स असल्याची बातमी मिफसुद् ह्यांनी दिली होती. पण एप्रिल १३ रोजी लंडनच्या गार्डियन वृत्तपत्राने एक लेख छापून त्यामध्ये रशिया - ट्रम्प संबंध खोदून काढण्याच्या कामी ब्रिटनचे GCHQ (गव्हर्नमेंट कम्युनिकेशन्स हेडक्वार्टर्स) ने अत्यंत महत्वाची भूमिका बजावल्याचे आणि मूलभूत माहिती जमा केल्याचे लिहिले होते.  हाच वृत्तांत दुसर्‍याच दिवशी सीएनएननेही असाच रिपोर्ट छापला. हे गौडबंगाल नाही का? म्हणजेच पापादूपोलोस हा ट्रम्प प्रचारयंत्रणेतील कनिष्ठ स्वयंसेवक प्रोफेसर मिफसुद्ना भेटला आणि गुप्तचर संस्थांना त्याची माहिती मिळू लागली ही थाप आहे असे वाटत नाही का? आपल्या जबानीमध्ये पुढे ब्रेनान ह्यांनी म्हटले की ह्या विषयातली माहिती माझ्याकडे मे महिन्यापासून होती. म्हणजे ही देखील थापच नाही का? अर्थात इराकमध्ये WMD असल्याचा ’शोध’ लावणार्‍या ब्रिटन आणि अमेरिकन सुरक्षा संस्थांबद्दल काय म्हणायचे? 

नेमक्या कोणत्या कागदपत्राने - आदेशाने ट्रम्प ह्यांच्या प्रचारयंत्रणेची चौकशी एफबीआयने सुरु केली ते कागदपत्र चौकशीसमितीसमोर आणा असा आदेश दिला तेव्हा एफबीआयने एक कागद समितीला दिला पण त्यामधले अनेक तपशील झाकण्यात आले आहेत. तेव्हा तपशील न झाकता हा कागद द्या असे सांगावे लागले आहे. जर चौकशी बावनकशी होती तर आज ही लपवाछपवी का करावी लागत आहे हा विचार कोणाच्याही मनात येईल. 

ऑगस्टच्या दरम्यान ब्रिटनचे GCHQ प्रमुख रॉबर्ट हॅनिगन स्वतः अमेरिकेत आले. त्यांच्याकडचे पुरावे इतके स्फोटक होते की ते इतर कोणाच्याही हातातून ब्रेनान ह्यांना पाठवण्यापेक्षा व्यक्तिशः त्यांनी आपल्याकडचे पुरावे सीआयए प्रमुख ब्रेनान ह्यांना दाखवणे प्रशस्त मानले. तसेच स्टीलने लिहिलेला एक अहवालही त्यांनी ब्रेनान ह्यांच्या हाती दिला. ह्यानंतर मात्र सीआयएने झपाट्याने पावले उचलली असे म्हटले जाते. ह्यानंतर जेम्स क्लॅपर ह्यांचेही मत बदलले आणि ते ब्रेनान ह्यांच्याबरोबर काम करू लागले. ह्या सर्व कागदपत्रांची माहिती अर्थातच तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा ह्यांना होती. ब्रेनान ह्यांनी आपल्या जबानीमध्ये हेही सांगितले की माझ्याकडे असलेले पुरावे मी वेळोवेळी एफबीआयच्या हाती सोपवले. कारण देशांतर्गत तपासकाम त्यांना पार पाडायचे होते. तेव्हा डाउनर ह्यांनी माहिती दिल्यावरती तपासाचे काम एफबीआयने सुरु केले हेदेखील खोटेच मानायचे का?

ब्रेनानने सांगितले म्हणून त्याचा शब्द न् शब्द मानायला एफबीआय डायरेक्टर कोमी तयार नव्हते. त्यांना आपले तपासकार्य आपल्या पद्धतीने करायचे होते. शेवटी ब्रेनान ह्यांनी न राहवून ओबामा ह्यांना कळवून स्वतंत्र प्रयत्न करण्याचे ठरवले. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या आठ "महत्वाच्या" सदस्यांना ब्रेनान ह्यांनी एकत्र बोलावले. गॅंग ऑफ एट (Gang of 8) म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या नेत्यांना तसेच सिनेट व हाऊस मधील वरिष्ठांना ही कल्पना दिली की रशियाने अमेरिकन निवडणुकीत हस्तक्षेप चालवला असून ट्रम्प ह्यांना विजयी करण्याचे कारस्थान रचले आहे. अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे रशियाच्या हातचे बाहुले अशी असाधारण परिस्थिती देशावर ओढवलीच तर दोन्ही पक्षांमध्ये मतैक्य असावे ह्या उद्देशाने आपण हे केल्याचे ब्रेनान दाखवत होते. ब्रेनान सांगतात त्यावरती डेमोक्रॅटस चा विश्वास होताच पण सगळ्याच रिपब्लिकन नेत्यांचे तसे नव्हते. कदाचित आपण सांगतो त्यात काही तथ्य असलेच तर अशा विचाराने रिपब्लिकन नेते ट्रम्प पासून दूर राहतील असा हेतू असावा. स्वतः ब्रेनान ह्यांनी आपल्याकडील माहिती जनतेसमोर उघड का केली नाही? तसे केले असते तर त्यांच्यावरती पक्षपातीपणाचा आरोप सहज झाला असता. त्यामुळे त्यांनी आपले म्हणणे तसेच्यातसे बोलू शकतील अशा डेमोक्रॅटस्च्या कानी घातले. रिपब्लिकन चुप बसले आणि ट्रम्पच्या समर्थनासाठी पुढे आले नाहीत तरी पुरे होते. 

ब्रेनान ह्यांचे कथन अर्थातच ह्या आठ जणांपुरते सीमित राहिले नाही. ते दोन्ही पक्षातील अन्य व्यक्तींपर्यंत पोचले होते. (उदा. ट्रम्प ह्यांच्या शपथविधीसाठी रीवाजाप्रमाणे आमंत्रण मिळालेले श्री बुश व अन्य माजी अध्यक्ष हजर होते. पण त्यांच्या चेहर्‍यावरील अस्वस्थतेचे भाव स्पष्ट दिसत होते. रीवाजाप्रमाणे ट्रम्प ह्यांनी दिलेली भेट ओबामा ह्यांनी हातात तर घेतली पण पुनश्च आत जाण्यापूर्वीच ती फेकूनही दिली असा व्हिडियो तुम्ही बघितला असेल. ओबामा ह्यांची अस्वस्थताही वेगळी पण समजण्यासारखी आहे. स्टील ह्यांच्या अहवालानुसार रशिया भेटीमध्ये ट्रम्प ह्यांनी रिट्झ कार्लटन हॉटेलमधला तोच स्वीट बुककेला होता जिथे ओबामा आपल्या पतीसह उतरले होते. तिथे आयोजित केलेल्या नाचाच्या कार्यक्रमामध्ये मनोरंजन चमूतील महिलांकरवी ट्रम्प ह्यांनी अश्लाघ्य प्रकार करवले आणि ह्याचाच व्हिडियो रशियाकडे आहे अशी वदंता आहे.) 

खास करून ब्रेनान ह्यांनी सिनेट मायनॉरिटी लीडर हॅरी रीड ह्यांच्यावरती मदार ठेवलेली दिसते. रीड ह्यांची निवड त्यांनी काळजीपूर्वक केली असल्याचे दिसते. २०१२ च्या ओबामा ह्यांच्या प्रचारादरम्यान रीड ह्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी मिट रॉम्नी ह्यांनी गेली दहा वर्षे करच भरला नसल्याचा सनसनाटी आणि धादांत खोटा आरोप केला होता. पुढे ह्या आरोपाबद्दल प्रश्न विचारले गेले असता रीड म्हणाले - त्यांना काय म्हणायचे ते म्हणू देत - नाही न जिंकले रॉम्नी?? असा विधीनिषेध न बाळगणारे रीड ब्रेनानच्या कामी अगदी योग्य होते कारण २०१६ नंतर ते राजकारणामधून निवृत्त होणार होते. कोणाचेही नाव न घेता ट्रम्प ह्यांचे काही सहकारी रशियाशी हातमिळवणी करून निवडणुकीमध्ये गोंधळ उडवण्याच्या तयारीत आहेत असे ब्रेनानने रीडना सांगितले तसेच स्टीलच्या अहवालामधला काही भागही त्यांना दाखवण्यात आला असावा. इतकेच नव्हे तर आपण इतके महत्वाचे दुवे देऊन सुद्धा एफबीआय डायरेक्टर कोमी आपले ऐकत नाहीत आणि हवे तसे काम करत नाहीत अशी तक्रारही ब्रेनान ह्यांनी रीडच्या कानी घातली असावी. 

ब्रेनान - रीड ह्यांच्या भेटीनंतर दोनच दिवसात रीड ह्यांनी कोमींना खरमरीत पत्र लिहिले. रशियन सरकार आणि ट्रम्प ह्यांची प्रचारयंत्रणा ह्यांच्यामधले थेट संबंध काय आहेत याची चौकशी करून अमेरिकन जनतेसमोर ह्यामधले तथ्य मतदानापूर्वी आणले गेले पाहिजे त्यासाठी एफबीआयने अशी चौकशी करण्याला प्राधान्य दिले पाहिजे पण तसे दिसत नाही असे रीड ह्यांनी लिहिले. आपले पत्र त्यांनी कोमी ह्यांच्या उत्तराची वाट न बघता तसेच मिडियाच्या हाती दिलेही. "ट्रम्प ह्यांनी आपल्या प्रचारयंत्रणेमध्ये असे अनेक जण घेतले आहेत जी ज्यांचे रशिया आणि क्रेमलिनशी धकादायक संबंध आहेत. शिवाय त्यांच्यामधले काही जण रशियन सरकार आणि इमेल हॅक करणार्‍या गट ह्यांच्यामधले दुवे बनून काम करत आहेत. ट्रम्प, विकिलिक्स आणि रशियन सरकार हे एकत्रितरीत्या आपल्या निवडणुकीवरती प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करत असून ही बाब चिंताजनक आहे आणि तिचा संपूर्ण तपास झालाच पाहिजे." असे रीड ह्यांनी लिहिले होते. सर्वात कळस म्हणजे कार्टर पेज ह्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करणारे आरोपही त्या पत्रामध्ये होते. इतके झाल्यानंतर कोमी ह्यांना आपला दृष्टीकोन बदलणे भाग पडले. रीड ह्यांचे पत्र प्रकाशित झाल्यावरती लगेचच तपासकामाचे प्रमुख पीटर स्ट्रोझ्क हे आपल्या मदतनीस सहकारी लिझा पेजला ह्याबाबत कळवतात - आपण काय काम करत आहोत त्याचा बारीक सारीक तपशील अध्यक्षांना हवा आहे. एव्हाना ओबामा G-20 बैठकीसाठी चीनमध्ये जाणार होते. तिथे पुतिन ह्यांच्याकडे हा विषय त्यांना बोलायचा होता. असले प्रयत्न करू नका - आमच्या निवडणुकीपासून दूर रहा अशी तंबी ओबामानी पुतिनना दिली असे सांगितले जाते. 

ओबामा ह्यांनी नेमकी काय चौकशी कोमी ह्यांच्याकडे केली - त्यांनी कार्टर पेज ह्यांचे नाव घेऊन काही विचारणा केली का - ख्रिस्टोफर स्टीलच्या अहवालाविषयी बोलणे झाले का - ब्रेनान आणि रीड सांगतात तसा तपास करा म्हणून ओबामा ह्यांनी लकडा तर लावला नव्हता ना? ह्या प्रश्नांची उत्तरे कोणाकडे मिळणार? पण कोमी ह्यांनी त्यानंतर ब्रेनानशी जोळवून घेतलेले दिसते. 


आता चौकशीचे केंद्र कार्टर पेज ह्यांच्याकडे वळत आहे असे संदर्भ स्ट्रोझ्क आणि लिझा पेज आपल्या "आवडत्या" पत्रकारांना सहज देऊ शकले असते पण तसे केल्याने ते पक्षपाती असल्याचा आरोप झाला असता. म्हणून ह्या कामी ग्लेन सिम्पसन आणि स्टील हेच योग्य काम करू शकतील हे स्पष्ट होताच सिम्पसनने स्टीलला अमेरिकेमध्ये बोलावून घेतले आणि त्याच्या उपस्थितीमध्ये तो पत्रकारांना भेटू लागला. 

(अपूर्ण)


No comments:

Post a Comment