(सोबत स्टॅलिन व किम इल सॉन्ग)
जपानचा वरचष्मा सहन करत का होईना कोरियाने आपली प्रगती सोडली नाही. जपानला देखील कोरिया ही आपली वसाहत म्हणून वापरायची होती. त्याच्या लष्करी महत्वाकांक्षा भागवायच्या तर युद्धाच्या तयारीसाठी जपानला मजूर हवेच होते. हाती आलेल्या कोरियन प्रजेचा पुरेपूर वापर करून घेण्याचे जपानने ठरवले. कोरियामध्ये युद्धसामग्रीच्या उत्पादनाचे कारखाने चालवायचे तर त्या आधी कोरियन प्रजेला तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आवश्यक होते. जपानी लोकांनी ह्याला प्रोत्साहन दिले. परचक्रामध्ये राहणे जरी नशिबी आले होते तरीही एक प्रकारे कोरियन प्रजेच्या आधुनिक जीवनाचा पाया घातला असे दिसून येते. आज दक्षिण कोरियाने आपले आर्थिक साम्राज्य उभे केले आहे. त्याची सुरूवात जपानने केल्याचे दिसून येते. औद्योगिकीकरणाला पोषक असे विस्तीर्ण रस्ते - बंदरे - विमानतळ आदि वाहतुकीची व्यवस्था अस्तित्वात आली. कोरियाचे विद्युतीकरण करण्यात आले. फार काय पण जपानने कोरियन शेतीमध्येही आधुनिक तंत्रज्ञान आणून त्याही व्यवसायामध्ये प्रगती घडवून आणली. कमीत कमी लोकांच्या श्रमावरती अधिआधिक लोकांचे पोट भरण्याची व्यवस्था होईल अशी शेती कोरियामध्ये हो ऊ लागली. मग त्यातून जे शेतमजूर बेकार झाले - "अतिरिक्त" ठरले ते आपोआपच कारखान्यांमध्ये कामासाठी उपलब्ध झाले. कोरियावरती कब्जा मिळाल्यानंतर जपानने मांचुरियादेखील गिळंकृत केला होता. मांचुरिया हाती असल्यामुळे जपानला आशियाच्या मध्यवर्ती भागांमध्ये जाण्याची सोय झाली होती. जपानचे आर्थिक साम्राज्य त्याही भागामध्ये पसरत होते. त्या काळी विणल्या गेलेल्या ह्या आर्थिक जाळ्याचा उपयोग आजदेखील दक्षिण कोरियाला होत आहे.
सोन्याच्या पिंजर्यात ठेवले आणि गोडधोड खाऊ घातले तरी पिंजरा तो पिंजराच असतो. स्वाभिमानी कोरियन जनता जपानी महत्वाकांक्षेपायी भरडून निघत होती. आणि वारंवार बंडाचे प्रयत्न करत होती. १९१० मध्ये स्वातंत्र्य गमावल्यापासूनच कोरियन जनता बंडाची तयारी करू लागली होती. पहिला उठाव झाला तो १९१९ मध्ये. सुरूवात झाली ती एका निषेध निदर्शनमधून. शहरी सुसंस्कृत प्रजेच्या पुढाकाराने हा निषेध नोंदवला जात होता. त्यामध्ये विद्यार्थी - शिक्षक आणि इतर घटक सामिल झाले होते. शिक्षण पद्धतीचे जपानीकरण आणि कोरियन सांस्कृतिक जीवनाचा क्रमाक्रमाने जाणीवपूर्वक केला जाणारा र्हास हे ह्या मोर्चाचे तात्कालिक कारण होते. सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळेच आंदोलन बघताबघता पसरले. जपानी राजवटीला ते आटोक्यात आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळायच्या आत त्याची व्याप्ती प्रचंड झाली. अखेर कोरियाच्या सर्वदूर पसरलेल्या विभगांमधून जवळजवळ २० लाख कोरियनांनी आंदोलनात भाग घेतला - बंड मोडून काढताना ७००० व्यक्ती मारल्या गेल्या तर कित्येक लाख तुरुंगात डांबले गेले. त्यामधल्या शेकडॊंना फाशी देण्यात आली. आंदोलन दीर्घ मुदतीचे नव्हते. म्हणता म्हणता पेटले आणि तसेच विझूनही गेले. पण त्याने एक मोठे काम केले. कोरियामध्ये एक विरोधी विचाराची फळी उभी राहिली. त्यांच्यात दोन शकलेही झाली. एक गट होता तो राष्ट्रवादी विचाराचा. तर दुसरा होता कम्युनिस्ट. ह्यामधले कम्युनिस्ट जे होते त्यांच्यावरती पाश्चात्य कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता. तर आजच्या घडीला उत्तर कोरियामध्ये जो कम्युनिस्ट पक्ष राज्य करत आहे तो म्हणजे राष्ट्रवादी विचारधारा आणि उत्तर आशियामध्ये त्या काळामध्ये खेळल्या देलेल्या राजकारणाचा परिपाक आहे.
१९१७ सालच्या रशियन राज्यक्रांतीनंतर रशियन राज्यकर्त्यांनी चीन तसेच सुदूर पूर्वेतील देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती घडवून आणण्याची मोहिमच आखली होती. त्या त्या देशातील कम्युनिस्टांन प्रशिक्षण देण्याचे आणि त्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम रशिया जोमाने करत होता. चीनमध्ये क्रांती घडवून आणण्याचे रशियाचे प्रयत्न अपयशी झाले पण त्याच प्रयत्नातून कोरियामध्ये रशियाला यश प्राप्त झाले. १९२० साली शांघाय आणि कॅन्टनमध्ये कम्युनिस्टांचा पराभव झाला आणि तिथे राष्ट्रवादी शक्ती विजयी झाल्या. ह्यानंतर रशियाने आपल्याला धार्जिणे असणार्या क्रांतिकारकांन मांचुरियामध्ये आश्रय दिला. मांचुरिया रशियाला जवळ असल्याने कम्युनिस्ट क्रांतीचे केंद्र आता मांचुरियामधून काम करू लागले. क्रांतिकारकांच्या ह्या प्रयत्नांमध्ये अनेक कोरियनांचा पहिल्यापासून सहभाग होता. कालांतराने हे कोरियन क्रांतिकारकांच्या सैन्यामध्ये वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले. अशा तर्हेने ३० च्या दशकामध्ये चिनी आणि कोरियन कम्युनिस्ट जपान्यांविरोधात खांद्याला खांदा लावून लढा देत होते. जपान्यांविरोधात लढणार्या कम्युनिस्टांमध्ये ४६ पैकी आठ कोरियन कमांडर्स होते. ह्या गनिमी युद्धाची मुख्य सूत्रे होती यांग जिंग यु ह्या चिनी लढवय्याच्या हाती. यांगच्या भोवती विस्मयाचे एक प्रभावी वलय निर्माण झाले होते. १९४० मध्ये एका चढाईमध्ये यांग मारला गेला. त्याच्या पट्टशिष्यामधल्या एकाचे नाव होते किम सॉन्ग जू. शाळेमध्ये शिकत असताना त्याने एका आंदोलनात भाग घेतला म्हणून त्याला शाळेमधून काढून टाकण्यात आले होते. सरकारने त्याला तुरुंगात टाकले. तिथून निसटून तो मांचुरियामध्ये गेला आणि तिथल्या कम्युनिस्ट सैन्यामध्ये सामिल झाला. त्याने आपले नाव बदलून किम इल सॉन्ग असे ठेवले. (अर्थ एक तारा). १९४१ मध्ये जपानने ह्या लाल सैन्याला पुरते मागे रेटले - किम इल सॉन्ग आपल्या कोरियन सहकार्यांसह रशियामध्ये गेला. तिकडे रशियामध्ये बरीच कोरियन प्रजा राहत होती. पण एके काळी जपानी वर्चस्वाखाली रहिलेल्या ह्या जनतेवरती स्टॅलिन विश्वास टाकायला तयार नव्हता. त्याला शंका होती की ही मंडळी जपानशी आपले इमान राखून आहेत आणि ते रशियाशी सहकार्य करणार नाहीत. ह्या शंकेमुळे रशियामधील कोरियन प्रजेला राज्यकर्त्यांनी जबरदस्तीने स्थलांतर करायला भाग पाडले. ही प्रजा स्टॅलिनने पुढे कझाकस्तान व उझबेकीस्तानमध्ये बळजबरीने पाठवली. दुसरीकडे रशियामध्ये पोचलेले कोरियन सैन्य मात्र डाव्या विचारांशी आणि रशियाशी प्रामाणिक होते. सुरुवातील स्टॅलिनने त्यांना चिनी कमांडर्सच्या हाती काम करायला सांगितले. हळूहळू त्यांच्यामधल्या हुशार सैनिकांना उच्च लष्करी शिक्षण देण्यात आले. सोव्हिएत रशियाच्या आधिपत्याखाली कोरियावरती अंमल गाजवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचे ठरले होते. ह्या गडबडीच्या दिवसात किमची पत्नी त्याच्यासोबत रशियामध्येच राहत होती. तिथेच त्यांचे लाडके अपत्य किम जोन्ग इल ह्याचा जन्म झाला. लहानपणी जोन्ग इलचे युरा हे रशियान नाव संबंधितांमध्ये प्रचलित होते. ह्या कोरियनांना सोव्हिएत कोरियन असे नाव पडले होते. १९४५ नंतर सुदूर पूर्वेमध्ये रशियाने हस्तक्षेप करण्याचे ठरल्यानंतर कोरियन तुकडीमध्ये वाढ करण्यात आली. कोरियन तुकडी स्वतंत्र नव्हती ती सोव्हिएत सैन्याचाच एक भाग म्हणून काम करत असे.
दरम्यान कोरियाच्या भूमीवरील विरोधी शक्तींचे काय झाले होते? त्यांच्यामधल्या ज्यांना जपानने हाकलले होते ते चीनच्या अश्रयाला गेले होते आणि तिथे राहून ते कोरियामध्ये हिंसक घटना घडवत होते.जपानच्या जाचातून सुटका करून घ्यायची म्हणून काही जण निसटून अमेरिकेत गेले. दक्षिणेकडील राष्ट्रवादी विरोधकांना अमेरिका ही जपानचा शत्रू म्हणून जवळची वाटत होती. अशा तर्हेने कोरियामधील विरोधक आता भूमिकांच्या ध्रुवीकरणामुळे दोन स्वतंत्र गटात गणले जात होते. १९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांनी कोरियाचे विभाजन करण्याचा निर्नय घेतला. ३८ अक्षांशाची सीमारेखा निश्चित करण्यात आली. त्यातूनच आजच्या संघर्षाची बीजे रोवली गेली.
No comments:
Post a Comment