(Image Courtesy TOI)
ऑगस्टा विषयाला हात घातला आणि माहितीचे डोंगर समोर उभे राहिले. असो. आपल्या पद्धतीप्रमाणे पूर्ण कुंडलीसह सुरूवात. ख्रिश्चियन मिशेल ह्या शस्त्रखरेदीव्यवहारातील दलालाला दुबईमधून भारतामध्ये आणण्यात मोदी सरकारला यश मिळालेले आता दिसले तरी त्यामागे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली आहे. हे प्रयत्न मोदी सरकारच्या राजवटीमध्ये अथक सुरू होते. अतिमहत्वाच्या व्यक्तींकरता खास हेलिकॉप्टर मागवण्याचा निर्णय अटलजींच्या कारकीर्दीत झाल्यानंतर त्या खरेदीमधला नेहमीचा घोळ सुरू झाला. कराराची किंमत फारशी नसल्यामुळे मी ह्या घोटाळ्याबद्दल फारसे वाचण्यात वेळ घालवला नव्हता. त्यामुळे मोदी सरकार ह्या ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणामध्ये इतके लक्ष का घालत आहे ह्याचे गांभीर्य मला तेव्हढेसे कळले नव्हते. पण आता जसजसे वाचन चालू आहे तसतसे ह्या प्रकरणाची व्याप्ती किती प्रचंड आहे त्याची जाणीव होत आहे. ऑगस्टा प्रकरणामुळे गांधी घराणे मुळापासून का हादरावे बरे? त्याची पाळेमुळे काय आहेत? भारतामध्ये एक बोफोर्स प्रकरण आणि पंतप्रधान राजीव गांधी ह्यांच्या घरी अनाहुत पाहुण्यासारखा दिवसातून पाच सहा वेळा फेर्या टाकणारा क्वात्रोकी आणि त्याचे कारनामे आपल्याला तोंडपाठ असले तरी असे किती क्वात्रोकी भारतामध्ये वावरत होते आणि त्यांच्यामधला एकच अजूनपर्यंत आपल्यासमोर आला आहे हे बघून डोके अर्थातच सुन्न होते. किंबहुना ह्या प्रकरणाच्या पाठपुराव्यामुळेच यूपीएला राफाल प्रकरणामध्ये न झालेला घोटाळा शोधून काढावा लागला आहे असे दिसते आहे. जेणे करून ऑगस्टा प्रकरणामध्ये जर गांधी परिवारावरती सरकारने कारवाई केलीच तर "आम्ही राफालमधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत होतो म्हणून सूडबुद्धीने आम्हाला ऑगस्टा प्रकरणामध्ये गुंतवण्यात आले आहे" असा आरोप करण्याची पळवाट असावी म्हणूनच राफालकोंड्याची गोष्ट आज आपल्याला यूपीएकडून वारंवार ऐकावी लागत आहे असा माझा समज झाला आहे. प्रकरण जितके मोठे तितके त्याचे जाळे सर्वदूर पसरलेले असायचेच. मग त्याचा समाचार तुकड्यातुकड्यात घ्यावा लागतो.
ठीक आहे तर करू या सुरूवात. ख्रिश्चन मिशेल. आई - व्हॅलरी फूक्स. वडिल - वोल्फगॅंग मॅक्स रिचर्ड. सोबत दोन फोटो दिले आहेत. ख्रिश्चन मिशेल हा जन्माने ब्रिटिश नागरिक आहे. त्याचे लहानपण लंडनमधल्या पॉश वस्तीतल्या अंदाजे ४५ कोटी रुपये किंमतीच्या ज्या आलिशान घरामध्ये गेले त्याचा एक फोटो दिला आहे. (उगम newsrain.in)
लंडनमधल्या हॅरॉडस् ह्या सुप्रसिद्ध दुकानापासून काही पावलांच्या अंतरावर असलेल्या नाईटस् ब्रिज वस्तीमध्ये आईचा फ्लॅट आहे तो १६ कोटी रुपयांचा. हा फ्लॅट मिशेलची बहिण साशा हिने विकत घेतला आहे. ह्याखेरीज मिशेलचे वडिल वोल्फगॅंग ह्यांचे चेल्सी पॅडमधील घर आहे ते २७ कोटी रुपयांचे. आयरिश समुद्रामधील आयल ऑफ मॅन ह्या ब्रिटिश क्राउन डिपेन्डन्सी मध्ये स्थापित करण्यात आलेल्या कंपनीने नगद घेऊन घेतलेले घर म्हणजे वडिल वोल्फगॅंग ह्यांचे. चेल्सी पॅडमधील घराचा व्यवहार आयल ऑफ मॅन मधील मिस्टिक लिमिटेड कंपनी द्वारा करण्यात आला. ह्या कंपनीचे सेक्रेटरी म्हणून ऑप्टीमस कंपनीचे नाव मिळते. मिस्टिकचे दोन डायरेक्टर ऑप्टीमस ह्या कंपनीमध्येही काम करतात. या दोन्ही कंपन्यांचे नाव / पत्ता पॅराडाईज पेपर्स ह्या "काळ्या" कंपन्यांची नावे असलेल्या कागदपत्रामध्ये समाविष्ट केल्याचे दिसते. ह्या घरामध्ये वोल्फगॅंग २००५ पासून ते मृत्यूसमयापर्यंत म्हणजे २०१२ पर्यंत राहत होते.
वोल्फगॅंग देखील शस्त्रास्त्रव्यवहारामधले दलाल होते तसेच ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीचे कन्सल्टंट म्हणून काम करत. १९८० च्या दशकापासून ते भारतामध्ये येत असत. १९७१च्या युद्धानंतर दक्षिण आफ्रिकेशी भारताचे अनेक शस्त्रास्त्र व्यवहार झाल्याचे दिसते. (उगम India's Ocean: The Story of India's Bid for Regional Leadership By David Brewster). १९८० मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला वापरलेले जुने रणगाडे पुरवले असे लिहीताना कॉंग्रेसच्या ज्येष्ठ मंत्री श्रीमती मार्गारेट अल्वा ह्यांनी म्हटले आहे की संजय गांधी ह्यांच्याशी उत्तम संबंध असलेले वोल्फगॅंग आणि डिफेन्स प्रॉडक्शन मंत्री श्री सीपीएन सिंग ह्या व्यवहारामध्ये गुंतले होते. श्रीमती अल्वा ह्यांनी सीपीएन सिंग आणि संजय तसेच वोल्फगॅंग ह्यांच्यातील संबंधांचा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिल्यानंतर सिंग ह्यांना पदावरून दूर करण्यात आले असे त्या म्हणतात. (उगम Her Book 'Courage and Commitment – An Autobiography') (जून १९८० मध्ये संजय गांधी ह्यांचे अपघाती निधन झाल्यावरती ऑगस्ट १९८० मध्ये इंदिराजींनी मंत्रीमंडळ आणि नोकरशाहीमध्ये अनेक बदल केले व संजय ह्यांचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना दूर करून नवी रचना आणण्याच्या प्रयत्नामध्ये संरक्षण खात्यामध्ये वरिष्ठ अधिकारी पदांवरती अनेक नवे चेहरे आणले गेले. त्यावेळी श्री सीपीएन सिंग हे डिफेन्स प्रॉडक्शन मंत्री म्हणून काम करत असत.) (अशी धमकी अल्वा ह्यांनी दिली हेच एक गौडबंगाल वाटत नाही काय? तसे करताना त्यांना कोणा वरिष्ठाचा पाठिंबा होता बरे?)
वोल्फगॅंग हे एक आश्चर्यकारक व्यक्तिमत्व होते. शस्त्रास्त्रखरेदी व्यवहारांबद्दल त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आणि माहिती होती. लिबिया, रशिया, इराण, इराक, सौदी, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आदि देशांमधील व्यवहार ते हाताळत होते असे दिसते. कॉंग्रेसी वर्तुळात वावरताना वोल्फगॅंग "वॉल्टर्स" हे नाव वापरत असत. इंदिराजींच्या निकटवर्तियांना देखील ते सहज भेटू शकत होते. त्यांच्या "प्रभावा"चा विचार करून १९८० च्या दशकामध्ये श्री. गिरिशचंद्र (उर्फ गॅरी) सक्सेना ह्यांनी त्यांना R&AW च्या कामासाठी उत्कृष्टरीत्या वापरले. (सक्सेना पुढे R&AW चे प्रमुख झाले.) वोल्फगॅंग ह्यांची दिल्लीमध्ये उत्तम बडदास्त ठेवण्यात येत असे. त्यांच्या पासपोर्टसंबंधीच्या बाबी त्या त्या देशातील वरिष्ठ भारतीय अधिकारी स्वतः सांभाळत असत. वोल्फगॅंग ह्यांच्याकडे शस्त्रास्त्र बाजारामधल्या अनेक खबरा असत. आणि त्यासंबंधीची विस्तृत माहिती मिळवण्यासाठी त्यांच्याकडे अनेक सूत्रेही होती. ही सूत्रे वापरून वोल्फगॅंग R&AW च्या अधिकार्यांना पाकिस्तान कोणती शस्त्रे खरेदी करत आहे ह्याची बित्तंबातमी पुरवत होते. (उगम डीएनए). अशा तर्हेने भारतामधल्या सत्तावर्तुळामध्ये वोल्फगॅंग अगदी मिसळून गेले होते असे म्हणता येईल.
श्री. संजय गांधी ह्यांच्या मृत्यूनंतर साहजिकच वोल्फगॅंग ह्यांचा राजीवजींशी संबंध आला असावा. आजपर्यंत भारतीय माध्यमांनी श्रीमती सोनियाजी ह्यांचे राजकारणापासून अलिप्त असलेले आणि घरामध्ये रूळणारे व्यक्तिमत्व म्हणून एक चित्र उभे केले आहे - निदान इंदिराजींच्या मृत्यूपर्यंत तरी! बोफोर्स प्रकरण बाहेर आल्यावरती चिंताग्रस्त राजीव ह्यांना धीर देणार्या कर्तव्यदक्ष पत्नी म्हणून त्यांचे वर्णन आपण वाचतो. परंतु ह्या चित्राला छेद देणारे अनेक उल्लेख माझ्या वाचनामध्ये येतात. एकीकडे इंदिराजींच्या निकटवर्तियांसकट वरिष्ठ कॉंग्रेसी वर्तुळात वावरणारे वोल्फगॅंग हे R&AW शी देखील सहकार्य करत होते. म्हणजेच राजकीय वर्तुळातील बातम्या सुद्धा तेच R&AW पर्यंत पुरवत असावेत. वोल्फगॅंग आणि खुद्द राजीव ह्यांच्यामध्ये किती घसट होती? ह्या प्रश्नाचे उत्तर सरळ देता येणार नाही. पण राजीव ह्यांच्या मृत्यूनंतर सोनियाजी लंडन भेटीकरिता जात तेव्हा त्या वोल्फगॅंग ह्यांच्या निवासस्थानी मुक्काम करत ही बाब वरिष्ठ वर्तुळात माहिती होती.
राजीव ह्यांच्या मृत्यूनंतर देशामध्ये श्री. नरसिंहराव ह्यांचे कॉंग्रेस सरकार जरी असले तरी राव व सोनियाजी ह्यांच्यामध्ये सौहार्दाचे संबंध नसावेत. श्रीमती मार्गारेट अल्वा ह्यांनी म्हटले आहे की बोफोर्स प्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयावरती अपील करण्याचा निर्णय राव ह्यांनी सोनियाजींना न विचारता घेतला होता. राव ह्यांनी सीबीआयचे नियंत्रण गृहमंत्रालयाकडे न ठेवता पीएमओकडे राखून ठेवले होते. खरे तर सीबीआयची सूत्रे राव ह्यांच्या मंत्रीमंडळात काम करणार्या अल्वा ह्यांच्या हाती असायला हवी होती. अपील केले गेल्यावर श्रीमती गांधी ह्यांनी आपल्याकडे त्याविषयी चौकशी केली परंतु सूत्रे माझ्याकडे नसल्याचे मी त्यांना सांगितले आणि त्यामुळे कारवाईमध्ये मी ढवळाढवळ करू शकणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. अशा वितुष्टाच्या पार्श्वभूमीवरती सोनियाजी लंडन येथे नेमक्या कशासाठी जातात आणि कोणाकोणाला भेटतात हे कळणे गरजेचे होते. ह्यासाठी राव ह्यांनी R&AW ला विशेष सूचना दिल्या होत्या. पण खुद्द वोल्फगॅंगच R&AW ला माहिती देऊ शकत होता आणि शिवाय (बहुधा अनवधानाने) सोनियाजी तर त्यांच्याच घरामध्ये उतरल्या होत्या. (उगम - PGurus.com)
I read akk the parts upto today! Its terrific information! I wonder why its not in other languages by any other journalist(!)
ReplyDelete