Monday, 13 March 2017

राज्य विधानसभा निवडणुका २०१७ - भाग १


Image result for Bharatiya Janata Party


सर्वप्रथम देदीप्यमान विजयासाठी पंतप्रधानांचे अभिनंदन. आणि बारकाईने अभ्यासपूर्वक निवडणूक मोहिम आखून ती काटेकोररीत्या राबवल्याबद्दल पक्षाध्यक्ष श्री अमित शहा यांचेही अभिनंदन. देशाच्या पातळीवरील सर्वसाधारण मुद्दे नंतर लक्षात घेऊन आधी राज्यवार मला जे वाटले ते लिहित आहे.

पंजाब

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अकालींच्यासोबत राहण्याचा भाजपचा निर्णय त्याच्या राजकीय परिपक्वतेचा नमुना आहे. अकाली दल बदनाम झालेले आहे. त्याच्या नेतृत्वावरती अंमली पदार्थांच्या व्यापारामध्ये सहयोग देण्यासारखे गंभीर आरोप आहेत आणि आज पंजाबच्या प्रत्येक घरामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनाचा मुद्दा भेडसावत आहे. प्रत्यक्षात खुद्द मोदी पंजाब मध्ये लोकप्रिय आहेत आणि भाजपने स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवली तर स्वबळावर आपले राज्य येऊ शकते हे सत्य माहिती असून सुद्धा भाजपने अकालींची साथ सोडण्याचा निर्णय घेतला नाही. पंजाब हे सीमेवरील राज्य आहे. भारत - पाक युद्धामध्ये इथली सीमा नेहमीच युद्धात ओढली जाते. सीमेवर लढण्यासाठी सैन्य निघाले की पंजाबची बहादूर जनता सैन्याला मनापासून साथ देते आणि त्यांचे मनोबल वाढवते हे आपण पाहिले आहे. पण मोदी सत्तेवर आले ही बाब ज्यांच्या अजून गळ्याखाली उतरली नाही त्या पाकिस्तानच्या आय एस आयने सर्व जोर लावून पंजाबमध्ये पुन्हा एकदा खलिस्तानचे भूत जागे करण्याचे प्रयास चालवले आहेत. अकालींची साथ भाजपने सोडली असती तर तेच अकाली खलिस्तान्यांना जाऊन मिळाले असते. अशा परिस्थिती्मध्ये खलिस्तानी चळवळीला खतपाणी मिळाले असते. अजूनही धर्माचा पगडा असलेला जो मतदार पंजाबमध्ये आहे तोही बिथरला असता. इंदिराजींच्या मृत्यूनंतर शीख समाजावर जे अत्याचार झाले त्याने ह्या समाजाचा हिंदूंवरील विश्वास ढासळला. ह्या जुन्या जखमा अजून भरून निघाल्या नाहीत. (जिज्ञासूंनी श्रीमती तवलीन सिंग यांची पुस्तके यासाठी चाळावीत). अशा परिस्थितीमध्ये नुकसान सोसूनही अकालींबरोबर भाजप पंजाबमध्ये ’सती’ गेला आहे. निवडणूकीच्या काळामध्ये आयएस आयने कॅनडामधून अनेक श्रीमंत सरदारांना पंजाबात धाडले होते. पैशाच्या थैल्या मोकळ्या करत ह्या मंडळींनी आम आदमी पक्षाचा प्रचार चालवला होता. खलिस्तानी चळवळीचे चटके सोसलेल्या सूज्ञ जनतेने ह्या धोक्याचा विचार करत आम आदमी पक्षाला पाडायचे म्हणूनच कॉंग्रेसच्या पारड्यात आपली मते टाकली आहेत. कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह लोकप्रिय आहेतच पण मोदी यांचे चाहते आहेत. कॉंग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाने अवाजवी आदेश काढले तर कॅप्टनसाहेब ते धाब्यावर बसवून सूज्ञपणे कारभार करतील ही खात्री आहे. कॉंग्रेस नेतृत्वाने ताळतंत्रच सोडले तर तेथील कॉंग्रेस पक्ष फुटूही शकतो. अशा तर्‍हेने प्राप्त परिस्थितीमध्ये जो मार्ग भाजपने स्वीकारला आहे तो अभिनंदनीय आहे.
हे ही आज नमूद करायला हवे की ऊठसूट भाजपवर टीका करणार्‍या सेनानेतृत्वाने हे लक्षात घेतले पाहिजे की जी लवचिकता भाजपने पंजाबमध्ये दाखवली आहे ते ती महाराष्ट्रात दाखवणारच नाहीत असे नाही पण टाळी एक हाताने वाजत नाही. तसा प्रतिसाद मिळावा लागतो. असो.

मणिपूर

मणिपूरमध्ये भाजप पटावर येऊ शकते अशी कल्पनाही अगदी २०१४ मध्येही कोणी केली नसेल. धर्मांतराचा बोलबाला असलेल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपसारख्या पक्षाला बूड टेकण्याइतकीही सहानुभूती मिळू शकणार नाही असेच राजकीय पंडित सांगत आले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये पश्चिमेकडील राज्ये आणि पूर्वेकडील राज्ये यांच्यामधला विकासाचा असमतोल दूर करण्याचा आपण प्रयत्न करू असे मोदी म्हणत होते. गेल्या अडीच वर्षांच्या कारभारामध्ये मोदी सरकारने ईशान्येकडील राज्यांमध्ये विकासाच्या कामांना प्रारंभ केला आहे. या राज्यांमध्ये रोजगार वाढवण्याचा सोपा उपाय म्हणजे तिथे पर्यटन व्यवसाय विकसित करणे. ह्या उद्देशाने जे काम केंद्र सरकारने हाती घेतले आहे त्याचा अनुकूल परिणाम भाजपला सुखावह ठरला आहे. पण इतक्यावरच मणिपूरची निवडणूक संपत नाही. आजवर केंद्र आपल्यावर कसा अन्याय करत आहे असा प्रचार करून जनमत प्रक्षुब्ध ठेवायचे आणि निवडणुकीमध्ये त्याचा राजकीय लाभ उठवायचा असा तेथे मामला होता. हेच वर्षानुवर्षाचे डावपेच याही वेळी विरोधकांनी लढवायचा पवित्रा घेतल्यामुळे भाजपला निवडणूक सोपी गेली. मणिपूरमध्ये मैतेयी आणि नागा असे दोन मोठे समुदाय राहतात. यामधल्या नागा समुदायाचे नेतृत्व करणार्‍या युनायटेड नागा कौन्सिल या संघटनेने राज्यामधल्या महत्वाच्या मार्गांवर रास्ता रोको आंदोलन छेडले. हे आंदोलन सुमारे तीन महिने चालले. संपूर्ण देशामध्ये जेव्हा नोटाबंदीची चर्चा सुरु होती तेव्हा मणिपूरमध्ये रास्ता रोकोने नागरिकांचे हाल होत होते. पण कोणत्याही माध्यमाने ह्या बातम्यांना ठळक स्थान दिले नाही. हा रास्ता रोको चर्चप्रणित होता म्हणजे त्याचे लक्ष्य काय होते हे सांगायला नको. शिवाय त्याला राज्यपातळीवर ’राजाश्रयही’ होता. केंद्राने पुरेशी मदत देऊन सुद्धा रास्ता रोको चालूच राहिले. ज्या कॉंग्रेसने वर्षानुवर्षे मणिपूरमध्ये राज्य केले आहे त्या पक्षाने पुनश्च असे डावपेच निवडून येण्यासाठी आखावेत यामध्ये त्यांचे कल्पनादारिद्र्य दिसते. इथेच आम आदमी पक्षातर्फे इरोम शर्मिला यांना उपोषण सोडण्यास प्रवृत्त केले गेले होते. त्या राजकारणात उतरल्या तेव्हा AFSPA ला विरोध करणार्‍या या एकतर्फी लढवय्या महिलेच्या सहभागाचा फायदा होईल अशी अटकळ होती. श्री प्रशांत किशोर त्यामागचे डावपेच रचत होते. पण जनतेने त्यांना झिडकारले. ह्याचे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. मग आपल्या देशामध्ये त्याग आणि प्रामाणिक कामाला जनता काहीच स्थान देत नाही का - इथून पुढे देणार नाही का असेही प्रश्न अनेकांनी उपस्थित केले.

त्याचे समाधानकारक उत्तर माझ्या वाचनामध्ये आले नाही. एका खूप मोठ्या ’बाह्य’ घटकाने मणिपूरच्या राजकारणावर प्रभाव टाकला आहे. चीनची गुरगुर जितकी वाढत आहे तितकी ह्या प्रदेशामधली जनता फुटीरतावाद्यांपासून मनाने दूर जात आहे आणि केंद्रीय पक्षाकडे आकर्षित होत आहे. (कॉंग्रेसने आपल्या वागणूकीमधून आपण राष्ट्रव्यापी पक्ष असल्याची प्रतिमा संपवत आणली आहे.) चीनने आक्रमण केले तर त्याचे चटके त्यांना भोगायचे आहेत. चीनच्या हुकूमशाही वरवंट्यामध्ये गेलो तर आपला तिबेट होणार हे ईशान्येकडील राज्यांमधली जनता जाणते आहे. जसे इंदिराजींच्या मृत्यूनंतर देशामधली जनता कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षामागे एकवटली त्याच पद्धतीने आज मणिपूरची जनता भाजपमागे एकवटली आहे. भाजपचे मणिपूरमधील पदार्पण असे दिमाखदार झाले आहे. त्यामागे संघाने गेली काही दशके तिथे उभारलेले काम आपले योगदान देते झाले आहे. आसामच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर विचार करता हे यश त्याच पायाचे पुष्टीकरण करत आहे असे जाणवते. इथून पुढे ईशान्येकडील अन्य सीमावर्ती राज्यांमध्येही हाच कल कायम राहील ह्याचे हा विजय म्हणजे द्योतक आहे.
चीनने आक्रमण करण्याचा आततायीपणा कएलाच तर तिथे लढणार्‍या सौन्याच्या मागे स्थानिक जनता आपोआप उभी राहील ही चिन्हे हेच भारतासाठी अच्छे दिन आहेत.


सोबत: Photo मैतेयी राजा भाजप व्यासपीठावर 

Monday, 6 March 2017

अफगाणिस्तानात इसिस


Image result for khorasan

२ मार्च रोजी देशाचे संरक्षण मंत्री श्री पर्रीकर यांनी एक विधान केले आहे. ते म्हणाले की अफगाणिस्तानातून येणाऱ्या अहवाल आणि त्याबरोबरच फोटो पाहता तेथील स्थानिक जनतेच्या शरीरावर आलेले फोड आणि जखमा स्पष्ट दिसतात. ह्यामागे रासायनिक अस्त्रे वापरली गेली का याचे स्पष्ट अहवाल अजून आले नसले तरी मी असे म्हणेन की भारतीय सैन्याने कोणत्याही प्रकारच्या युद्धकरता सज्ज राहावे. संरक्षण मंत्र्यांचे हे विधान झोप उडवणारे आहे. पर्रीकर असे सूचित करत आहेत की केवळ रासायनिक नव्हे तर छोट्या प्रमाणावरचे डर्टी बॉम्ब अण्वस्त्रे  ह्या रणभूमीवर वापरले जाऊ शकते आणि सैन्याने कोणताही धोका न पत्करता आपली तयारी ठेवावी. भारतीय संरक्षण अनुसंधान केंद्राने रासायनिक - आण्विक आणि जैविक हल्ले झालेच तर तेव्हा वापरावयाची औषधे बनवली असून ती सैन्याकडे सुपूर्द करण्याच्या समारंभात श्री पर्रीकर बोलत होते.

पर्रीकरांचे हे विधान संदर्भाशिवाय कळणे कठीण आहे. अफगाण सीमेवरती आणि त्या देशात नव्या युद्धाचे पडघम वाजू लागले आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये मी अफगाणिस्तानात गुलबुद्दीन हिकमतयार  याची सुटका झाल्यासंदर्भात लेख लिहिला होता. आणि कालच्या लेखामध्ये भारताने अफगाणिस्तानात आपले सैन्य उतरवावे अशी अमेरिकेची इच्छा असल्याचे मी लिहिले होते.

अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ज्या बैठक झाल्या तिथे आजवर भारताला बोलावले सुद्धा गेले नव्हते आता मात्र रशियाच्या पुढाकाराने होणाऱ्या परिषदेला भारतीय प्रतिनिधी पहिल्यांदाच हजर असतील ह्याचाही उल्लेख मी केला होता. पण परिस्थिती खरोखरच गंभीर बनली असल्याचे येणाऱ्या  बातम्या सुचवत आहेत. अफगाणिस्तानमध्ये चीनचे सैन्य दिसल्याच्या बातम्या येत असून भारतामध्ये WION या TV चॅनेल ने ही बातमी दाखवली. पुढे अमेरिकन सैन्याचे मुख्य पेंटागॉन कार्यालयाला त्याबद्दल विचारले असता ते तिथे आहेत याची आम्हाला कल्पना आहे असे उत्तर प्रतिनिधींकडून मिळाले. तेव्हा अमेरिकेच्या मूक संमतीनेच चीनचे सैन्य अफगाणिस्तान मध्ये वावरत आहे असे आपण म्हणू शकतो. एकीकडे दक्षिण चीन समुद्रावरून दोन्ही देशांचे कडाक्याचे वाजणार असल्याचे संकेत आले तरीही अफगाण भूमीवरील चीनी सैन्याच्या उपस्थितीला अमेरिकेने विरोध दर्शविलेला दिसत नाही. पुढे जाऊन असेही वृत्त पाहायला मिळते की चीन आणि अफगाण सैन्य यांच्या संयुक्त टेहळणी (गस्तीचे ?) पथकाचे काम छोट्या पामीरच्या पठारावरती चुपचाप चालू आहे. अशा टेहळणीच्या वृत्ताचा अफगाण सरकार इन्कार करत असले तरी चिनी सरकारने मात्र असे कबूल केले आहे की अफगाण सरकारबरोबर झालेल्या समझौत्यानुसार आपले "पोलीस दल" तिथे टेहळणी करत असते. आश्चर्य म्हणजे अफगाणिस्तानात रशियन अथवा इराणी सैन्य घुसू नये म्हणून अमेरिका तीव्र आक्षेप घेत असते. पण चिनी सैन्याच्या टेहळणीला मात्र ते मूक संमती देत आहेत ही बाब लक्षणीय आहे.

टेलिग्राफ या ब्रिटिश वर्तमानपत्राने छापलेल्या बातमीनुसार पाकिस्तानने अमेरिकन जनरल्सना असा इशारा दिला आहे अफगाणिस्तानातील विचका आवरा नाही तर तिथे रशियन सैन्य घुसण्यास तयार आहे. असा इशारा पाकिस्तानने अमेरिकेला द्यावा हा तुम्हाला विनोद वाटेल पण बदलत्या परिस्थितीच्या सर्व खुणा ह्या धमकीमध्ये आपल्याला दिसतात. एक म्हणजे पाकिस्तान ज्या विचक्याबद्दल बोलत आहे तो विचका म्हणजेच अफगाणिस्तानात घुसलेले इसिस. खोरासान मध्ये इसिस उघड उघड वावरत असून ते आणि तालिबान एकत्र आले तर अफगाणिस्तानवरील नियंत्रण हातातून निसटेलअसे पाकिस्तान सुचवत आहे. ही अशी परिस्थिती आहे की अशा निर्नायकीमध्ये इराण प्रमाणेच आपले सैन्य अफगाणिस्तानात घुसवण्याचा मोह रशियाला होऊ शकतो  असे पाकिस्तानी जनरल अमेरिकन जनरलला सुनावत आहे.

इसिसला सगळेच घाबरतात असा ह्या विधानामुळे तुमचा सोळभोक समज होण्याची शक्यता आहे. पण जिथे पाकिस्तान आहे  तिथे छद्म नाटक नाही असे होऊच शकत नाही. ही गोष्ट खरी आहे की पाकिस्तानात शिया समुदायावर होणारे हल्ले TTP आणि इसिस चे काही गट करत आहेत पण तरीही पाकिस्तान इसिसला घाबरते यावर कोणी विश्वास ठेवू शकेल काय? त्यासाठी इसिसची सुरुवात कशी झाली ते थोडक्यात पाहिले पाहिजे. 

अमेरिकेने २००३ साली इराकवर हल्ला केला तेव्हा सद्दामने आपल्या सैन्याला पळून जाण्याचे आदेश दिले होते. म्हणूनच प्रत्यक्षात अमेरिकन सैन्य तिथे घुसले तेव्हा त्यांचा प्रतिकार करायला रेगुलर सैनिक तैनात झालेले दिसलेच नाहीत कोणताही विरोध न होताच अमेरिकन सैन्य बगदाद पर्यंत पोचले. यानंतर मोकळे झालेले सद्दामचे सैन्य आणि सद्दामच्या बाथ पार्टी चे सभासद हे प्रथम सीरियामध्ये जाऊन लपले होते. याना पुन्हा एकदा एकत्र करून इसिस नावाने इराकमधील शिया बहुसंख्येच्या सरकारवर हल्ले करून त्याला जेरीस आणण्यासाठी तुर्कस्तान आणि सौदी अरेबियायाने वापर केला. इराकमधील सरकारला जेरीस आणणारे हेच सैन्य पुढे लिबियामध्ये  घुसवण्यात आले तिथे गडाफीचा निःपात करण्यात आला. त्यानंतर सीरियामध्ये युद्ध चालू झाले. अशाप्रकारे इसिस वर नियंत्रण कोणाचे हे स्पष्ट होते.

आपण दिलेल्या मदतीची परतफेड म्हणून सौदीने पाकिस्तानच्या लष्करातील अधिकारी बोलावून इसिसच्या सैन्याला तांत्रिक प्रशिक्षण देण्यास फर्मावले. पाकिस्तानी लष्करातील अधिकारी हे काम गेली काही वर्षे करत आहेत. अगदी लिबियामध्ये घमासान सुरु झाले तेव्हाही पाक लष्कराची माणसे त्यांच्याबरोबरच होती. मोदी सरकार सत्तेमध्ये आले तेव्हा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री अजित डोवाल सीरियामध्ये गेले असता आपले जुने कॉन्टॅक्टस वापरून त्यांनी सीरियन सरकारकडे असलेला इसिसचा सर्व डेटाबेस मिळवला. हे वृत्त खरे असेल तर अशामुळे पाकिस्तानचे कोणते अधिकारी इसिसच्या कामामध्ये गुंतले आहेत याची कुंडलीच भारताच्या हातात आली असे म्हणता येईल.

तेव्हा इसिसची सगळी कुंडली पाकिस्तानकडे असून त्याला इसिसचे अजिबात वावडे नाही. किंबहुना इसिसला भारताविरुद्ध आणि अफगाणिस्तान विरुद्ध वापरता येण्याची पूर्ण तयारी तो करतो आहे. श्री पर्रीकर यांनी रासायनिक अथवा 'अन्य' म्हणजे आण्विक अथवा जैविक हल्ल्याची शक्यता सूचित केली आहे. असे संशयास्पदहल्ले अफगाणिस्तानमध्ये चिनी सैन्याने तर केले नाहीत ना अशी शंका जरूर येते.

परवाच मी श्री डोवाल इस्राएल भेटीकरिता गेले असल्याचा फोटो टाकला होता. डोवाल तिथे गेले पण फेब्रुवारीच्या २१ तारखेला तुर्कस्तानचे पंतप्रधान एर्दोगन पाकिस्तानात येऊन गेले आणि त्यांच्या पाठोपाठ तुर्की सन्याचे वरिष्ठ अधिकारी २८ फेब रोजी पाकिस्तानात आले होते. या घटना बोलक्या असून भारताच्या परसदारात पुन्हा एकदा कमीत कमी नागरी युद्धाच्या आणि पेटलेच तर खऱ्याखुऱ्या युद्धाच्या पाऊलखुणा दिसू लागल्या आहेत.

इसिस ही इसिस आहे.  अफगाणिस्तानात घुसली तर तिला तेथून जवळच असलेल्या चीनच्या शिन ज्यांग प्रांतात प्रवेश करणे कठीण नाही. ह्या प्रांतामधली मुस्लिम जनता चीन सरकारच्या विरोधात आहे. तेव्हा ही आग चीनच्या दारात येऊन ठेपली आहे. शिन ज्यांग पेटले तर तिबेट पेटू शकते. एकदा का अमेरिकन पाठिंब्याने भारतीय सैन्य अफगाणिस्तानात दाखल झालेच तर काय काय घडेल सांगता येत नाही.













Saturday, 4 March 2017

चीन रशिया मैत्री

Image result for russia china



चीन रशिया मैत्री

१९७१ साली इंदिराजींनी रशियाशी २५ वर्षांचा मैत्री करार केला. बांगला देश युद्धादरम्यान अमेरिकेला रोखून धरण्याचे काम रशियाने केले आणि भारताला घवघवीत ’मदत’ केली. ह्या घटना भारतीय जनता अजूनही विसरलेली नाही. भारतीय मध्यम वर्गाने भले आपली पोरे अमेरिकेत पाठवएली असोत पण भावनिकदृष्ट्या मात्र त्यांना रशियाच जवळची वाटते. दुर्दैवाने आज ४५ वर्षे उलटून गेल्यावर रशिया मात्र भारताला पूर्ण साथ देण्याच्या मनःस्थितीमध्ये दिसत नाही. १९९९ मध्ये सत्तारूढ झाल्यानंतर शक्तीहीन बनलेल्या रशियाला पुन्हा एकदा जागतिक राजकारणामध्ये एक महत्वाचा खेळाडू म्हणून उभे करण्याची कठिण कामगिरी पुतिन यांनी करून दाखवली खरी. पण २०१० नंतर मात्र पुतिन यांनी काही प्रश्नांबाबत जे निर्णय घेतले त्यामुळे हे आता भरकटणार तर नाहीत असे वाटू लागले. सिरिया आणि क्रिमिया या दोन्ही समस्यांमध्ये आकंठ बुडालेल्या पुतिन यांनी शेवटी आशियामध्ये अमेरिकेला शह देता यावा म्हणून चीनशी दोस्ती करणे पसंत केले.

शत्रूचा शत्रू मित्र असू शकतो हे खरे असले तरी मुळात मित्रांमध्ये काही तरी सामाईक व्यासपीठ असावे लागते. आणि हा निकष लावला तर साम्यस्थळांपेक्षा दोघांमध्ये फरकच जास्त असल्याचे दिसून येते. केवळ अर्थकारणाचा विचार केला तर आज चीन रशियाच्याही पुढे गेला आहे हे मान्यच करावे लागते. १९८० मध्ये चीनची ८८% जनता दारिद्यात जीवन कंठत होती. आज हे प्रमाण १.८% इतके कमी झाले आहे. २००० साली चीनने WTO मध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचे दरडोई उत्पन्न दहा ट्रिलियन डॉलरने वाढले आहे. आज २.३ ट्रिलियन डॉलर्स किंमतीचा त्याचा माल निर्यात होतो. मग केवळ अर्थकारण म्हणून रशियाने चीनशी मैत्री केली का? असेही म्हणता येत नाही.

खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये नेटोची खरेच गरज आहे का असे प्रश्न उपस्थित होत होते. पण क्रिमियामध्ये सैन्य घुसवून रशियाने विसकटलेली नेटोची घडी पुनश्च सुरळीत करायला मदतच केली असे दिसून येते. क्रिमियाबद्दलच्या त्याच्या भूमिकेमुळे विखुरलेले नेटो देश पुन्हा एकत्र आले. नेटोची अजूनही आवश्यकता आहे असे त्यांना वाटू लागले. सिरिया असो की क्रिमिया इथे जर का प्रत्यक्ष युद्धभूमीवर कारवाया सुरु झाल्याच तर चीन आशियास्थित रशियाला कोणत्याप्रकारे मदत करू शकेल? ह्याची शक्यता शून्यच आहे. तसेच चीनशी युद्धात उतरण्याचे बलाढ्य अमेरिकेने ठरवलेच तर ते युद्ध होऊ शकते - एक तर उत्तर कोरियामध्ये नाही तर दक्षिण चीन समुद्रामध्ये. या दोन्ही युद्धभूमीमध्ये रशियाला उतरता येणार नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे चीन - रशिया दोस्तीचा रशियाला फायदा म्हणण्यापेक्षा तोटाच जास्त असू शकतो असे दिसून येईल.

रशियासमोरचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अमेरिकेतील आणि युरोपातील लिबरल्सनी त्याच्या विरोधात उघडलेली आघाडी.  खरे तर ओबामा यांच्या कारकीर्दीमध्ये अमेरिकेने रशियाला शत्रू नंबर एक ठरवून पुतिन यांची कोंडी कशी करता येईल यावर सगळा जोर लावला होता. अशा पद्धतीची विचारसरणी अमेरिकेमध्ये लिबरल्स आणि युरोपातील त्यांचेच पिट्टे उघड उघड मांडत होते.  या धोरणाचा परिणाम म्हणून रशियाला सिरिया आणि क्रिमियामध्ये हात घालावा लागला. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जर श्रीमती हिलरी क्लिंटन आल्या असत्या तर रशियाला आणखी किमान चार वर्षे तरी हा जाच सहन करावा लागला असता. पण आज मात्र त्याचा भर श्री ट्रम्प यांच्यावर आहे. कारण ट्रम्प यांनी आजवर पडलेला पायंडा बदलायचे ठरवूनच सत्तेवर पदार्पण केले आहे. १९४५ पासून अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा युरोप हा केंद्रबिंदू राहिला आहे. याचे बरेच फायदे युरोपाने आजवर लुटले आहेत.  पण जसजशी आर्थिक महासत्ता आशियाकडे झुकते आहे तसतसे अमेरिकेला युरोपाचे लाड बंद करून लक्ष रशियाकडून चीनकडे वळवावे लागेल हे व्यवसायाने ’व्यापारी’ असलेल्या ट्रम्प यांना कळते. म्हणूनच रशियाशी असलेले आणि मागील सरकारने मुद्दामहून छेडण्यात आलेले झगडे पुतिन यांच्या सहकार्याने मिटवण्याकडे त्यांचा कल आहे. रशियाचा विरोध मावळला तर ट्रम्प यांना चीनसंबंधात क्लिंटन आणि ओबामा यांनी अवलंबलेले मवाळ धोरण सोडून देता येईल. तसे करत असताना भारत हा एक महत्वाचा साथीदार असू शकतो हे त्यांनी मान्य केले आहे. पण हिलरी आणि त्यांच्या लिबरल्सचे वर्तुळ आपल्या जीवावर उठलेल्या धोरणाला सहजासहजी टिकू देणार नाहीत आणि त्यात आपल्याला हवा तसा बदल घडवून आणण्यासाठी आकाश पाताळ एक करतील हे अपेक्षित होते.

सत्तेवर येताच ट्रम्प यांनी आपल्या विचारांनुसार पावले उचलली असली तरी हिलरी यांचे सरकारमधले नोकरशाहीमधले जाळे अजून कार्यरत आहे. ह्या जाळ्याने पहिली गोष्ट काय केली असेल तर हिलरी आणि क्लिंटन फ़ौंडेशन यांच्या चौकशीचे आदेश देण्यात ट्रम्प यांचे राजकीय नुकसान आहे असे त्यांना पटवले. ही गोष्ट ट्रम्प यांनी मान्य केल्यामुळे क्लिंटन कुटुंबियांचे चीनशी काय प्रकारचे ’आर्थिक’ संबंध आहेत हे गुलदस्तात राहिले आहे. असे अभयदान मिळाल्यानंतर क्लिंटन यांच्याशी प्रामाणिक असलेल्या नोकरशाहीने त्यांचे विश्वासू सुरक्षा सल्लागार फ्लिन यांनाच टारगेट करून राजिनामा देण्यास भाग पाडले. पुढचे पाउल उचलण्यात आले ते अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल सेशन्स यांच्याविरोधात. अशा प्रकारे हळू हळू ट्रम्प यांच्या भोवती आपलीच माणसे पेरण्याचे काम हे कार्टेल पूर्ण करेल की काय असे चित्र उभे राहिले आहे. सी आय ए च्या अहवालावरती सुरुवातीला ट्रम्प विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. म्हणजे नोकरशाहीमधली परिस्थिती नव्हे तर सुरक्षादलांमधली परिस्थितीही किती भीषण असेल याची आपण कल्पना करू शकतो. असा एक सर्वसाधारण समज झाला आहे की अध्यक्ष कोणी होवो त्याला सी आय ए ने आखलेल्या धोरणानेच काम बघावे लागेल. अशा प्रकारची परिस्थिती पाकिस्तानमध्ये आहे असे आपण समजत होतो. पण अमेरिकेमध्येही तसेच घडताना पाहून आश्चर्य वाटते. तर अशा परिस्थितीमधून ट्रम्प यांना मार्ग काढायचा आहे.

(भारतामध्ये मोदी सत्तेमध्ये आले तेव्हा काय वेगळी होती परिस्थिती? हिलरी यांची सखी श्रीमती सोनिया गांधी आणि त्यांचे बगलबच्चे यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या ऐकून चिडलेल्या जनतेने मोदींना सत्तेमध्ये आणले खरे पण सोनियांवर कारवाई करू नका अन्यथा त्या इंदिराजींप्रमाणे पुन्हा निवडणुका जिंकतील म्हणून मोदींना पटवणारे त्यांच्याच अवतीभवती नाहीत का? GST पाहिजे असेल तर गांधी घराण्यावरील कारवाई टाळा अन्यथा GST विसरा असाच सल्ला मोदींच्या निकटवर्तियांनी दिला नव्हता का?  म्हणूनच आजवर गांधी घराण्यावरती सरकारतर्फे एकही एफ आय आर सुद्धा दाखल झाला नाही की प्रकरणांची चौकशीही झालेली नाही. मोदी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित दोवल यांच्याही विरोधात अशीच राळ उठवण्यात आली. अर्थात मोदी यांनी त्याला दाद दिलेली नाही. ट्रम्प यांच्या सल्लागार फ्लिन यांच्या प्रमाणे त्यांना खुर्ची सोडावी लागलेली नाही.)

असो. ट्रम्प यांनीच हात पुढे केला तर आजवरचे धोरण बदलून रशिया चीनच्या कंपूमधून बाहेर पडू शकेल. रशिया - चीन मैत्री ही अशी अमेरिका पुढे काय करणार यावरती अवलंबून आहे हे उघड दिसत आहे. रशिया अमेरिकेकडे झुकावा त्याला झुकता येईल अशी परिस्थिती असावी हे भारतासाठी अर्थातच गरजेचे आहे. ही मैत्री घडवून आणण्याच्या कामी भारत सहाय्यक ठरू शकतो. तिन्ही बलाढ्य देशांशी आपला सामना आपल्या परसदारामध्येही व्हायचा आहे. अमेरिका रशिया चीन या सर्वांनाच अफगाणिस्तानामध्ये रस असल्यामुळे कोण कुठे झुकतो यावरती भारताचे हित ह्यामध्ये साधले जाणार का याचे उत्तर ठरवता येते. अफगाणिस्तामध्ये अमेरिकेने पुनश्च लक्ष घालायचे ठरले तरी ते काम भारतावर सोपवून भारताने आपले सैन्य तिथे उतरवावे म्हणून काही लॉबीज - अमेरिका धार्जिणे विचारवंत प्रयत्न करत आहेत.

ज्या कार्टेलविरोधात ट्रम्प यांना आपल्या देशात झगडावे लागणार आहे त्याच कार्टेलचा सामना मोदींनी सत्तेवर येण्याअगोदर बारा वर्षे केला आणि आताही करत आहेत. अमेरिकेमधली लिबरल्सची कार्टेल संपवण्यात रशियालाही स्वारस्य आहे. अर्थातच त्याचे हितसंबंध राखले गेले तर. १९७९ नंतर आज ३७ वर्षांनंतरही अफगाणिस्तान ही युद्धभूमीच राहिली आहे हे किती भीषण आहे नाही? उर्वरित सर्व देशांना अफगाणिस्तानातील अपरंपार खनिज संपती लुटण्यापलिकडे काही रस नाही. भारतीय सैन्य तिथे उतरलेच तर स्थानिक जनतेचा कौल कसा असेल हे सांगायला नको. आज त्या भूमीवरती इसिसची मोठी पडछाया पडली आहे. अफगाणिस्तान त्यांच्या ताब्यात गेला तर भारतामध्ये पाउल टाकायला त्याला सोपे जाईल. अशी चिंताजनक परिस्थिती आहे. ह्या प्रश्नावरती सांगोपांग विचार करून मोदी धोरण ठरवतील ही अपेक्षा आहे.




.