Saturday, 17 June 2017

म्यानमार भेट




गेल्या दोन आठवड्यामध्ये म्यानमार आणि कतार अशा दोन नजिकच्या देशांकडे लक्ष वेधले गेले आहे. माध्यमांनी जितके लक्ष कतारला दिले तेवढे म्यानमारला दिले नाही. कारण तेथील घडामोडी अजून गुलदस्तात आहेत.

गेल्या काही दिवसामध्ये परराष्ट्र सचीव श्री जयशंकर आणि ’जंगी लाट’ जनरल बिपिन रावत म्यानमार दौर्‍यावरती जाऊन आले. ही भेट संपते तोवर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री श्री. पेमा खांडू यांनी संरक्षण राज्यमंत्री श्री भामरे तसेच किरण रिजिजू यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आणि लष्करासाठी आवश्यक असलेली जमीन त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील याची चर्चा वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत करण्यात आली. खाजगी मालकांच्या ताब्यातील जमीन लष्कराला उपलब्ध करून देण्याव्यतिरिक्त त्यावरील जंगलतोड करण्याची विशेष परवानगी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. राज्यामध्ये लष्करी दृष्टीने आवश्यक असलेली विकासाची कामे मार्गी लावण्यासाठी ही बैठक उपयुक्त ठरेल. म्यानमार देशाला लागून असलेल्या सीमावर्ती राज्यांमधले अरुणाचल हे प्रमुख राज्य आहे तर मिझोराम मणिपुर आणि नागालॅंड ह्यांचीही सीमा म्यानमारला भिडलेली आहे. ह्या चारही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि केंद्रीय गृहमंत्री यांची विशेष बैठक १२ जून रोजी झाली. भारत म्यानमार सीमेवरती मुक्तपणे येजा करण्याचे स्वातंत्र्य दोन्ही देशाच्या नागरिकांना आहे. ह्याचा गैरफायदा घेऊन इथून चोरटी शस्त्रास्त्रे - प्रतिबंधित वस्तू आणि अंमली पदार्थ आदिंची तस्करी होत असते. सीमेच्या रक्षणासाठी जी केंद्रीय सुरक्षा दले आणि राज्याची यंत्रणा काम करत असते त्याचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली गेली होती. विशेष म्हणजे अशा प्रकारे या चारही राज्यांची एकत्रित अशी ही पहिलीच बैठक होती. मोदी सरकारने ईशान्येकडील राज्यांच्या विकासाकडे आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्याकडे विशेष लक्ष पुरवले असून तिथे झपाट्याने बाजू पलटताना दिसत आहे. रावत यांच्या भेटीनंतर ह्या हालचाली नजरेत येणार्‍या असल्या तरी अर्थातच त्यामागचे घटक आहेत ते रोहिंग्या मुसलमानांचे काश्मिरात अवैधरीत्या स्थिरावणे आणि चीनचा म्यानमारवरील प्रभाव.

म्यानमारच्या बाबतीत एव्हढेच म्हणता ये्ईल की यू्पीए सरकारने सोन्यासारखी संधी गमावल्यामुळेच चीनला म्यानमारमध्ये पाय रोवणे सोपे झाले आहे. म्यानमार चिनी ड्रॅगनच्या मगरमिठी मध्ये चालला आहे. आणि त्यासाठी चीनने प्रसंगावधान राखून प्यादी हलवली आहेत. आंग सान स्यू की पाश्चात्यांच्या मदतीवर तुरुंगातून सुटल्या आणि आज म्यानमारमध्ये सत्तास्थानी आहेत ही वस्तुस्थिती आहे. पण रोहिंग्या मुसलमानांच्या प्रश्नावरती स्यू की यांनी घेतलेल्या भूमिकेची पाठराखण पाश्चात्यांनी केली नाहीच शिवाय त्यांच्यावर जबर टीका करण्यात आली. पाश्चात्यांच्या जोडीने तुर्कस्थान आणि मलेशियाने सुद्धा स्यू की यांना कोंडीत गाठायचे डावपेच खेळले. रोहिंग्या मुसलमानांच्या मानवाधिकाराच्या प्रश्नाचा गहजब करण्यात आला. पण भारत आणि जपान यांनी तेथील परिस्थितीची बूज राखत स्यू की यांना पाठिंबा दिला. तर धूर्त चीनने ह्या संधीचा फायदा उचलला. रोहिंग्या मुसलमानांशी बोलणी करण्यासाठी आपण मध्यस्थी करू अशी चीनने घेतलेली भूमिका स्यू की यांना अजिबात आवडणारी नसली तरी ह्या मुद्द्यावरतीच त्यांना नमते पाऊल घ्यावे लागले आहे. म्यानमार सरकारला सतावणारे एकूण २२ सशस्त्र बंडखोर गट असून त्यामध्ये युनायटेड वा स्टेट आर्मी UWSA आणि कचिन इंडिपेंडन्स आर्मी KIA हे प्रमुख आहेत. भारत चीन म्यानमार ह्यांच्यामधल्या सीमावर्ती भागामध्ये ह्यांच्या हालचाली सुरु असतात. ह्या गटांना चीनच शस्त्रास्त्रांसकट अनेक पद्धतीची मदत करत असतो. KIA गट भारतविरोधी उल्फा आणि NSCN(Khaplang) या फुटीरतावादी गटांना मदत करतो. UWSA आणि KIA यांच्याकडे चीनने दिलेली अत्याधुनिक हत्यारे मिळतात. चीनच्या सीमेवरील युन्नान ह्या म्यानमारच्या प्रांतामध्ये ह्या संघटना हैदोस घालत असतात. ह्या फुटीरतावादी गटांना मदत करून म्यानमारला जेरीला आणण्याचे राजकारण चीन करत असतो. आणि दुसर्‍या बाजूने स्वतःच म्यानमार सरकार आणि हे फुटीर गट यांच्यामध्ये आपण मध्यस्थी करू असे चीन सांगत असतो. अशा प्रकारे चीनने KIA संदर्भात जी मध्यस्थी केली तिकडे भारताने पूर्ण लक्ष पुरवण्याची गरज आहे. म्यानमार हे आपल्या आंतरराष्ट्रीय पटावरील एक उपयुक्त प्यादे आहे असे चीन मानतो. कारण बंगालच्या उपसागरापर्यंत व तिथून हिंदी महासागरापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला म्यानमारमधून मिळू शकतो ह्या सूत्राने चीनचे धोरण आखले गेले आहे.

चीनने धूर्तपणे पावले टाकली तरी म्यानमारचे लोक त्याच्याविषयी काय विचार करत असतील हे आपल्याच उदाहरणावरून स्पष्ट होण्यासारखे आहे. १९९० मध्ये ज्या मायतसोन धरणावर काम सुरु झाले त्यावर ३६० कोटी डॉलर्स खर्चून त्यातील ९०% वीज चीनकडे वळवायचे ठरले होते. शिवाय त्या प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या लोकांची काहीही सोय लावण्यात आली नाही. लोकांचा विरोध ध्यानात घेऊन हा प्रकल्प थायन सायन ह्या म्यानमारच्या अध्यक्षांनी स्थगित केला. स्यू की यांनी देखील चीनबरोबर एक तांब्याच्या खाणीचा करार केला ज्यातील ३०% नफा चीनला मिळणार आहे. ह्या त्यांच्या निर्णयावरती प्रचंड टीका झाली. क्याउक प्याउ ह्या बंदराच्या बांधणीमध्ये तर चीनने ७० ते ८५% शेयर्स आपल्याकडे ठेवले आहेत. शिवाय त्याला लागून ४३०० एकर एवढ्या जमिनीवरती एकॉनॉमिक झोन बनवला जाणार आहे. ह्यामध्ये चीनकडे ५१% शेयर असतील. मायतसोन धरणामधील आपला हक्क सोडण्याच्या बदल्यात क्याउक प्याउ मध्ये आपल्या मान्य कराव्यात अशी मागणी चीनने मंजूर करून घेतली आहे. हे बंदर बांधले गेले की ग्वादर प्रमाणेच चीन येथेही आपल्या युद्धनौका ठेवण्याचा निर्णय घेईल.

परंतु झाल्या चुकांची उजळणी करत न बसता पुढचा विचार समोर ठेवून मोदी यांनी गेल्या तीन वर्षांमध्ये हालचाली सुरु केल्या. एकतर व्यावहारिक दृष्टी ठेवून सरकारने हे मानले आहे की केवळ पैशाचा विचार केला तर भारत चीनची बरोबरी करू शकणार नाही. त्यातच सिटवे प्रकल्प आणि कलादान प्रकल्प व त्याच्याशी निगडित अन्य प्रकल्पांच्या पूर्ततेमध्ये अनुचित विलंब झाला आहे. गॅस उत्खननाचा प्रकल्प आपल्याला मिळाला खरा पण तो वाहून आणण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता तेथील गॅस चीनकडे वळवला गेला आहे. म्यानमारमधील बांभूंपासून कागद निर्मिती आणि काही शेतीविषयक प्रकल्पही अयशस्वी ठरले आहेत. आजच्या घडीला शिक्षण आणि प्रशिक्षण याबाबतीत भारताचे नाव मात्र चांगले आहे. ह्या सर्वांना नव्याने गती देण्याची गरज आहे. जपानच्या मदतीने तसेच बिमस्टेकच्या माध्यमातून यूपीए सरकारने वाया घालवलेली संधी पुनश्च मिळवण्यासाठी प्रचंड प्रयत्न करावे लागतील. तसेच म्यानमार सरकारच्या मदतीने फुटीरतावादी गटांना वेसण घालण्याचे आणि सीमा व अंतर्गत भागात शांतता नांदावी म्हणून बरेच काम करावे लागणार आहे. श्री जयशंकर आणि रावत यांची म्यानमार भेट अशा अर्थाने महत्वाची आहे. नजिकच्या भविष्यात म्यानमारकडून चांगल्या बातम्या ऐकावयास मिळतील अशी अपेक्षा आहे. 

Saturday, 10 June 2017

शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)



(एक सूचक फोटो तर नाही हा?)


शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO)  -  बाबा मुझे डर लगता है!

८ आणि ९ जून रोजी पंतप्रधान श्री मोदी अस्ताना - कझाकस्तान येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या मीटींगमध्ये भाग घेऊन परतले आहेत. १९९६ मध्ये पाच देशांच्या सह्कार्याने सुरु करण्यात आलेल्या ह्या संघटनेमध्ये भारत - पाकिस्तान ह्यांना ऑब्झर्व्हर - निरीक्षक - म्हणून आजपर्यंत निमंत्रण मिळत असे. पाकिस्तान नेहमीच या मीटींग्सना हजर असे पण भारत ह्या मीटींग्स मध्ये कधीकधी सहभागी होत होता. ह्या वर्षीपासून दोन्ही देशांना पूर्ण सभासदत्व देण्यात आले आहे. अर्थात सभासदत्व देण्याची प्रक्रिया बरेच आधी म्हणजे जून २०१६ मध्ये ह्या देशांनी अर्ज देण्यापासून सुरु झाली होती. २०१६ शेवटी असे सभासदत्व मिळेल अशी हवा होती. पण हे प्रत्यक्षात उतरण्यासाठी २०१७ साल उजाडले आहे. 

ह्या घटनेचे सर्वसाधारणपणे भारतामध्ये स्वागत करण्यात आले. काही निरीक्षकांनी भारताला सावधानतेचा इशारा दिला आहे. ऊठसूठ मोदी ह्यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणारे आणि त्यांच्या परदेश वार्‍यांचा खर्च रुपये आणे पै मध्ये मोजणारे महाभाग SCO बद्दल मात्र चिडीचूप आहेत. शेजारील देशांशी सौहार्दाचे संबंध असावेत वगैरे पोपटपंची नेहमीच होत असते. दहशतवाद विरोधामधली ही आघाडी असून भारत त्यामध्ये ह्याच कारणासाठी सहभागी झाला असल्याची सरकारजवळच्या सूत्रांकडून मखलाशीही करण्यात आली आहे. पण चीन हा देश केंद्रीभूत धरून स्थापण्यात आलेल्या SCO ची पार्श्वभूमी काय हे पाहिल्याशिवाय त्यामधला पेच समजणार नाही. SCO चे आजवरचे सगळे सभासद हे OBOR चेही सभासद आहेत. OBOR ची सुरक्षा ही त्या प्रकल्पाची एक अंगभूत समस्या आहे. त्याचे कारण OBOR ज्या मार्गाने जातो तो मार्ग आहे. OBOR चा मार्ग सुरक्षित नाही ही वस्तुस्थिती आहे. SCO ची संकल्पना OBOR च्या सुरक्षेसाठी राबवली जात आहे. 

SCO मध्ये पाकिस्तानला सामावून घ्यावे ही भूमिका चीनने मांडल्यानंतर रशियाने त्यामध्ये भारतही असावा अशी भूमिका घेतली होती. ती चीनला स्वीकारावी लागली. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनीच श्री. मोदी यांना त्यासाठी राजी केले असे म्हटले जाते. ह्या घडामोडी पडद्या आड होत होत्या. ही एक घटना अनेक पेचांनी भरलेली आहे. ह्या संघटनेमध्ये भारताचे सभासदत्व चीनने स्वीकारले याचा सरळ अर्थ असा होतो की भारताने सुरक्षेची हमी दिली नाही तर प्रकल्प जीवही धरू शकणार नाही ह्या वास्तवाची पावती चीनने दिली आहे. भारत आनि पाकिस्तान ह्यांच्यामध्ये विस्तवही जात नाही आणि परस्परांनी एकमेकांवर केलेले दहशतवादाचे आरोप हेच त्यांच्यातील वैमनस्याचे पुढे आलेले मूळ आहे. मग ह्या दोन देशांना सामावून घेऊन संघटना दहशतवादाला आळा घालणार कशी हा एक यक्ष प्रश्नच म्हटला पाहिजे. चीनकेंद्री संघटनेचे सभासदत्व देताना उभयपक्षी प्रश्न इथे चर्चिले जाऊ नयेत असा इशारा चीनचे अध्यक्ष शी जिन पिंग यांनी दिला होता. सार्क देशांच्या मीटींग्सवरती दोन्ही देशातील ताणल्या गेलेल्या संबंधांचे सावट नेहमीच पडलेले दिसते. ह्यामुळे सार्क आपल्या अंगिकृत उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकलेली तर नाहीच पण अनेकदा त्याच्या सभाही सुखाने होत नाहीत हा अनुभव आहे. त्या पार्श्वभूमीवरती प्रत्यक्ष सभा सुरु होण्यापूर्वी शी यांनी दिलेला हा इशारा बहुदा पाकिस्तानसाठी असावा असे विचार तुमच्या मनात येतील. परंतु पाकिस्तान हा आजच्या घडीला चीनचा बटिक झाला असल्यामुळेच आपण सांगितले की पाकिस्तान ऐकणार ह्याची चीनला खात्री होती. पण भारताबाबत मात्र अशी खात्री नसल्यामुळेच खरे तर शी ह्यांचा हा इशारा भारतासाठी होता असे मानता येईल. 

ज्या OBOR मध्ये भारताने सहभागी होण्याचे कटाक्षाने टाळले आणि तसे करण्यामागे आपल्या सार्वभौमत्वाला असलेले आव्हान आणि देशाच्या सुरक्षेचा हवाला देण्यात आला त्या OBOR च्या संरक्षणाच्या संघटनेमध्ये भारताने सामिल होण्यासाठी राजी व्हावे ही बाब सामान्य असूच शकत नाही. मोदींचे विरोधक म्हणून वावरणारे दिवटे एकतर चीनचे मांडलिक आहेत नाही तर पाकिस्तानचे. तेव्हा अशा विरोधकांकडून त्यावर टीका होईल अशी अपेक्षाच करू शकत नाही. उरलेले काही अमेरिकेची पाठराखण करतात. त्यामुळे माध्यमांमधून टीकेचा सूर ऐकू आलेला नाही. पण असे असले तरी ह्या घटनेमुळे एक प्रकारची अस्वस्थता खास करून भारतीय सुरक्षा यंत्रणेमध्ये आहे हे लपून राहत नाही. योगायोगाची गोष्ट अशी की जवळच्याच ताश्कंदमध्ये १९६६ मध्ये रशियाच्या दडपणाखाली भारताने पाकिस्तानशी शांतता करार केला होता. ह्या करारामुळे भारतीय नेतृत्वाने आपले कायदेशीर हक्क सोडल्यामुळे भारतामध्ये नाराजीचे सूर होते. भारतीय डिप्लोमसीचे हे अपयश मानले गेले होते. आजदेखील SCO मधील प्रवेशाचे नेमके समाधानकारक उत्तर मिळत नाही हेच खरे. विरोधकांनी मौन धरल्यामुळे त्यावर गहजब सुद्धा झालेला नाही. शिवाय SCO मध्ये सामिल होण्यातून भारत OBOR मध्येही सामिल झाल्याचा गवगवा चीनने केला आहे. त्यामुळे संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहेत.

SCO मधील कझाकस्तान - किरगिझिस्तान - ताजिकीस्तान - उझबेकीस्तान - रशिया आणि प्रत्यक्ष चीनबरोबरही भारतीय सैन्य संयुक्त लष्करी कवायती करत नाही का? मग ह्या देशाबरोबर असलेल्या सहकार्याचा फायदा तर या आधीही मिळत होताच की. मग ह्या संघटनेचे सभासदत्व स्वीकारण्याचे कारण काय? SCO च्या व्यासपीठामधून सुरक्षा विषयामधील अंमली पदार्थांची तस्करी आणि इंटरनेट सुरक्षा ह्या क्षेत्रामधली अधिक माहिती भारताला उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे.  पण SCO च्या तरतूदींनुसार यातले देश एकमेकांबरोबर संयुक्त लष्करी कवायती करत असतात. मग अशी कवायत भारतीय सैन्याने पाकड्यांबरोबर करायची का हा मोठा गहन प्रश्न आहे. कदाचित म्हणूनच सुरक्षा यंत्रणा नाराज असाव्यात. परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने ह्या ’लष्करी’ कवायती नसून दहशतवादविरोधी कवायती आहेत असे स्पष्टीकरण दिले आहे. ते गळ्याखाली उतरत नाही. 

अशा पार्श्वभूमीवरती ’बाबा मुझे डर लगता है’ अशी माझी मनःस्थिती आहे. कदाचित कटु वास्तवाच्या काही बाबी मी लक्षात घेत नसेन. रशिया - चीन - पाकिस्तान हा जो शक्तिमान त्रिकोण आपल्या परसदारामध्ये तयार झाला आहे त्याचा मुकाबला करणे सोपे नाही. त्यातल्या त्यात रशियाला जवळ ठेवणे सोपे आहे. अमेरिकेने आणि खास करून ट्रम्प यांनी Pivot to Asia हे धोरण राबवावे ही अपेक्षा होती. पण अमेरिकन परराष्ट्र खात्यामधील सूत्रांनी ट्रम्प यांचे लक्ष त्यापासून उडवून ते पुनश्च मध्यपूर्वेकडे नेले आहे. त्याचीच परिणती म्हणून ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला आणि त्यामध्ये काही भूमिका घेतली आहे. ह्या परिस्थितीमध्ये भारताने पावले जपून टाकावीत हे स्वाभाविक म्हटले पाहिजे. कदाचित असे सभासदत्व घेतल्याने भारताचा NSG प्रवेश आणि मौलाना मासूद याला दहशतवादी ठरवणे ह्या प्रश्नावरती आपण चीनला राजी करू अशी हमी मोदी यांनी पुतिन यांच्याकडून घेतली आहे का अशी शंका मनात येते. तसे असेल तर त्या प्रश्नांवरती चीनचे सहकार्य सुलभही हो्ऊ शकते - कोण जाणे!! कधी कधी मनापासून पटले नाही तरी वरकरणी का होईना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मोदी सरकारने घेतलेला SCO प्रवेशाचा निर्णय त्यामध्येच मोडत असावा. त्यामागची खरी भूमिका रणनीती स्पष्ट होईलच. तेव्हा तिच्यावर अधिक विचार करता येईल.




Saturday, 3 June 2017

रूहानींची बिकट वाट





रूहानींची बिकट वाट

१९ मे रोजी इराणमध्ये निवडणुका झाल्या - त्याचे निकाल २० मे रोजी जाहीर झाले. ह्या निवडणुकीमध्ये हसन रूहानी पुनश्च अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. याअगोदर २०१३ साली निवडणूक पहिल्यांदा जिंकणार्‍या रूहानी यांची ही दुसरी कारकीर्द असेल. ह्या निवडणुकीचा खास उल्लेख अशासाठी केला आहे की  रूहानींच्या विजयामुळे अत्यानंद झालेले नागरिक - अगदी स्त्रियांसकट - तेहरानच्या रस्त्यांवरती मनामध्ये इस्लामी कायद्याची कोणतीही भीती न ठेवता सैरभैर हो ऊन जल्लोष करायला उतरले. तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले तर नाहीच पण स्मितहास्य करत प्रोत्साहनच दिले. १९७९ मध्ये इराणच्या शहाची उचलबांगडी करून जे एक सत्तापर्व सुरु झाले त्यानंतर ह्या जनतेने खूप भोगले आहे. रूहानी यांची निवड करून आता हे इस्लामी कट्टरतेचे पर्व संपवा असा आपल्या मनामधला आक्रोश ही जनता न घाबरता मांडत होती. त्यांचा उत्साह बघून रूहानी यांना स्फूर्ती मिळायला हरकत नाही.

तसेही इराणमध्ये १९८१ पासून प्रत्येक अध्यक्षाला जनतेने दोनदा निवडले आहे. त्यांच्या अगोदरचे अध्यक्ष अहमदीनीजद हे इराणचा अणुकार्यक्रम न सोडण्यासाठी आणि त्यासाठी अमेरिकेचा रोष पत्करण्यासाठी ओळखले गेले. रूहानी त्यामानाने सौम्य आहेत. आपली पहिली कारकीर्दीमध्ये त्यांनी इराणचे आर्थिक प्रश्न सोडवण्याकडे लक्ष घातले. शिवाय इराणवरील आर्थिक संबंध उठवण्याच्या अटीवरती त्यांनी युनोशी (आणि पर्यायाने अमेरिकेशी सुद्धा) करार केला. अहमदीनीजद यांनी अंगिकारलेल्या संघर्षाच्या मार्गाचा त्याग करत कमीत कमी विरोधाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. (Path of Least Resistance) आपल्या पहिल्या कारकीर्दीमध्ये त्यांनी केलेल्या कामाला जनतेने पसंती दिली आहे पण तिची पार्श्वभूमी काय हे उद् बोधक आहे.

अयातोल्ला खोमेनी यांच्या नंतर आलेले इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी आता कर्करोगग्रस्त झाले आहेत. त्यांच्या जागी कोणी तरी उत्तराधिकारी असणे गरजेचे आहे. म्हणून खामेनी यांनी इब्राहिम रईसी यांना पुढे आणले ते इराणच्या सर्वात मोठ्या धर्मादाय संस्थेचे प्रमुख म्हणून. त्याअगोदर रईसी इराणी न्यायसंस्थेमध्ये काम करत. तिथे त्यांनी अटॉर्नी जनरल आणि डेप्यूटी चीफ जस्टीस म्हणून पदे भूषवली. रईसी हे अर्थातच इराणमधील कट्टरपंथी इस्लामवादी आहेत आणि ते त्याच गटातर्फे निवडणुकीमध्ये उभे होते. न्यायसंस्थेच्या कामामध्ये ते आपल्या विरोधकांना अत्यंत निर्दय वागणूक देत असत अशी त्यांची ख्याती आहे. खामेनी यांनी कट्टरपंथी गटाची ताकद रईसी यांच्यामागे उभी केली होती. १९७९ पासून इराणमध्ये जो मार्ग अवलंबला गेला त्याच मार्गाने जाण्याचे वचन रईसी देत होते तर त्यांचे विरोधक आणि सत्तारूढ रूहानी मात्र जनतेला प्रिय वाटणारा मार्गाचे उच्च रवाने प्रतिपादन करत होते.

इरानची अर्थव्यवस्था आजही सरकारी कह्यात आहे. रईसी यांना उच्चशिक्षित तंत्रज्ञ व्यवस्थापक म्हणून नको आहेत तर त्यांना धार्मिक गुरुंची वर्णी अशा जागी लावायची आहे. जागतिकीकरणाला विरोध - रशियाकडे आणि पर्यायाने चीनकडे झुकलेली परराष्ट्रनीती - पाश्चात्य विरोधी धोरण - जगामध्ये शिया राजवटींचे समर्थन - सिरियाच्या बश अल् असद यांची सत्ता टिकवण्याला प्राधान्य - लेबॅनॉनमध्ये हिज़्बोल्लाचे समर्थन - मुक्त संस्कृतीला विरोध - स्त्रियांना कमी लेखण्याची प्रवृत्ती हे जे ’पॅके” रईसी जनतेला देऊ पाहत होते ते आवडायचे दिवस आता संपले. एक काळ असा होता की अमेरिकेचा दास बनला म्हणूनकट्टरपंथी इस्लामने इराणचे जीवन व्यापून टाकले होते. आज समाज ती मूल्यव्यवस्था स्वीकारायला तयार नाही.

निवडणुकीमध्ये रूहानी यांना ६०% इतकी मते देऊन जनतेने निर्विवादपणे हे सिद्ध केले की त्यांना कशाप्रकारच्या भविष्याची आस लागली आहे. तेहरानच्या र्स्त्यावरती उतरलेल्या लोकांच्या हाती फलक होते ते बाय बाय रईसी सांगणारे. त्या जमावामध्ये मध्यमवर्गीय इराणी होते तसेच गरीबही. फाटके बूट घालून फिरणारे बेकारीचा सामना करणारे तरूण होते तर काही गाड्या घेऊन फिरत होते. गाड्यांमध्ये मोठ्या आवाजातले संगीत चालू होते. पायी फिरणारे तरूण मुठी उंचावून रूहानी यांचे स्वागत करत होते. बेभान होऊन गात - नाचत होते. डोळ्यावर पाश्चात्य धर्तीचे गॉगल्स - पाश्चात्य धर्तीचे टीशर्ट घातलेले तरूण गर्दीत होते. कुटुंबवत्सल माणसे बाबागाड्यांमध्ये लहानग्यांना घेऊन आले होते. स्त्रिया मुक्तपणे वावरत होत्या - जल्लोषामध्ये सामिल झाल्या होत्या. लोकांचा उत्स्फूर्त जमाव वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी होता की लोकांना आता स्वातंत्र्य हवे आहे. कधी नव्हे तो कित्येक वर्षांनंतर इराणमध्ये लोक उघड उघड राजकीय घोषणा देत होते. २०११ साली तुरुंगात टाकलेल्या माजी पंतप्रधान मीर हुसेन मुसावी - त्यांची पत्नी जेहरा - माजी लोकसभा अध्यक्ष मेहदी करूबी यांची सुटका करावी अशी मागणी होत होती. इतके होऊनही पोलिस लोकांना अडवत नव्हते. 

कट्टरपंथी इस्लामच्या जोखडाखाली भरडले गेलेले हे लोक आता स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत आहेत. ह्या बदलाचा अर्थ पुन्हा एकदा समजून घ्यावा. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीनंतर मुस्लिम समाजामध्ये कट्टरपंथ नाकारण्याची लाट आली आहे आणि भारतीय मुसलमानच जगाला यातून सुटकेचा मार्ग दाखवेल असे मी म्हटले होते. (http://swatidurbin.blogspot.in/2017/03/blog-post_78.html) इराणची निवडणूक हाच संकेत देत आहे. कट्टरपंथीय इस्लामच्या मागे मुस्लिमजनता जायला राजी नाही हा प्रचंड मोठा बदल आहे. तो सहजासहजी पचनी पडणार नाही. जे इराणमध्ये होते ते पाकिस्तानात झाल्याशिवाय राहिल का? मुस्लिम जगतामधला हा भूकंप असा आहे की ज्याची चीन - रशिया आणि अमेरिकेनेही दखल घ्यावी. इराणची जनता हा कौल देत होती आणि स्वातंत्र्याची मागणी करत होती तेव्हाच ट्रम्प साहेब सौदी अरेबियामध्ये इराणविरोधात आघाडी करण्यासाठी पुढाकार घेत होते. इस्राएलला अण्वस्त्राम्च्या धमक्या देणार्‍यांना जनतेने घरात डांबले आहे. ते सहजासहजी आपली सत्ता सोडणार्‍यातले नाहीत. पण अशावेळी उदारमतवादी चेहरा असलेल्या नेत्यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका बजावता आली तरी परिस्थितीमध्ये फरक पडण्यास हातभार लागेल. रूहानी यांची वाट बिकट आहे. पण आजवरच्या अनुभवामधून जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वासाला ते पात्र ठरतील अशा भविष्याची आपणही अपेक्षा करू या. 


Friday, 2 June 2017

शेतकर्‍यांचा संप - एक निमित्त

Image result for balasaheb thakre


शेतकर्‍यांचा संप - एक निमित्त

शेतकर्‍यांनी काल संप केला म्हणून तावातावात समर्थन आणि विरोध करणारे आज थंड होतील कारण चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला आहे. ह्यामध्ये संपाला विरोध करणारे बव्हंशी अशा”समजा’त दिसले की हा संप शेतकर्‍यांच्य कळवळ्याने नव्हे तर मुख्यमंत्र्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा डावपेच आहे.

पण हे पूर्ण सत्य नाही. उत्तर प्रदेश व अन्य राज्यांमधल्या मोदींच्या विजयानंतर मोदींना तोंड कसे द्यावे याच्या व्हूहरचनेची ही रंगीत तालीम आणि चाचपणी होती. २०१४ मध्ये मोदी सत्तेमध्ये आले त्यानंतर अल्पसंख्य - महिला - दलित ह्यांच्यावरील अत्याचाराचे कारण दाखवून विरोधाचे नाटक करण्याचे ठरले पण त्यामध्ये यश आलेले नाही. त्यामुळे  नवे सोंग उभ करावे लागत आहे. आता विरोधाची ’लाईन’ बदलण्यात आलेली दिसते. शेतकर्‍यांवरील अन्याय हा त्यामधला उठाव करण्याचा एक मुद्दा आहे. 

शेतकर्‍यांवरील अन्याय हा विषय असा आहे की सामान्य जनतेची सहानुभूती शेतकर्‍याकडे जाते - सरकारकडे नाही मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार असो. म्हणजेच हा असा बेचक्यातला विषय आहे की सरकार अन्याय करणारे आहे ही प्रतिमा अगदी सर्वदूर सर्वसामान्यांपर्यंत सहज उभी करता यावी. तसेच या ना त्या अन्यायाने गांजलेला शेतकरी स्वाभाविकपणे त्याच्याशी भावनिक जवळीक करू शकतो. शिवाय अशी सहानुभूती वापरत शेतकरी ’क्रांती’ मधूनच माओवादी पुढे घुसण्याचा प्रयत्न करत असतात.

शेतकरी हे ’मॉडेल’ बनवल्यानंतर युद्धभूमी कशी निवडावी हेही पाहण्यासारखे आहे. त्यासाठी इतर कोणतेही राज्य न निवडता महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. ह्यामध्ये फडणवीसांना घेरण्याचा मुद्दा प्राधान्याचा नाही. मूळ लक्ष्य मोदीच आहेत. पण निवड महाराष्ट्राची अशासाठी केली आहे की मोदींना टक्कर देणार्‍या ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शक्ती उरल्या आहेत त्यातल्या प्रबळ म्हणता येतील अशा महाराष्ट्रात आहेत. शिवाय शक्ती ही अशी असायला हवी की जिने सर्व सामान्य हिंदूंना हिंदू म्हणून फटकारलेले नाही. ह्या वर्णनामध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र बसतो नितिश किंवा ममताजी बसत नाहीत. मोदींची ’हिंदुत्वाची’ मतपेटी फोडायची तर हिंदूंना त्यांच्यापासून वेगळे काढायला हवे ना? मग वारंवार पाटी बदलून मतदार कशाला भुलतो ह्याची चाचपणी करता येते.

मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली - मागण्या मान्य केल्या आणि संप संपला इतके सोपे नाही. मुळात हा संप लांबवायचा नव्हताच. ती एक 'Dip Stick Test' होती. 

मोदीही शांत आहेत कदाचित तेही ह्यात स्वतःची 'Dip Stick Test' करत नसतील कशावरून? संयुक्त महाराष्ट्र समितीचा जन्म मराठी अस्मितेपोटी झाला. पुढे कम्युनिस्टांनी ती चळवळ हडप केली. समिती कम्युनिस्ट म्हणतील तशी वळते ह्याचा राग म्हणून जनता बाळासाहेबांच्या मागे उभी राहिली. आजची ’समिती’ अशीच कन्हैय्या आणि कम्युनिस्टांच्या नादी लागली आहे का? तिला वळवायला कोणी उभा राहणारच नाही का? मराठी अस्मिता अजूनही फणा काढू शकते हे मोदी जाणतात. तेव्हा तेही आपली 'Dip Stick Test' करत असावेत. 

मोघम लिहिले आहे.  समजून घ्यावे.

😊😊


Sunday, 28 May 2017

ड्युरांड लाईनची कालबाह्यता

Image result for durand line




ड्युरांड लाईनची कालबाह्यता

नुकतेच युरोपियन संसदेच्या बातम्या देणार्‍या EPTODAY ह्या संकेतस्थळावरती संसदेचे उपाध्यक्ष पोलिश - ब्रिटिश नागरिक श्री. रिझार्ड झारनेकी यांनी ब्रिटिशांनी आखलेली ड्युरांड लाईन कालबाह्य झाली असून तिचा फेरविचार होणे गरजेचे आहे असे मत १२ मे २०१७ रोजी मांडले आहे. पाक - अफगाण सीमेवरती वारंवार घडणार्‍या धुमश्चक्रीच्या बातम्या हेच दर्शवतात की झारनेकी यांनी एका महत्वाच्या विषयावर केलेले प्रतिपादन आपण समजून घेतले पाहिजे.

५ मे रोजी अफगाणिस्तानने चमन सीमेजवळ चढवलेल्या हल्ल्यामध्ये ११ पाकिस्तानी ठार झाले तर ७ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या चढाईमध्ये २ अफगाण नागरिक ठार झाले असे वृत्त होते. १९४७ साली ब्रिटिश भारतीय उपखंडातून बाहेर पडले तेव्हा NWFP प्रांतातील पश्तून लोकांना पाकिस्तानमध्ये अजिबात जाण्याची इच्छा नव्हती. पश्तून लोकांच्या निष्ठा धर्माकडे नसून आपल्या राष्ट्रा  कडे होत्या. पाकिस्तानातील पंजाबी मुसलमानांवरती त्यांचा विश्वास नव्हता. पश्तूनी लोकांना भारतामध्ये घ्या म्हणून त्यांचे नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांनी असा लकडा गांधी - नेहरू यांच्याकडे लावला होता. परंतु ब्रिटिशांनी त्यांचे ऐकले नाही. तीच परिस्थिती बलुचिस्तानची आहे.

अफगाणिस्तानमध्येही पश्तून लोकांची संख्या लक्षणीय आहे. म्हणून निर्मितीपासूनच अफगाणिस्तानने ड्युरांड लाईन कधीच मान्य केली नाही. अगदी पाकिस्तानप्रणित तालिबानांचे राज्य होते तेव्हाही पाकिस्तानने तीन वेळा प्रयत्न करूनही अफगाणिस्तानच्या एकाही सरकारने ही सीमा मान्य केलेली नाही.

१९४७ नंतर आताच्या परिस्थितीमध्ये येथील पश्तूनांमध्ये पाकिस्तानी पंजाब्यांबद्दल रोष कमी न होता वाढीला लागला आहे. १९४७ नंतर पाकिस्तानने कोणत्याही प्रकारे ह्या NWFP प्रदेशामध्ये विकासाचे नावही पोचणार नाही अशी व्यवस्था राबवली आहे. तसेच मधल्या पश्तूनांना अफगाण पश्तूनांची मदत मिळू नये म्हणून अफगाणिस्तानमध्ये कोणतेही सरकार स्थिर राहणार नाही ह्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन कारवाया केल्या आहेत. होता होईल तितका पाकिस्तानने आपल्या जिहादी कारवायांसाठी मरायला तयार असलेल्या पश्तूनांचा वापर करून घेऊन त्यांच्या जीवावरती आपले NWFP प्रदेशामध्ये वर्चस्व कायम राहावे म्हणून धोरण राबवले आहे. अफगाण सरकार अस्थिर ठेवण्याच्या नादामध्ये पाकिस्तानने हाच NWFP प्रदेशही तेव्हढाच अस्थिर ठेवला आहे. इतका की इथले नागरिक मुक्तपणे अफगाणिस्तानमध्ये येऊन जाऊन असतात आणि त्यांना अडवणारी कोणतीही यंत्रणा तिथे नाही. अफगाणिस्तानमधून होणारे हल्ले थांबवण्यासाठी आता पाकिस्तानने तिथे कुंपण बांधण्याचे ठरवले आहे.

ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. जोपर्यंत ड्युरांड लाईन हीच आंतरराष्ट्रीय सीमा आहे हे जग मान्य करते तोपर्यंत पाकिस्तान आपल्या कारवाया चालूच ठेवणार आणि अफगाणिस्तानमधील परिस्थिती अस्थिर ठेवून आपल्या कह्यात कशी राहील याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. पाकिस्तानला ह्या भागामध्ये शांतता असावी असे अजिबात वाटत नाही. मध्या आशियाकडे जाण्याचा मार्ग आपल्या ताब्यात असावा ह्या वेडाने त्याला झपाटले आहे आणि आज चीनही ह्याच भूमिकेला पाठिंबा देत आहे. अगदी आताआता पर्यंत पाश्चिमात्य देशांनी आणि अमेरिकेनेही ब्रिटिशांच्या घोडचुकीवर आपले शिक्कामोर्तब केले आहे.

अफगाणिस्तानमधील शांतता आज पाश्चिमात्य देश आणि अमेरिकेसाठीही अग्रक्रमाची ठरली आहे. तिथे जोवर शांतता नाही तोवर अमेरिकेला तिथले सैन्य पूर्णपणे काधून घेता येणार नाही. शिवाय प्रचंड राजकीय असंतोषामधून निर्माण होणार्‍या सामाजिक असंतोषाचा परिणाम म्हणून अफगाणिस्तानमधून निर्वासितांची रीघ पश्चिमेकडे लागली आहे. २०१५ साली सिरियामधून पश्चिमेकडे गेलेले निर्वासित ३६२००० होते तर अफगाणिस्तानमधून गेलेले १७५००० होते. यामध्ये सिरियाचा नंबर पहिला तर अफगाणिस्तानचा दुसरा लागतो.

NWFP ची भूमी अजूनही मुजाहिदीनांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते. सप्टेंबर ११ च्या हल्ल्याचे नियोजन इथूनच झाले. २००१ नंतर मूळ प्रश्नाला हात घातला गेला नाही. म्हणून अफगाण प्रश्न लांबत गेला आहे. झारनेकी म्हणतात की पाश्चिमात्य जगताला आपल्या अफगाण धोरणाचा पुनर्विचार करणे ही अत्यावश्यक बाब झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये पैसा ओतून अपेक्षित विजय मिळणार नाही. तिथे शांतता नांदली तरच काही हाती लागेल ही बाब महत्वाची आहे असे झारनेकी म्हणतात.

झारनेकी यांनी स्पष्ट सांगितले नाही तरी आपण त्यात लपलेला अर्थ समजून घेतला पाहिजे. पाश्चात्यांचे अफगाण धोरण फसले आहे कारण त्यांचे पाकिस्तान धोरण फसले आहे. तेव्हा अफगाण धोरण बदलायचे म्हणजेच पाकिस्तान धोरण बदलावे लागेल् असे वस्तुनिष्ठ विचार झारनेकी यांनी मांडले आहेत. युरोपियन युनियनच्या उपाध्यक्ष पदावर बसलेल्या ह्या महत्वाच्या व्यक्तीकडून केले गेलेले हे विश्लेषण भारतासाठी अर्थातच उपयुक्त आहे हे सांगायला नको.

१९७९ साली अफगाणिस्तानमधील रशियनांना हुसकावून बाहेर काढण्याच्या अमेरिकन धोरणाला श्रीमती इंदिराजींनीही विरोध केला होता. तुम्ही जी शस्त्रे रशियाशी लढण्यासाठी देत आहात ती भारताविरुद्ध वापरली जात आहेत असे बजावून सुद्धा अमेरिकेने त्याकडे ढुंकून बघितले नाही. रशियाच्या बंदोबस्तासाठी चीनशीही दोस्ती केली. आज त्याची फळे हे पाश्चात्य भोगत आहेत. कोणताही डेमोक्रॅट अध्यक्षाने ह्या धोरणामध्ये बदल करण्याचा विचारही केला नसता. आज ट्रम्प साहेब कदाचित असा विचार करतील ही अंधुक का होईना आशा आहे. किंबहुना परिस्थितीच असा बदल घडवायला कारणीभूत ठरेल.

एका बाजूला अफगाणिस्तान तर दुसरीकडे इराण पाकिस्तानच्या सीमेवरती धुमश्चक्री च्या बातम्या येत आहेत. भारतीय बाजू तर आपल्याला चांगलीच माहिती आहे. सगळीकडून घेरला गेला तरी खुमखुमी जात नाही कारण चीन आपल्या पाठीशी आहे ही मस्ती आहे. ही मस्तीच पाकिस्तानला कुठे घेऊन जाईल हे स्पष्ट आहे.

Saturday, 27 May 2017

झिबग्नियो ब्रेझेझिन्स्की

Image result for brzezinski zia



श्री. झिबग्नियो ब्रेझेझिन्स्की यांचे २६ मे २०१७ रोजी निधन झाले. ब्रेझेझिन्स्की हे अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांच्या राजवटीमध्ये म्हणजे १९७७ ते १९८१ या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. ब्रेझेझिन्स्की यांच्या कार्यकाळामध्ये तैवान प्रश्नावर चीनची भूमिका स्वीकारत सामंजस्य घडवणे - स्ट्रेटेजिक आर्म्स लिमिटशन ट्रीटी २ -   इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात आणि इज्राएलचे पंतप्रधान मेनाचेम बेगिन यांजबरोबर आपसातील वैर मिटवण्यासाठी पहिले पाऊल टाकणारा कॅम्प डेव्हिड करार - इराणमधील उलथापालथ आणि अमेरिकेचा दोस्त असलेला शहा याची उचलबांगडी करून अयातोल्ला खोमेनी सत्तारूढ होणे - अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्य घुसणे - पाकिस्तानच्या मदतीने जागतिक जिहादसाठी अमेरिकेने दिलेला सर्वंकष पाठिंबा ह्या पुढच्या चार दशकांवर प्रभाव पाडणार्‍या ठळक घटना घडल्या.

’द ग्रांड चेस बोर्ड’ या १९९७ मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकामध्ये चीन सोडाच पण भारत पाकिस्तानशी सुद्धा युद्ध जिंकू शकत नाही असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. अण्वस्त्रे आहेत म्हणून कोणी युद्ध जिंकत नाही. त्यासाठी संपूर्ण संरक्षण धोरण असावे लागते. भारताने युद्धसामग्री भरपूर जमवली आहे. आणि त्याच्याकडे सैन्य सुद्धा आहे. पण आपल्या संरक्षणासाठी शत्रूबद्दलची पुरेशी जाण - त्याच्यापासून कोणत्या प्रकारचा आणि किती धोका आहे याचा अंदाज - युद्ध कुठे छेडले जाऊ शकते आणि कसे लढले जाईल या व अशाच इतर गोष्टींबद्दलचे भारताचे ज्ञान तोकडे आहे आणि त्यामध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच भारताकडे लष्करी जमवाजमव आहे पण सामर्थ्य नाही ही कटू वस्तुस्थिती आपल्याला वारंवार निदर्शनास येते. १९६२ च्या लढाईमध्ये अचानक झालेल्या आक्रमणानंतर सावरलेल्या भारतीय सैन्याने जुळवाजुळव केली होती पण तोपर्यंत चीन माघारी परतला होता. १९७१ मध्ये मार्च महिन्यात सैन्याने बांगला देशात कूच करावी म्हणून इंदिराजींनी श्री मानेकशा यांच्याकडे चर्चा केली असता या प्रकारच्या कारवाई साठी आपले सैन्य तयार नाही असे स्पष्ट उत्तर मानेकशा यांना द्यावे लागले. प्रत्यक्षात त्यांनी पुढे नऊ महिने तयारीसाठी घेतले. पाकिस्तानची सहा लाखाचे फौज भारताच्या तेरा लाखाच्या फौजेला डरत नाही हे आपण बघतो. तीन दशकांपुरते प्रॉक्सी वॉरचा सामना करूनही आपल्याकडे त्यावर दमदार धोरणातक उत्तर नाही हेच चित्र प्रामुख्याने पुढे येते. कारगिल युद्धाच्या वेळी सैन्याला आपली कुमक कार्यरत करायल इतका वेळ लागला की त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवरती गवगवा केला आणि भारताला खेळी करण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आली. आजदेखील पाकिस्तान किंवा चीन एखादे छोटे युद्ध भारतावर लादेल - मोठे नाही - असे मोठ्या मुत्सद्दीपणे इथले विद्वान सांगत असतात. हे देश छोटे युद्ध का करणार याचा अर्थ इथे समजून येतो. छोट्या युद्धासाठी प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. (ती क्षमता निर्माण करण्याचे काम मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुरु झाले आहे. तसेच केवळ Defensive नव्हे तर offensive-defensive असा पवित्रा असावा असे म्हणणारे दोवल जुने धोरण बदलत आहेत. हे चुटकीसारखे होत नाही. तयारी पूर्ण होईपर्यंत म्हणजे १९७१ सारखा आज संयम दाखवावा लागेल)

जगामध्ये अण्वस्त्रांच्या प्रसारावरती निर्णायक रोख लागू शकली नाही कारण संपूर्ण जगाचे हित लक्षात घेऊन अमेरिकेने प्रामाणिकपणे हे प्रयत्न केले नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. अलिकडच्या काळामध्ये म्हणजे ओबामा सत्तेवर असतानाच २०१५ साली वाढते ओबामा - मोदी संबंध पाहता ब्रेझेझिन्स्की यांनी इशारा दिला होता की अमेरिकेने भारताशी फार जवळीक केली तर रशिया दुरावण्याचा धोका आहे. ज्यांनी अफगाणिस्तानमधून रशियाला हटवण्यासाठी जीवाचे रान केले तो निरीक्षक अमेरिकेने रशियापासून फार दूर जाऊ नये असे मत मांडतो हे बघितले तर उच्च पदावरील व्यक्तीला पूर्वग्रह दूर ठेवून विचार करावा लागतो हे कळेल.

ब्रेझेझिन्स्की यांच्यासारखे विद्वान भले भारताचे मित्र नसतील पण त्यांच्या लिखाणामधूनही आपल्याला दिशा मिळू शकते. भारतीय परंपरेनुसार त्यांना श्रद्धांजली.

सोबतच्या छायाचित्रामध्ये जनरल झिया यांच्या बाजूला उभे असलेले कार्टर आणि मागे उभे असलेले झिबग्नियो ब्रेझेझिन्स्की

Wednesday, 24 May 2017

काही गेल्या दिवसातील लहानमोठ्या पोस्टस्

२२ मे २०१७

ट्रंप साहेबांनी काल सौदी अरेबियाला घसघशीत मदत देऊ केली आहे तसेच इराणला घेरण्यासाठी पाठिंबा दिला आहे. भारतासाठी ही बातमी चांगली नाही. एकतर इराण हा आपला धोरणमित्र आहे. त्याला पाठिंबा देणारा रशिया भारत द्वेष्टा नाही. अमेरिकेचे लक्ष मध्यपूर्वेत गुंतले तर चीनचा बंदोबस्त करण्यासाठी तिच्या कडे बँडविड्थ उरत नाही. सारांश आपली लढाई आता आपल्यालाच लढायची आहे फक्त स्वबळावर कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता.


२१ मे २०१७

रहस्यमय कागदपत्र

आंतरराष्ट्रीय कोर्टाची न्यायकक्षा कोणत्या परिस्थितीमध्ये भारत मान्य करतो आणि त्याचे अपवाद काय आहेत याचे सविस्तर घोषणापत्र   कोर्टासमोर भारताने १९७४ मध्ये दिले आहे. पाकिस्तानने जे घोषणापत्र १९५७ मध्ये दिले आहे त्यामध्ये जवळ जवळ ६० वर्षे काहीच बदल केला नव्हता.  नवे घोषणापत्र जे दिले गेले त्यानुसार कोर्टाची अधिकार कक्षा ज्या शब्दात दिली गेली त्यामध्ये कुलभूषण जाधव ही केस बसू शकली. तारीख आहे २९ मार्च २०१७!!!! हे कोर्टापुढे ठेवण्याचे काम श्रीमती मलिहा लोधी यांनी केले. यानंतर दोनच आठवड्यामध्ये पाकिस्तानी लश्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली.  म्हणजेच २९ मार्च २०१७ चे घोषणापत्र नसते तर भारताचे म्हणणे कमकुवत ठरले असते.

पाकिस्तान बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष डॉ. फरोघ नसीम म्हणतात की घोषणापत्र देण्याची चूक तर अक्षम्य आहेच पण ती सुधारायची संधीही पाक सरकारने गमावली आहे. नसीम म्हणतात की भारताने तिथे खटला दाखल केल्यानंतर पाकिस्तानला दोन गोष्टी करता आल्या असत्या - एक तर आपले घोषणापत्र मागे घेणे आणि खटल्यामध्ये सामिल होण्यास नकार देणे. परंतु तसे न करता शरीफ सरकारने न्यायालयासमोर पेश होण्याचा मार्ग स्वीकारला म्हणून आज पाकिस्तानमधील काही गट सरकारवर जबर टीका करत आहेत. लाहोर बार कौन्सिलने शरीफ यांनी एक आठवड्यात राजिनामा द्यावा म्हणून मागणी केली आहे. न केल्यास २००७ पेक्षाही मोठे (म्हणजे मुशर्रफ यांना घालवण्यासाठी केले त्यापेक्षा मोठे) आंदोलन करू म्हणून धमकी दिली आहे. नसीम यांच्या विचाराशी पाकिस्तानचे माजी ॲडिशनल ॲटॉर्नी जनरल तारीक खोकर सहमत आहेत. खोकर हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे गाढे अभ्यासक समजले जातात. खोकर म्हणतात की आंतरराष्ट्रीय कोर्ट म्हणजे एक प्रकारचा लवाद आहे. इथे आपल्या पसंतीच एक न्यायाधीश दोन्ही पक्ष देऊ शकतात. भारताने आपल्या हक्काचा उपयोग करून एक न्यायाधीश सुचवला. पण पाकिस्तानने मात्र असे केलेच नाही.

२००८ साली - म्हणजे यूपीए सरकारने पाक सरकार बरोबर केलेल्या एका करारानुसार सुरक्षा विषयक बाबी उभयतांमध्ये सोडवल्या जातील असे ठरवले होते. पाकिस्तानने आपली केस ह्याच एका मुद्द्यावर भर देऊन लढवली. परंतु भारताने व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन कॉन्सुलर रिलेशन्स VCCR नुसार केस चालवली आणि हा मुद्दा कोर्टाने मान्य केला.

मग काय वाटते तुम्हाला - नेमके भारताला हवे तेव्हा आले ना घोषणापत्र? पाकतर्फे वकील कोण होता? पाकतर्फे न्यायाधीश नेमला गेला का? हे सगळे आपसूक घडले ना? ओ हमनवाझ!!! ओ हमनऽऽऽऽवाझ!!!

(तळटीप: भारताच्या १९७४ च्या घोषणापत्र नुसार खास करुन काश्मिर समस्या कोर्टाच्या कक्षेमध्ये येत नाही आणि या बाबतीत आपण अशी कक्षा मान्य करणार नाही असे स्पष्ट करणारे हे घोषणापत्र आहे. नसीम म्हणतात की भारताने कक्षा मान्य न केल्यामुळेच आजवर काश्मिर प्रश्नावर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा मामला म्हणूनच पाकिस्तान येथे आणू शकलेला नाही.)


काल भारताचे वायुदलप्रमुख धानोवा यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेवरचा पीटीआयचा एक ट्वीट पोस्ट केला होता.

याअगोदर काही भारतीय माध्यमातून पाकिस्तानची अण्वस्त्रे कुठे आहेत यावर सॕटेलाईट फोटो छापले होते.

चीन No First Use हे तत्व पाळत नाही मग भारतही हे तत्व बदलेल का अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगत असे. पण असा काही प्रस्ताव नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.

सहसा गुप्त ठेवण्यात येणारी ही माहिती जेव्हा प्रसिद्धीस दिली जाते तेव्हा त्यामागे काही वेगळे हेतू असतात.




२० मे


न्या. भंडारी यांचे जोड निकालपत्र

नुकताच आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये भारताच्या बाजूने निर्णय दिला. आता पाकिस्तान ह्या कोर्टाकडे नव्याने सुनावणी व्हावी म्हणून अर्ज करणार आहे. मूळ निर्णय खंडपीठावरील सर्व न्यायाधीशांनी एकमताने दिला होता. परंतु भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी आपले एक स्वतंत्र निकालपत्रही जोडले आहे. ह्यामध्ये काही मुद्दे अधिक विस्तारपूर्वक मांडले आहेत.

न्या. भंडारी यांनी हे नमूद केले आहे की कुलभूषण जाधवला नेमके कुठे पकडले - पाकिस्तानात की पाकिस्तानबाहेर - यावर भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये दुमत आहे. भारताने १३ वेळ लिखित परवानगी मागूनही भारतीय दूतावासाला त्याला भेटू देण्यात आले नाही तसेच त्याच्यावरती काय खटला चालवला जात आहे आणि आरोप काय ठेवण्यात आले आहेत याची कागदपत्रे मागूनही भारताला देण्यात आली नाहीत हे विशेष निकालपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कायद्यानुसार आपल्याला देण्यात आलेल्या शिक्षेवरती पुनर्विचार व्हावा अथवा मृत्यूदंडाबाबत दयेचा अर्ज करता येईल हे श्री भंडारी यांनी नमूद केले आहे. परंतु स्वतः जाधव यांजकडून अशा प्रकारचा अर्ज करण्यात आला आहे किंवा नाही ह्याबद्दल स्पष्टता नाही असे ते म्हणतात. जाधव यांच्या आईने मात्र हे दोन्ही अर्ज पाकिस्तान कोर्टाकडे भरले आहेत असेही भंडारी यांनी म्हटले आहे.

२००८ साली भारत - पाकिस्तान यांजदरम्यान उभयतांच्या वकिलातींना तुरुंगात असलेल्या आपल्या नागरिकांना भेटण्याविषयी जो करार करण्यात आला त्याचा आधार व्हिएन्ना करारच असल्याचे नमूद केले आहे. ह्या करारामुळे सदर कोर्टाच्या अधिकारकक्षेमध्ये कोणताही बदल झाल्याचे भंडारी यांनी अमान्य केले आहे. सदर बाब व्हिएन्ना करारामध्ये अंतर्भूत असून भारताचा हा हक्क पाकिस्तानने डावलला असल्याचे भारताचे म्हणणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जाधव यांच्या प्रकरणामध्ये भारताने जे अधिकार असल्याचे म्हटले आहे ते वाजवी आहेत कारण कुलभूषण जाधव हा निःसंशय भारतीय नागरिक आहे - त्याला परकीय देशामध्ये अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर त्या परराष्ट्रामध्ये खटला चालवून शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. अजूनही ह्याबाबतच्या अर्जांची सुनावणी चालू असल्यामुळे वकिलातीला त्याला भेटण्याचा अधिकार वाजवी ठरतो.

आंतरराष्ट्रीय खटल्यामध्ये अंतरिम ऑर्डर देण्याची तातडी आहे का ह्या प्रश्नाचा विचार करताना श्री भंडारी यांनी नमूद केले की ह्या कोर्टाचा निकाल येण्यापूर्वी जाधव यांना फाशी होणे संभाव्य आहे हा खरा धोका असल्यामुळे अशी तातडी वाजवी ठरते.

न्या. भंडारी यांच्या ह्या विशेष निकालपत्रामुळे भारताची बाजू अधिक स्पष्ट होण्यास प्रचंड मदत झाली आहे. खटल्यामधल्या पुढील सुनावणीमध्ये ह्या मुद्द्यांचा भारताला उपयोग करून घेता येईल.





१९ मे २०१७


घटनांचा क्रम बघा:

२२ एप्रिल - पनामा पेपर्स केसचा निकाल शरीफ यांच्या विरोधात गेल्यावर लाहोर वकील संघटनेचा आंदोलनाचा इशारा. शरीफ यांच्या राजिनाम्याची मागणी. २००७ पेक्षाही तीव्र आंदोलन छेडू म्हणून ताकीद

२९ एप्रिल - डाॕन वृत्तपत्राने छापलेल्या गुप्त माहिती साठी त्यांच्या वर कारवाई तसेच शरीफ यांचे परराष्ट्र संबंधी सल्लागार तारिक फातेमी यांना सरकारने काढून टाकले

२९ एप्रिल - एका तासात सैन्याचा खुलासा - सरकारची कारवाई अपुरी आणि अमान्य

;२९ एप्रिल - इम्रान खाननेही शरीफ यांच्या राजिनाम्याची मागणी केली

२९ एप्रिल - पत्रकार संघाने जाहीर केले की डाॕनवरील कारवाई अमान्य

५ मे - रावळपिंडी पोलिसांनी शरीफवर एफ आय आर दाखल केला - आरोप??- लोकांना सैन्याविरोधात भडकावणे - सैन्याबद्दल द्वेष निर्माण करणे

५ मे - पाकमध्ये नवे 'नागरी' सरकार यावे म्हणून सैन्य प्रयत्नशील

१८ मे - सैन्य म्हणते आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय अमान्य - consular access देणार नाही

१८ मे - पंजाब प्रांताचे गव्हर्नर आणि शरीफ यांचे बंधू म्हणतात कोर्टाचा आदेश पाळला जाईल

कुलभूषण पंजाब प्रांतातील तुरुंगात आहे का?

नवाझ शरीफ वि सैन्य संघर्षात शरीफ त्यांना पुरून उरतील का???

शरीफ विजयाला वाव नक्कीच आहे, परिणाम?????



१९ मे २०१७




Dialogue is the only way forward अशा थापा ज्यांनी १० वर्षे ऐकवल्या त्यांचा काय जळफळाट झाला असेल विचार करा.

आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल डावलण्याचे पाक सैन्याने ठरवले आहेच. तेव्हा पाकिस्तानात नागरी सत्ता वि. सैन्य हा संघर्ष आता तीव्र होईल.

प्रत्यक्षात शरीफना किती लवकर डच्चू देण्यात येईल ते परिस्थिती वाव देईल तसे ठरत जाईल. पण दिशा मात्र तीच राहील.





१८ मे २०१७


 आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय भारताच्या बाजूने लागल्यामुळे पाकिस्तान कैचीत आल्यासारखे सर्वांना वाटत आहे. हे एक अर्धसत्य आहे. ह्या प्रश्नावरती पाकिस्तानी नागरी सत्ता आणि सैन्य ह्यांचे पटत नाही. जसजशी  युद्धमय परिस्थिती जवळ येत आहे तसतसे सैन्याला नवाझ शरीफ यांची 'अडचण' होत आहे. शरीफ यांना राजकीय दृष्ट्या पाचरीत पकडण्यासाठी सैन्य उतावीळ आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मानण्याकडे नागरी सत्तेचा कल असेल तर कुलभूषणवर छद्मी खटला चालवण्याचे नाटक करणाऱ्या सैन्याला तो लवकरात लवकर फाशी गेलेला बघायचा आहे. कारण तसे झाले तर शरीफ यांचे नाक सर्वांसमक्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर कापले जाईल. कोर्टाचा निर्णय आपण मानत नाही कारण हा पाकिस्तानच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असेच सैन्य म्हणणार. आणि सैन्याकडे दुर्लक्ष करून त्याला भारताकडे सोपवण्याचा निर्णय शरीफ यांनी घेतलाच तर सैन्य बंड करून शरीफ यांना सत्तेवरून खाली खेचू शकते. अशी नाटके पाकिस्तान मध्ये नेहमीच पहायला मिळतात.

पण आता भारताचे पंतप्रधान मोदी आहेत हे सैन्याने विसरू नये. अशा प्रकारचा आततायी निर्णय सैन्याने घेतलाच तर तो आत्मघातकी ठरेल. याआधी बांगला देशात आपले सैन्य कोणत्या निकषावर घुसवता आले त्याची आठवण ठेवा.

दरम्यान कुलभूषण हेर नसून सामान्य नागरिक असल्याची भूमिका भारताने पहिल्यापासून घेतली ती हाच इशारा स्पष्टपणे देण्यासाठी की अदलाबदल करायचीच तर भारताच्या ताब्यातील पाकच्या कोणत्याही हेराबरोबर होणार नाही.

एक विजय नोंदवलाय! शुभारंभ झालाय.



१६ मे  २०१७




काही गोष्टी सुचल्या त्या अशा.

- पाकिस्तान रशिया चीन हा त्रिकोण एकत्र आला आहे.
- तिघांनाही आशियामधून अमेरिकेची हकालपट्टी करायची आहे.
- तिघांनाही अफगाणिस्तान पाकव्याप्त काश्मीर वर सत्ता हवी आहे
- इराण अफगाणिस्तान भारत ह्यांचे बलुचिस्तानबाबत एक विचार आहेत
- चीन रशियाच्या एवढी लष्करी तयारी भारताकडे नाही कारण गेल्या २५ वर्षात शस्त्र खरेदीवर विरामच होता जेमतेम चार दिवसीय लढाईची क्षमता उरली आहे
- चीन रशिया आर्थिक दृष्ट्या आपल्या पेक्षा बलाढ्य आहे
- अमेरिका आपल्याला मदत करेलच असे नाही

मग भारताने पंगा ओढवून घ्यावा का? कोणाचीच मदत नसताना अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांशी युद्ध छेडावे का?

सगळा हिशेब आतबट्ट्याचा दिसला तरी पटते का बघा

- आपले संरक्षण आपण करायचे आहे
-  दुसऱ्यावर या बाबतीत विसंबता येत नाही
- आज लढला नाहीत तर मांडलिकत्व कपाळी येईल
- नैतिक बळ आणि धैर्य आपल्या बाजूचे असताना घाबरण्याची गरज नसते
- सर्वस्व गमावलेला अफगाणिस्तान ३८ वर्षाच्या युद्धानंतरही लढायला उभा आहे आपण तर खूप सुस्थितीत आहोत