Monday, 22 October 2018

जमाल खाशोगी खूनप्रकरणाचे गौडबंगाल









२ ऑक्टोबर २०१८ रोजी जन्माने सौदी अरेबियन व अमेरिकन ग्रीन कार्ड धारक पत्रकार जमाल खाशोगी खाजगी कामानिमित्त सौदी अरेबियाच्या तुर्कस्तानातील इस्तंबूलमधील वकिलतीमध्ये गेले होते. बाहेर त्यांची नियोजित वधू हतिस चेंगिझ वाट पाहत होती. तिच्याशी लग्न करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वकिलातीमधून घेण्यासाठी खाशोगी तिथे गेले होते. परंतु ते बाहेर पडलेच नाहीत. अखेर तीन तास वाट बघून हतिसने तुर्कस्तानच्या पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली. सुरुवातीला खाशोगी वकिलातीमधून बाहेर पडले त्यानंतर काय झाले आम्हाला माहिती नाही म्हणून सौदीने हात झटकण्याचा प्रयत्न केला परंतु त्यातील फोलपणा उघड झाल्यावरती गोंधळाच्या वातावरणामध्ये दोन सौदी अधिकारी - सौदी गुप्तहेर खात्याचे उपप्रमुख मेजर जनरल अहमद अल असिरी आणि राजपुत्र मोहमद बिन सलमान ह्यांचे जवळचे सल्लागार सौद अल कहतानी दोघांना डच्चू मिळाला आहे. व्यवसायाने वॉशिंग्टन पोस्ट ह्या सुप्रसिद्ध माध्यमामध्ये पत्रकार म्हणून काम करत असलेल्या खाशोगी ह्यांचे असे गायब होणे अर्थातच नैसर्गिक नाही. म्हणून ह्या प्रकरणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. इअतकेच नव्हे तर ही बाब विविध राष्ट्रांमध्ये एक परराष्ट्रसंबंधांचा तिढा होऊन बसेल अशी चिन्हे आहेत. 

२८ सप्टेंबर रोजी प्रथम खाशोगी वकिलातीमध्ये गेले व राजदूतास भेटले. त्याने त्यांना तेथील एका अधिकार्‍याला भेटावयास सांगितले. हा अधिकारी म्हणजे प्रत्यक्षात सौदी गुप्तहेर खात्यातील अधिकारी होता असा अंदाज आता लावला जात आहे. तुम्हाला हवी असलेली कागदपत्रे लगेच देता येणार नाहीत पण पुढल्या आठवड्यामध्ये मिळू शकतील असे सांगितल्यावर खाशोगी ह्यांनी त्या अधिकार्‍याचा फोन नंबर घेतला आणि त्यानंतर फोन करून कागदपत्रे तयार असल्याची खात्री करून घेऊन मगच तिथे ते २ ऑक्टोबर रोजी गेले होते असे चौकशीमध्ये निष्पन्न झाले आहे. घटना जरी तुर्कस्तानच्या भूमीवरती घडली असली आणि एका सौदी नगरिक त्यामध्ये मृत पावला असला तरीही वकिलातीच्या वास्तूवर त्या त्या देशाचे सार्वभौमत्व असल्याचे मानण्याचा रीवाज असल्यामुळे ह्या गुन्ह्याचा तपास कसा व कोणी करावयाचा - तुर्की पोलिस पथकाला तिथे प्रवेश मिळेल काय आणि मिळाला तर तिथे त्यांना पुरावे गोळा करण्यासाठी तपास करण्याची परवानगी कशी मिळणार से प्रश्न उपस्थित होतात. अर्थात हे प्रश्न नवे नसून त्यावर उत्तरे आहेत. संकेतानुसार हा तपास तुर्की अधिकारीच करू शकतात व सौदी वकिलातीला त्यामध्ये त्यांच्याशी सहकार्य करावे लागेल. त्यानुसार तुर्की चमूने तिथे जायचे ठरल्यानंतर ते तिथे पोचण्या आधी "साफसफाई" करण्यात आली. त्याचा व्हिडियो इंटरनेटवर फिरत आहे. साफसफाईसाठी कोणती यंत्रे आणि किती डबे रसायने - ब्लीचिंग लिक्विड - नवे झाडू - नवी फडकी - नव्या बादल्या - वापरण्यात आली ते ह्या व्हिडियोमध्ये बघितल्यावर थक्क व्हायला होते. अशी परिपूर्ण सफाई चालली आहे ही बाब उघड उघड चालू होती त्यात कोणतीही लपवाछपवी करण्यात आलेली नाही म्हणजे आम्ही साफसफाई करत आहोत असे जणू जाहीर रीत्या सांगून तसे केले गेले असे लक्षात येते. 

खाशोगी वकिलातीमध्ये प्रवेशल्यानंतर नेमका काय घटनाक्रम घडला हे कळणे कठिण आहे. पण त्यांना दुपारी एक वाजता येण्याचे वेळ देण्यात आली होती. तत्पूर्वी वकिलातीमधील कर्मचार्‍यांना दुपारच्या जेवणासाठी लवकार बाहेर सोडण्यात आले. तसेच आज एक महत्वाची मिटींग असल्यामुळे पुढचा अर्धा दिवस सुट्टी असून ऑफिसमध्ये परतू नये अशा त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. साधारण सव्वाच्या सुमाराला खाशोगी आत गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसते. त्यांच्या खोलीमध्ये दोन खास अधिकारी गेले व त्यांनी त्यांना ओढत दुसर्‍या खोलीत नेले. तिथे त्यांना ठार मारण्यात आले. मृतदेह तिसर्‍या खोलीत खेचून नेण्यात आला व तिथे त्याचे तुकडे करण्यात आले असे म्हणतात. ब्रिटनच्या म्हणण्यानुसार खाशोगी ह्यांना नशिला पदार्थ देण्यात आला होता व त्याची मात्रा जास्त झाल्यामुळे त्यांचा मृत्यू ओढवला असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. वकिलातीमध्ये २२ गाड्या नोंदीकृत आहेत त्यातील तीन गाड्यांची विशेष चौकशी होत आहे असे दिसते. एक गाडी सुमारे सव्वा तीनला तिथून बाहेर पडली आणि जवळ असलेल्या राजदूताच्या घराकडे गेली असे दिसते. तुर्की अधिकारी वकिलात तसेच राजदूताच्या बंगल्याच्या बागेमध्ये खणून खाशोगीचे प्रेत मिळते का ते तपासण्याच्या चिंतेत आहेत. कौन्सिल जनरल - राजदूत स्वतःच्या घरामधून तीन दिवस बाहेरही पडला नाही. वकिलातीच्या सर्व गाड्यांची तपासणी करण्यासाठी आमच्या ताब्यात द्या असे सांगितल्यावर वकिलातीने गाड्या तुर्की अधिकार्‍यांना दिलेल्या नाहीत. वकिलात सोडण्यापूर्वी तेथील सीसीटीव्ही कॅमेराच्या रेकॉर्डिंग असलेल्या हार्ड ड्राईव्हज सौदी अधिकार्‍यांनी काढून घेतल्या आहेत. सुरूवातीला तुर्की अधिकार्‍यांना आत येण्याची सौदी अधिकार्‍यांनी तयारी दर्शवली होती. पण तसा प्रवेश देण्या अगोदर तुर्की पोलिसांनी १५ सौदी अधिकार्‍यांची संशयित म्हणून नावे जाहीर केली. ह्यानंतर सौदीने परवानगी नाकारली. हे १५ अधिकारी त्याच दिवशी सकळी सौदीहून तुर्कस्तानला खास विमानाने आले होते व २ ऑक्टोबर रोजी खाशोगी आले तेव्हा वकिलातीमध्ये हजर होते असे दिसते. (ह्या अधिकार्‍यांमध्ये दोन डॉक्टर दोन पायलट दोन गुप्तहेर अधिकारी आणि आठ अधिकारी राजपुत्राच्या खाजगी सेवेमधले होते असे तुर्कस्तानचा अंदाज आहे). 

सौदीने तपासामध्ये इतके मोडते घातले तरी तुर्कस्तानने वकिलातीच्या आसपासच्या गटाराची पाहणी करून परिस्थितीजन्य पुरावे जमा केले असून ते खाशोगीचा खून वकिलातीमध्ये झाला हे सिद्ध करण्यास पुरेसे आहेत असे म्हटले जाते. खरे तर सौदीने ह्या पूर्ण घटनेचेही रेकॉर्डिंग केले आहे असेही म्हणतात. ह्याहूनही एक विलक्षण गोष्ट म्हणजे वकिलातीमध्ये जाताना खाशोगीच्या हातावरती ऍपल वॉच होते. ते त्याने आपल्या नियोजित वधूच्या घड्याळाशी तंतोतंत जुळते ठेवले होते. शिवाय आत गेल्यावर खाशोगीने आपल्या घड्याळावरील रेकॉर्डिंग बटन दाबले होते असे म्हणतात. त्यामुळे त्याच्या मरणाचा व्हिडियो "on line" ट्रान्स्मिट होत होता की काय अशी एक शंका व्यक्त केली जात आहे. 

खाशोगीला सौदीच्या राजपुत्राने विश्वासघात करून मारले असे प्रथमदर्शनी दिसत आहे. पण प्रश्न हा उरतो की जमाल खाशोगीने असे काय केले होते की सौदीच्या राजपुत्राला त्याला ठार मारणे क्रमप्राप्त व्हावे? त्याकरता जमाल खाशोगीची थोडक्यात माहिती बघू. भारतामध्ये शस्त्रास्त्र व्यवहारातील दलाल आणि बोफ़ोर्स प्रकरणाशी संबंधित म्हणून सुप्रसिद्ध असलेले नाव म्हणजे अदनान खाशोगी हे जमाल खाशोगी ह्यांचे चुलते. तसेच प्रिन्सेस डायानाचा मित्र दोदीची आई ही जमालची (सख्खी नव्हे) बहिण लागते. जमालचा एक शाळामित्र म्हणजे ओसामा बिन लादेन. सौदी मध्ये लादेन कुटुंब ऐश्वर्यासाठी प्रसिद्ध आहे तेव्हढेच खाशोगी कुटुंबही. ओसामा आणि जमाल शाळेपासूनच मुस्लिम ब्रदरहूडच्या सर्व जगामध्ये इस्लामी राजवट आणण्याच्या कल्पनेने झपाटलेले होते. पॅलेस्टाईनमध्ये जन्मलेले आणि जॉर्डनचे नागरिक असलेले शेख अब्दुल्ला आझम हे दोघांचेही गुरू. दोघेही आपल्या संवेदनशील वयामध्ये आझम ह्यांची व्याख्याने ऐकत असत. त्यातूनच जेव्हा ओसामा अफगाणिस्तानमध्ये रशियाविरोधातील जिहाद छेडण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या बरोबरीने जमालही तिथे गेला होता. सोव्हिएत रशियाच्या पराभवानंतर ओसामा आणि जमाल सौदीमध्ये परतले पण ओसामाचे सौदी राजघराण्याशी न पटल्यामुळे त्याला देश सोडून सुदानमध्ये आश्रय घ्यावा लागला. खाशोगीने पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. तत्कालीन सौदी गुप्तहेर प्रमुखांच्या तो संपर्कात असे. ओसामाची "मलिन" प्रतिमा उजळण्यासाठी म्हणून खाशोगीने त्याची मुलाखत प्रसिद्ध करावी अशी गळ लादेन परिवाराने घातली म्हणून जमाल सुदानमध्ये गेला. ओसामा अमेरिकेविरुद्धचा जिहाद थांबवायला तयार नव्हता. इथे सौदीच्या राजाने तर इराकी आक्रमणाच्या शक्यतेमुळे अमेरिकन सैन्याला सौदी  भूमीवरती पाचारण केले होते. ओसामाची भूमिका अडचणीची ठरेल असे जमालने सुचवूनही ओसामाने माघार घेतली नाही. 

ओसामाशी जमले नाही तरी जमाल मुस्लिम ब्रदरहूडशी जमवून घेत होता. पण पुढे सौदी राजघराण्याचा दृष्टिकोनही बदलला. सोव्हिएत रशियाला हरवण्यासाठी त्यांना मुस्लिम ब्रदरहूड हवीहवीशी वाटत होती आणि तोवर त्यांनी आपल्या भूमीमध्ये ब्रदरहूडला कार्यासाठी मुक्त वावर दिला होता. पण नंतर जेव्हा ब्रदरहूड सौदी राजघराण्याला आव्हान देऊ लागली तेव्हा त्यांनी ही संघटना दहशतवादी असल्याची भूमिका घेतली. ह्या कोलांट उड्या जमालला मान्य नव्हत्या. त्याचे आणि कतारचे नाते जुळले ते ह्या परिस्थितीमध्ये. कारण इस्लामी कट्टरपंथी विचार कतारने सोडले नव्हते. पुढच्या काळामध्ये तर जमालचे आणि तुर्कस्तानचेही उत्तम संबंध जुळले होते. मुस्लिम ब्रदरहूडला सत्तेवर आणण्यासाठी ओबामा सरकारने इजिप्तमध्ये तहरीर चौकामध्ये निदर्शने घडवून आणली तेव्हा जमाल खुश होता. हळूहळू अमेरिकेने त्यांना वार्‍यावर सोडले. जोपर्यंत ओबामा सत्तेवर होते तोपर्यंत सौदी घराण्याच्या धोरणामध्ये फरक पडला नव्हता. त्याकाळामध्ये जॉन ब्रेनान ह्या सीआयए प्रमुखाशी जमालचे उत्तम संबंध होते. ट्रम्प सत्तेवर येताच अनेक समीकरणे बदलली. सौदीमध्ये एमबीएस ह्यांच्या हाती सूत्रे आली आणि त्यांनी कर्मठपणाविरोधात आघाडीच उभारली. तसेच सुधारणांच्या नावाने अनेक अधिकार्‍यांना काढून टाकले. आपल्या विश्वासातली माणसे तिथे नेमली. ट्रम्प ह्यांच्या आशिर्वादाने घडत असलेल्या ह्या घडामोडींना जमालचा विरोध होता. तिथे ट्रम्प ह्यांच्या राजकीय विरोधकांनाही आपले हस्तक हवेच होते. ब्रेनान ह्यांच्याशी असलेले संबंध वापरून जमालने अमेरिकेची वाट धरली. 

२०१३ मध्ये वॉशिंग्टन पोस्ट हा पेपर जेफ बेझोस ह्यांनी विकत घेतला. हेच बेझोस साहेब सीआयएसाठी साठ कोटी डॉलर्स खर्चून क्लाऊड स्टोरेज सिस्टीम बनवत आहेत. खाशोगी तुर्कस्तानमार्गे अमेरिकेमध्ये २०१७ साली गेला आणि त्याला ब्रेनान - बेझोस ह्या कडीने वॉशिंग्टन पोस्टमध्ये नोकरी दिली तसेच त्याचे ग्रीन कार्ड ताबडतोब बनवून घेण्यात आले. इतके झाल्यावरती खाशोगीने पुनश्च सौदीमध्ये परतायचे ठरवले. तिथे येऊन आपल्याला माहिती असलेली गुपिते जाहीर करण्याचा त्याचा मनसुबा होता. म्हणजेच एमबीएसच्या विरोधामध्ये त्याने एक फळीच उघडली होती. एक लोकशाहीवादी राजकीय पक्षही काढला होता. इजिप्तप्रमाणे सौदीमध्येही लोकशाही स्थापनेसाठी सीआयएने त्याला राजाच्या विरोधात पाठिंबा देण्याचे कबूल केले असावे. पण जिथे ट्रम्प ह्यांच्या संगनमताने एमबीएस सुधारणा करत आहेत तिथे सीआयएने जमालला असा पाठिंबा देणे संयुक्तिक वाटते का? 

अर्थातच ह्या वादाचे मूळ जाते ते ट्रम्प विरुद्ध सीआयए वादाकडे. जमाल ह्याच्या खुनावरती अमेरिकेने - म्हणण्यापेक्षा ट्रम्प ह्यांनी दमदार भूमिका का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित होतो पण त्याचे उत्तरही स्पष्ट आहे. एमबीएसने मध्यपूर्वेतील समीकरणे बदलली असून तुर्कस्तान कतार इराण येमेन एका बाजूला आणि सौदी दुसर्‍या बाजूला असे चित्र आहे. ट्रम्प सौदीला मदत करतात तर सीआयए त्यांच्या विरुद्ध फळीला. जमाल ह्यांच्या खुनास एमबीएस उद्युक्त का झाला असावा? असे म्हणतात त्याने "धरावे" असे आदेश दिले होते पण तेथील अधिकार्‍यांनी "मारावे" असे वाचले! अर्थात ह्यावरती विश्वास ठेवणे कठिण आहे. हा खून एमबीस पचवतात की नाही बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे. पण चिंतेची बाब हीच आहे की अमेरिकेसारख्या बलाढ्य देशामध्ये अध्यक्ष विरुद्ध सुरक्षा यंत्रणा असा जोसंघर्ष चालू आहे त्याची पाळेमुळे नेमकी कुठपर्यंत पोचली आहेत ह्याचा अंदाज लावता येत नाही. 

भारतामध्ये डॉ. सुब्रमण्यम स्वामी ह्यांनी सीबीआय आणि अर्थखात्यातील अधिकार्‍य़ांवर भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालण्याचे केलेले गंभीर आरोप आणि त्यावरती आता आताशा सुरू झालेली कारवाई बघता श्री मोदी देखील ट्रम्प ह्यांच्या सारख्या परिस्थितीला तर तोंड देत नाहीत अशी शंका मनामध्ये येते. त्याची उत्तरे काळच देईल. 

2 comments:

  1. As you said You read open secrets By M.K.Dhar.These are the reasons why we are facing issues in north east in early days now situation is getting normal but delay is there ..then requesting you to please read the Blood telegram by Garry Bass also..

    ReplyDelete
    Replies
    1. Many thanks for your reply - I have not read Garry Bass's book - thanks for referring it to me

      Delete