Monday 14 June 2021

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय? भाग २

रोगाची लागण चीनच्या सर्वदूर प्रांतामध्ये (तिबेट वगळता) झाल्याचे दिसल्यामुळे भारतीय दूतावासाने २६ चा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमही रद्द केला होता. २९ जानेवारीपर्यंत अमेरिकेने आपल्या वुहानमधील दूतावासामधले तसेच शहरामध्ये अन्यत्र राहणारे १००० नागरिक मायदेशी नेले होते. दक्षिण कोरिया आणि फ्रान्सही अशीच योजना कार्यान्वित करत होते. इथे भारतात आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले. ३० जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संस्थेने ही साथ म्हणजे जागतिक आणीबाणी असल्याचे जाहीर केले. पण भारताने तर त्या आधीच नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. भारतीय दूतावासाने कसे अथक प्रयत्न करून भारतीयांना मायदेशी आणले त्याची कथा मार्च २०२० मध्ये द मिंट या वृत्तपत्राने छापली. २०१४च्या  बॅचमधील ३३ वर्षीय दीपक पद्मकुमार या दूतावासातील अधिकाऱ्याने वुहान शहरामध्ये राहून भारतीयांशी संपर्क करून त्यांना परत आणण्यामध्ये मोलाची कामगिरी केली. वुहानमध्ये पाऊल टाकायलाही कोणी धजावत नव्हते तेव्हा दीपकने तिथे जाण्याचे धाडस दाखवले आणि आपल्यावर सोपवलेली कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. असे म्हणतात की वुहान शहरामधल्यालोकांना वकिलातीने कुठे जमायचे आहे ते कळवले. जवळ जवळ एक आठवडा शहरामध्ये लॉक डाउन होता त्यामुळे भारतीयांना विमानतळावर पोचणे  सोपे नव्हते. त्यांना आणण्यासाठी बसेस पाठवल्या गेल्या. विमानाची सोय आधीच करण्यात आली होती. आपल्याला असे दिसून येते की शुक्रवारी संध्याकाळी विमान वुहान मधून निघायला  हवे होते पण ते शनिवारपर्यंत उडू शकले नाही. यामध्ये अडवणूक कशी झाली याची कथा माहिती नाही. भारताने एक फ्लाईट केवळ वुहानमधील नागरिकांसाठी सोडली होती. वुहान ज्या हुबे प्रांतात येते त्यामध्ये आणखी नागरिक अडकले होते. त्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी एक फ्लाईट शनिवारी सोडण्यात आली. तर अशा अडचणींवर वकिलातीला मात करायची होती. सुमारे २००० भारतीय नागरिकांना अशा परिस्थितीमध्ये मायदेशी आणणे सोपे नव्हते. ते सरकारने करून तर दाखवलेच पण जितक्या चपळाईने मोदी सरकारने ही पावले उचलली त्याने आश्चर्यचकित व्हायला होते. जेव्हा रोगाच्या भीषणतेचे गांभीर्य लपवण्यात चीन सरकार गुंतले होते तेव्हा मोदी सरकारने संकटाच्या स्वरूपाची कल्पना कशी केली असेल? 

एकीकडे चीन सरकार साथीच्या रोगाबद्दल फारसे काही गांभीर्य दाखवत नव्हते तर दुसरीकडे अमेरिका फ्रान्स दक्षिण कोरिया भारत सरकार मात्र तातडीने आपल्या नागरिकांना चीन मधून बाहेर काढण्याचे प्रयत्न का करत होते? आपल्या नागरिकांना चीनमध्ये धोका आहे असे त्यांना केवळ "वाटत" होते की त्यांची तशी खात्री पटली होती बरे? आणि खात्री पटलीच असेल तर ती कशामुळे? त्यांनी असे काय वेगळे पाहिले - अनुभवले होते की त्यांना अशी आणीबाणीची पावले उचलावीशी वाटत होती? अर्थ आणि संकेत उघड आहेत. चीन सरकारने कितीही माहिती दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाभयानक रोगाच्या आगमनाची बातमी केवळ वूहान नव्हे तर अन्य शहरातही जनसामान्यांपर्यंत पोचली होती. आणि हेच माहितीचे ओघ वेगवेगळ्या दूतावासांपर्यंत पोचत असावेत. 

Wechat app असो किंवा अन्य मार्गानी - हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आणि मृत पावणाऱ्या नागरिकांच्या बातम्या पसरत होत्या. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्सदेखील रोगाला बळी पडत आहेत हे बघितले जात होते. एखादा रोगी आढळला तर तो राहत असलेल्या संपूर्ण इमारतीला टाळे ठोकले जात होते. नागरिकांनी बंड करू नये म्हणून सुरक्षायंत्रणा सज्ज केली गेली होती. शहरामधली आरोग्यव्यवस्था कोलमडून पडल्याची जाणीव होत होती. शहरामधली वाहतूक बंद केल्यामुळे लोकांना गरजेच्या वस्तूही मिळेनाशा झाल्या होत्या. आरोग्यसेवेत काम करणाऱ्या लोकांकडून प्रथमदर्शनी समाचार लोकांपर्यंत येत होता. सगळे दबलेल्या आवाजात असले तरी बातम्या पसरतच होत्या. घडतंय ते काहीतरी वेगळे आहे - महाभयंकर आहे - ही काही नेहमीची साथ नाही याची जाणीव होत होती. मृत्यूचे प्रमाणही मोठे असावे म्हणूनच लोक जागृत दिसत होते. मुख्य म्हणजे जनसामान्यांमधल्या या भावना जाणून घेण्यात परकीय सरकारच्या व्यवस्थांना यश आले असावे अन्यथा चिनी सरकारतर्फे अधिकृतरीत्या कोणतीही बातमी नसूनही इतकी निर्णायक पावले झपाट्याने उचलली गेली याला काहीही सबळ कारण उरत नाही. 

इथेच लक्षात येते की भारतीय दूतावासाच्या तिथे जाळे किती घट्ट विणले गेले आहे आणि संकटसमयीसुद्धा प्रभावीपणे काम करू शकले होते. १९८९ साली जेव्हा तियान आन मेन चौकामध्ये बंद करून उठलेल्या तरुणांना रणगाड्याखाली चिरडण्यात आले होते तेव्हा पाश्चात्य माध्यमे त्याच्या अतिरंजित कथा छापत होते. पण भारतीय वकिलात मात्र अत्यंत संयमी आणि वास्तववादी अहवाल मायदेशी पाठवत होते अशी आठवण त्या काळी चीनमधील दूतावासात काम करणारे व पुढील आयुष्यात परराष्ट्र सचिव झालेल्या श्री विजय गोखले यांनी नमूद केली आहे. "वृत्तपत्रांवर अवलंबून न राहता आम्ही तरुण अधिकारी चीनच्या विद्यापीठांमधून फिरलो व तेथील विद्यार्थ्यांचे मत अजमावून  घेऊन मग आमचे अहवाल पाठवत होतो. विद्यार्थ्यांना चिरडण्याचा प्रत्यक्ष विद्यापीठामधील वातावरणावर या घटनांचा काय परिणाम झाला आहे याची छाननी करून मग पाठवलेले अहवाल प्रचारकी थाटाचे नव्हते तर सर्वात जास्त वास्तववादी होते" असे गोखले म्हणतात. साधारणपणे अशीच अवस्था देशाने २०२० साली बघितली आहे असे दिसते. फरक एवढाच  की  १९८९ साली पाश्चिमात्य माध्यमे अतिरंजित अहवाल छापत होते तर २०२० साली चीनने मिंध्या करून ठेवलेल्या या माध्यमांनी सत्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे चीनमधील हाहाःकाराच्या कोणत्याही बातम्या म्हणजे अफवा असल्याचे ही माध्यमे २०२० साली कोविदची साथ उसळली असताना आपल्याला ठामपणे सांगत होती. 

चीनमध्ये पसरलेल्या झाल्यामुळे येणाऱ्या बातम्यांची छाननी करून मोदी सरकार अत्यंत सावधपणे वागले आणि नागरिकांचे प्राण सुरक्षित राहावेत म्हणून त्याने अथक प्रयत्न केले याची नोंद सर्व जगाला घ्यावी लागली.  योग्य वेळी उचललेल्या सावधगिरीच्या पावलांमुळे पहिल्या लाटेमध्ये कमीतकमी  नुकसान आपल्या वाट्याला आले. गंमत अशी की आज मात्र एकामागोमाग एक खुलासे येत आहेत त्यातून जाणवते की साथीच्या दाहकतेची जाणीव असूनही या बाबी जगापासून लपवल्या गेल्या. त्यामध्ये जसे चीन सरकार होते तसेच काही डेमोक्रॅट्स आणि लिबबू माध्यमे. पण एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती ही की भारत सरकारकडे मात्र याची तंतोतंत माहिती असावी. आणि ती तशी आहे याची चीनला कल्पना आली असावी. दोनच दिवसां पूर्वी  मी एक विडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये असे सांगितले गेले आहे की चीनने अमेरिकन सीआयए चे अनेक अधिकारी पकडून तुरुंगात डांबल्यामुळे चीनच्या भूमीवरून गुप्त माहिती मिळवणे सीआयएला अशक्य झाले होते. असेच जर असेल तर ही गुप्त माहिती कोण बरे काढत होते? कोणाकोणापर्यंत ती पोचवली जात होती? त्यासाठी सहकार्य करण्याचे करार पाळले जात होते की "कागदाबाहेर" येऊन हे सहकार्य केले जात होते? कोविद १९ च्या तडाख्यातून भारत सावध व्हायच्या आत म्हणजे एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसात चीनचे सैन्य उत्तर सीमेवर आक्रमक पावले उचलू लागले होते. लॉक डाउनमुळे आर्थिक कंबरडे मोडलेला भारत लष्करी प्रत्त्युत्तर देणार नाही हा आडाखा होता की भारताकडे असलेली "माहिती" त्याने चीनविरोधात "वापरू" नये म्हणून दिलेला हा इशारा होता याचे उत्तर काळच देणार आहे. (जब भी कभी कोई आवाज मेरे खिलाफ जोर से आती  है तो समझ लेना मोदी ने चाबी टाईट कर दी है.......)

ली मेंग यान याना सुखरूपपणे हॉंगकॉंग मधून बाहेर काढले - त्यांना अमेरिकेत नेण्यात आले - त्यांच्याकडे जी माहिती होती तिची कल्पना कोणाकोणाला होती? ली मेंग यान यांच्याप्रमाणेच अन्यही काही व्यक्ती अशा प्रकारची माहिती देत होत्या का? भारतीय वकिलातीने यामध्ये काही कामगिरी बजावली काय हे प्रश्न उत्सुकता वाढवणारे आहेत. आणि ट्रम्प यांचा पराभव झाला तरी जी माहिती बाहेर आली नव्हती ती आता अचानक का बाहेर येऊ लागली आहे आणि ही माहिती बाहेर आणण्याचा सूत्रधार कोण आहे - त्याचे लक्ष्य काय आहे याची उत्तरे काढायची तरी कशी? असो! जसजशी परिस्थिती वळणे घेईल तसतसा अंदाज येत जाईल. गेल्या वर्षी केलेल्या विडिओ मध्ये मी म्हटले होते की कोविद १९ म्हणजे चीनसाठी चेर्नोबिल ठरू  शकतो. त्या माझ्या भाकिताचे काय होणार याचेही उत्तर कालौघामध्ये जवळ येत आहे असे वाटत आहे. 

कोंबडे झाकून ठेवले म्हणून पहाट व्हायची थांबत नाही. कधी ना कधी बिंग फुटणारच होते. बायडेन यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा प्रश्न निकालात काढला की उर्वरित तीन वर्षे बिनधोकपणे राज्य करता येईल असा बेत असावा. प्रश्न आता इतकाच उरला आहे की याचे खापर कोणावर फुटणार आहे - अमेरिकेत डेमोक्रॅट्स यासाठी चीनला जबाबदार धरणार की ट्रम्प तात्यांना? याचे उत्तर उण्यापुऱ्या नव्वद दिवसात मिळणार आहे. जर चीनला जबाबदार धरण्याचा डाव असेल तर ९० दिवस पूर्ण होण्याआधीच चीनमध्ये सत्ताबदलाच्या हाका ऐकायला मिळतील. आणि जर ट्रम्प तात्यांना दोषी ठरवण्याचे घाटत असेल तर चक्रव्यूहाची रचना हळूहळू तशी होताना दिसेल.

Friday 11 June 2021

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय? भाग १

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय?

भाग १

 कोविड १९ चा उगम नेमका कुठे झाला - त्याच्या प्रादुर्भावासाठी चीन जबाबदार आहे का - माणसाकडून माणसाकडे याचा संसर्ग आणि प्रादुर्भाव होतो हे माहिती असूनही ही माहिती चीनने जगापासून लपवून ठेवली का - आपल्या देशांतर्गत लोकांना एका गावातून दुसऱ्या गावाकडे जाऊ देण्यास प्रतिबंध घालणाऱ्या चीनने आपल्या व अन्य नागरिकांच्या परदेश प्रवासावर बंदी का घातली नाही असे प्रश्न आज उपस्थित झाले आहेत. शिवाय काही मान्यवर आणि विश्वसनीय शास्त्रज्ञांनी याबाबत विशेष माहिती दिली होती तिची प्रकाशात आणली गेली नाही असे आता दिसून येत आहे. या सर्वांमध्ये पंतप्रधान मोदी यांची कामगिरी विशेष उठून दिसत आहे. त्याविषयी थोडे लिहिते आहे.

या संसर्गजन्य रोगाची लक्षणे आणि त्याचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव बघून डिसेंबर २०१९ मध्येच वुहान शहरामधील डॉक्टर्स भयचकित झाले  होते. न्यूमोनियाचा हा प्रकार त्यांनाही नवा होता. आणि येणाऱ्या रोग्यांना नेमकी काय औषध योजना करावी याच्या बुचकळ्यात ते पडले होते. साहजिकच डॉक्टर्सच्या मित्रगटांमध्ये त्याची दबक्या आवाजात का होईना चर्चा चालू होती. त्यामध्येच होते एक डॉक्टर लिन वेन लियांग. साधारणपणे २५ डिसेंबरच्या आसपास त्यांनी आपल्या डॉक्टर मित्रांना याची माहिती देऊन सावध राहण्यास सांगितले. या वेळेपर्यंत ४०-५० पेशंट दाखल होऊनही त्यावर अधिकृत खुलासा दिला गेला नव्हता. लिन यांनी वी चॅट या व्हाट्सअप सदृश चिनी ऍप वरती  हा संदेश देऊन दोन तीन दिवस झाले नसतील की तेथील पोलिसांनी त्यांना बोलावणे पाठवले. आपण हा संदेश का लिहिलात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यांनी उत्तर देऊनही पोलिसांचे समाधान झाले नाही. अखेर २८ डिसेंबर  आसपास या डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. शेवटी दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यांना सोडण्यात आले. यातून अन्य डॉक्टर्सना प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले होते. शिवाय ३० डिसेंबर रोजी प्रथमच चीन सरकारने अधिकृतरीत्या नव्या प्रकारच्या न्यूमोनियाचे रोगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत असे जाहीर केले. सोबतच ह्या रोगाचा प्रसार माणसाकडून माणसाकडे होत नसल्याचे सांगण्यात आले होते. या खुलाशामधून रोगाचे गांभीर्य कितपत आहे ते डॉक्टर्सना तसेच लोकांनाही समजणे कठीण होते.

याच दरम्यान म्हणजे चीन सरकारने ३० डिसेंबर रोजी खुलासा केल्यानंतर  १ जानेवारी रोजी हॉंगकॉंगमध्ये याच विषयावर काम करणाऱ्या डॉक्टर ली मेंग यानना त्यांच्या वरिष्ठांनी बोलावून घेतले व ह्यामध्ये काय माहिती मिळते ते तपासून बघ असे सांगितले. ली मेंग यान यांनी शास्त्रीय पद्धतीने आपला शोध चालू ठेवला. ते करत असताना आपल्या डॉक्टर सहकाऱ्यांशी खास करून वुहान संस्थेमध्ये काम करणाऱ्या परिचितांशीही त्या बोलत होत्या, तेव्हा त्यांच्या अनेक गोष्टी ध्यानात येत गेल्या. अखेर गुणसूत्रांचा अभ्यास केल्यावर १६ जानेवारी रोजी त्यांनी हे अनुमान काढले की हा व्हायरस नैसर्गिक नाही - तो कोणत्याही प्राण्याच्या संपर्कात आल्यामुळे माणसाला झालेला नाही - हा व्हायरस प्रयोग शाळेत "बनवला" गेला आहे. त्याच्या एकूण सुमारे ३०००० पैकी ३००० गुणसूत्रांमध्ये बदल केला गेला आहे ज्या बदलामुळे त्याची दाहकता वाढली आहे असे त्यांच्या लक्षात आले होते.  ह्या बाबीचा त्यांनी अधिक कसून तपास केला. अखेर आपल्या वरिष्ठांकडे हा विषय त्यांनी काढला. १९ जानेवारी रोजी वरिष्ठांनी त्यांना हा विषय बाजूला ठेव व अमुक अमुक विषयावर लक्ष केंद्रित कर म्हणून सांगितले. एक प्रकारे ली मेंग यान याना त्या तपासातून बाहेर काढण्याचा विचार वरिष्ठ करत होते असा त्यांचा समज झाला होता.

ली मेंग यान यांचे हे काम चालू होते तोवर जगामध्ये अन्य पावले उचलली जात होतीच. एकीकडे चीन सरकारने नव्या न्यूमोनियाच्या रोग्यांची भरती झाल्याची कबुली दिली होती तर दुसरीकडे वुहान प्रयोगशाळेची सूत्रे हाती घेण्यासाठी एका चिनी लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आले. ही बाब धक्कादायक होती. एका वैद्यकीय संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेच्या सर्वोच्च पदावर लष्करी अधिकारी नेमण्याचे प्रयोजन काय होते? की ही प्रयोगशाळा चिनी लष्करासाठी जैविक हत्यारे बनवण्याचे काम करत असल्यामुळे या संकटसमयी तिची सूत्रे सांभाळण्यासाठी आणि नको ती गुपिते बाहेर पडू नयेत म्हणून कडक शिस्त अमलात आणण्यासाठी एका कठोर लष्करी अधिकाऱ्याला तिथे आणावे लागले होते? एकंदरीत व्यवसायाने केवळ डॉक्टर असलेली मंडळी इथून पुढे संस्थेचा कारभार हाकण्यात कमी पडतील अशा अंदाजाने हे पाऊल उचलले गेले असावे.

५ जानेवारी रोजी पहिल्यांदाच ट्विटर वरती गार्बो गुरुंग नामक व्यक्तीने कोविड १९ च्या संदर्भातले एक ट्विट टाकले.

"18 years ago, #China killed nearly 300 #HongKongers by unreporting #SARS cases, letting Chinese tourists travel around the world, to Asia specifically to spread the virus with bad intention. Today the evil regime strikes again with a new virus.

"१८ वर्षांपूर्वी चीनने सार्स रोगाविषयी माहिती दडपून ठेवून दुष्ट हेतूने आपल्या नागरिकांना जगभर फिरू दिले त्यातून  ३०० हॉंगकॉंगवासी जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता एका नव्या व्हायरसचा हल्ला ह्या सत्तेने आपल्यावर केला आहे" अशा अर्थाचे हे ट्विट होते. त्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले. कारण या वेळपर्यंत रोगाच्या भीषण स्वरूपाची कोणालाच कल्पना आली नव्हती. २३ जानेवारी रोजी प्रथमच डेली मेल या वृत्तपत्राने एक लेख छापला होता.  वुहान सदृश प्रयोगशाळेमधून एखादा भीषण व्हायरस निसटू शकतो असा इशारा शास्त्रज्ञांनी २०१७ साली दिला होता असे या लेखामध्ये म्हटले होते. २६ जानेवरीच्या वाशिंग्टन टाइम्सच्या अंकामध्ये वुहान येथील प्रयोग शाळेमधून कोविड १९ व्हायरसचा प्रसार झाला असण्याची शंका व्यक्त केली गेली होती. याच दिवशी लॅन्सेट या प्रतिष्ठित सायन्स मासिकामध्ये सुमारे ४० ख्यातनाम शास्त्रज्ञांनी व्हायरसचा उगम वुहानच्या मच्छी बाजारात झाला नसल्याचे म्हटले होते.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती भारत सरकार काय करत होते हे पहिले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

२७ जानेवारी रोजी केरळच्या त्रिसूर गावामध्ये एक २० वर्षीय युवती सुका खोकला व घसा दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेली. तिला ताप आलेला नव्हता तसेच श्वास पण लागलेला नव्हता. पण २३ जानेवारी रोजी तिने  वुहान शहर ते  कुमिनटांग शहर असा प्रवास ट्रेनने केला होता. आणि प्रवासामध्ये तिला स्टेशनवर आणि ट्रेन मध्ये अनेक प्रवासी खोकल्यामुळे बेजार झालेले दिसले होते. २६ तारखेपर्यंत तिला कोणताही त्रास नव्हता. ती कोणत्याही कोविड रोग्याच्या संपर्कात आल्याचे तिला आठवत नव्हते. तसेच ती वुहानच्या (भविष्यात प्रकाशझोतात आलेल्या) मच्छी बाजारातही गेली नव्हती.

ही बातमी येण्याच्या एक दिवस आधी बिझिनेस स्टॅंडर्ड या वृत्तपत्राने बातमी छापली होती की  वुहान शहरामध्ये सुमारे २५० भारतीय अडकले असून भारत सरकार त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी चीन सरकारच्या संपर्कात आहे. या तारखेपर्यंत चीनमध्ये मृतांची संख्या ५६ झाली होती आणि २००० हुन अधिक व्यक्तीना रोगाची लागण झाली होती, त्यामध्ये सुमारे २३ जण परदेशी नागरिक होते. २६ जानेवारी रोजी भारतीय दूतावासाने तिसरी हॉट लाईन चालू केली होती त्यावर सुमारे ६०० कॉल्स येऊन गेले होते. वुहान शहरामध्ये लॉक डाउन  २३ जानेवारी पासून लागू झाला  होता. चीनच्या अन्य १२ शहरांमध्ये हे हीच दक्षता घेतली जात होती त्यामुळे या शहरांमधूनही भारतीय नागरिक अडकले होते. साधारणपणे जानेवारी शेवटचा आठवडा व फेब्रुवारी पहिल्या आठवड्यामध्ये चीनमध्ये चिनी नव्या वर्षाचा सोहळा धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो त्या निमित्ताने मिळालेली सुट्टी पकडून अनेक भारतीय  विद्यार्थी दोन आठवड्यापूर्वीच मायदेशी परतले होते. २३ जानेवारी पासून लागू झालेल्या लॉक डाउनच्या कचाट्यातून ते सुटले होते तरी काही विद्यार्थी मागे  रेंगाळले होते. ते आता मायदेशी परतण्यास अधीर झाले होते. साथीच्या रोगाचे नियंत्रण करणाऱ्या चिनी संस्थेच्या डॉक्टर्सनी सांगितले होते की हे विद्यार्थी भारतात परतले की त्यांना हॉस्पिटल  मध्ये ठेवण्याची गरज नाही, नुसते घराबाहेर न पडण्याचे बंधन पुरेसे ठरेल. त्यांना रोगाची काही लक्षणे दिसली तरच हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवावे.  हा सल्ला तरी कितपत बरोबर होता - खरे तर दिशाभूल करणारा होता हे भविष्यात दिसून आले.

भाग २ पुढे चालू

Tuesday 13 October 2020

फॅड नव्हे क्वाड

 



 

१२ ऑक्टोबर रोजी सुरु झालेला आठवडा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आठवडा ठरू शकतो. १२ तारखेला म्हणजे काल भारत चीन यांच्यादरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची बैठक झाली सीमेवरील तणावग्रस्त परिस्थितीवर वाटाघाटीमधून  मार्ग काढण्याच्या प्रयत्नामधला हा एक भाग होता. आजवर अशा अनेक बैठका लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झाल्या तसेच संरक्षण खाते आणि परराष्ट्र खाते या सरकारी अंगामधल्या विविध अधिकाऱ्यांच्या तसेच मंत्री पातळीवरील बैठकाही झाल्या. त्या होऊन सुद्धा परिस्थितीमध्ये फरक पडलेला नाही. अशा तणावपूर्ण परिस्थितीत १२ ऑक्टोबरला बैठक होणार होती त्या आधीच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री रॉबर्ट ओ ब्रायन यांनी इशारा दिला की "बैठका आणि वाटाघाटींमधून चीनच्या वर्तणुकीमध्ये फरक पडणे अशक्य आहे हे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. हे वास्तव मान्य न करता - ते टाळण्यातून आपल्या हाती काहीही लागणार नाही. एका गालावर थप्पड बसली की दुसरा गाल पुढे करण्याच्या आपले धोरण फार काळ चालत आले आहे." या धोरणामध्ये बदलाची गरज आहे असे ओ ब्रायन यांनी सूचित केले आहे. यामधला दुसरा गाल पुढे करण्याचा संदर्भ महत्वाचा असून त्यातून आपल्याला महात्मा गांधींची आठवण आली नाही तरच नवल. त्याचा रोख अर्थातच भारताकडे आहे कारण दुसरा गाल पुढे करण्याला महात्मा गांधींच्या नीतीचा मोठा संदर्भ आहे. अहिंसेच्या  धोरणाचा सतत उच्चार करणाऱ्या गांधींचे धोरण आज भारताने राबवू नये कारण शत्रू सीमेशी येऊन भिडला आहे आणि या परिस्थितीमध्ये शांततापूर्ण मार्ग निघत नसतो असे ओ ब्रायन यांना म्हणायचे असावे. तेव्हा भारताने गांधींच्या शिकवणुकीवर भर न देता वास्तव स्वीकारावे आणि आपले वास्तववादी धोरण ठरवावे असे ओ ब्रायन स्पष्ट शब्दात बोलले आहेत. त्यांचे हे विधान भारत चीन यांच्यातील लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या मुहूर्तावर यावे याचे औचित्यही विशेष आहे.  अर्थात हे विधान केवळ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आलेले नसून त्यामागे अन्य घटनांचाही संदर्भ आहे. याच आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये अमेरिकन शिष्टमंडळ येत आहे. २६-२७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या द्विपक्षीय संरक्षण आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीची पूर्वतयारी करण्याच्या उद्दिष्टाने ही भेट आयोजित केली गेली आहे. नुकत्याच झालेल्या क्वाड बैठकीतील निर्णयांचा पाठपुरावा करण्याचे प्रस्ताव समोर आहेत. ओ ब्रायन यांच्या विधानाला ही पार्श्वभूमीसुद्धा आहेच. अशा प्रकारे परिस्थितीवर भाष्य करणारे विधान केवळ ओ  ब्रायन यांच्याकडून आले नसून अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी माईक पॉम्पीओ यांनीही दूरगामी दृष्टिकोनातून काही विधाने केली आहेत. 

अमेरिकेचे उप परराष्ट्र मंत्री स्टिव्ह बीगन या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये परराष्ट्र सचिव श्री हर्ष शृंगला यांची भेट घेतील. जगापुढे दाखवण्यासाठी उभयपक्षी संरक्षणाचे मुद्दे तसेच आर्थिक सामंजस्यावर चर्चा - भारत चीन सीमेवरील अशांतता - कोविड १९ च्या संकटाचा सामना आणि जागतिक पुरवठा व वितरण जाळे उभारण्याची तयारी असे विषय या प्रसंगी जाहीर निवेदनामध्ये दिले जातील. पण अशा जाहीर विधानांवर फारसे अवलंबून राहू नये. ही बैठक टोकियो शहरातील क्वाड बैठकीनंतर होत आहे साहजिकच क्वाडमधील निर्णयांना मूर्त रूप देण्याचे काम महत्वाचे आहे. या बैठकांच्या यशावरती २६-२७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या चर्चेची यशस्वीता आकाराला येईल. त्यामुळे त्याकडे गांभीर्याने बघितले जात आहे. म्हणजेच बरेच काही बोलून बरेच काही पडद्याआड ठेवण्याच्या डिप्लोमसीचा अवतार बघायला मिळणार आहे. अर्थात स्पष्ट बोलण्याचे प्रयत्न अमेरिकेकडून होत आहेत पण भारत मात्र जाहीररीत्या काही बाबी बोलून दाखवण्याचे टाळत आहे असे चित्र आहे. म्हणूनच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ओ ब्रायन आणि स्टेट सेक्रेटरी पॉम्पीओ यांची भारताला वास्तव मान्य करा असे आवाहन करणारी विधाने आली आहेत. 

आजच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सकारात्मक चित्र उभे राहील अशा प्रकारचे उभयपक्षी निवेदन आज प्रसिद्धीस देण्यात आले आहे. म्हणजेच अमेरिकन शिष्टमंडळाच्या भेटीच्या मुहूर्तावर भारतीय कॅम्पमध्ये चीनच्या विरोधात धारदार भूमिका घेण्याला वाव न ठेवण्याचे धोरण चीनने अवलंबले असावे. पण शिष्टमंडळाची पाठ फिरताच आणि भारताने मऊ भूमिका घेताच वारे पालटतील आणि चीन पुन्हा एकदा पूर्वपदावर जाऊन तशीच अरेरावी करत राहील.  अशा पद्धतीचे Mind Games चीन उत्तमरीत्या खेळत असतो. त्याला हवे तेव्हा शत्रूने त्याच्या फायद्याची भूमिका घ्यावी म्हणून कोणत्याही प्रकारचा भूलभुलैया खेळणे त्याला वावगे वाटत नाही. हा चीनचा स्वभाव आहे. त्याच्या शब्दावर मोदी कधीच १००% विश्वास टाकून नव्हते. 

अनेकदा अशी टीका केली जाते की गुजरातमध्ये साबरमतीच्या किनारी बसून शी जीन पिंग यांच्यासोबत झोके घेणाऱ्या मोदींना शी जिनपिंग यांनी धोका देऊन पाठीत खंजीर खुपसला कारण मोदी त्यांचे अंतरंग ओळखू शकले नाहीत. परंतु चीनला घेरण्याची तयारी मोदी यांनी २०१४ सालापासून कशी केली आहे याकडे हे टीकाकार सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत असतात. फार कशाला २०१४ साली सत्ता हाती आली तेव्हा भारताची युद्धसज्जता केवळ चार दिवसाच्या युद्धावर येऊन ठेपली होती ना? मग आपले बल पुरेसे वाढविण्याइतका अवसर मिळेपर्यंत आणि चढाईसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण होईपर्यंत मोदींनी शी जिनपिंग यांना झुलवले असे आपण का म्हणत नाही? आज सहा वर्षांच्या कारकीर्दीमध्ये मोदींनी संरक्षण सिद्धतेसाठी कोणते हिमालय पार केले हे सर्व देश जाणतो. आणि अशी तगडी तयारी करून सुद्धा  मोदी अजूनही अरेरावीचे शब्द उच्चारत नाहीत कारण शब्दांची ताकद त्यांना कळते. 

 म्हणून जे जाहीर आहे तेच चित्र खरे आहे असे मानण्याचे कारण नाही. चीनसोबतचे वास्तव भारत १००% जाणून आहे. आणि त्यासाठी रणभूमीमध्ये उतरावे लागले तरी बेहत्तर असा निर्णयही त्याने घेतला आहे हे पंतप्रधान मोदी यांनी लडाख भेटीमध्ये न बोलता स्पष्ट केले होते. तेव्हा चीनच्या हेतूंविषयी भारताच्या मनामध्ये संदेह आहे असे अजिबात नाही. मग असे असूनही भेटींची गुऱ्हाळे कशासाठी चालू आहेत असा प्रश्न येऊ शकतो. जी पावले उचलायची आहेत ती तेव्हाच जाहीर बोलून दाखवली जातात जेव्हा ती जाहीर करण्यामधून एक तर देशाला काही लाभ उठवायचा असतो किंवा त्यातून काही इशारा द्यायचा असतो. हे दोन्ही हेतू साध्य होत नसतील तर जाहीर भूमिका घेण्याचे प्रयोजन राहत नाही पण याचा अर्थ असा मात्र नव्हे की परिस्थितीचे मूल्यमापन करण्यामध्ये मोदी सरकार कमी पडत आहे. 

चीनचे खरे स्वरूप काय याची जाण नसती तर भारताने नुकत्याच टोकियो शहरामध्ये झालेल्या क्वाड बैठकीमध्ये भाग घेतला नसता किंबहुना क्वाड संकल्पना देखील खोडून काढली असती. पण चीनची पुंडाई लक्षात घेता त्याला वेसण घातलीच पाहिजे या निष्कर्षाप्रत आलेल्या या चार देशांनी आपल्या संरक्षणासाठी तसेच देशाचे व्यवहार सुरळीत चालू राहावेत म्हणून तयारी सुरू केली आहे. सर्व प्रकारच्या मालाचा पुरवठा नियमित चालू राहावा म्हणून चीन व्यतिरिक्त अन्य कोणत्या देशातून आपला माल बनवून घेता येईल याची चाचपणी चालू आहे. तयारी चालू आहे. कमीतकमी मुदतीमध्ये चीनवरील परावलंबित्व कमी करण्यावर या चार देशांचे एकमत झाले आहे म्हणूनच क्वाडच्या बैठकाना महत्व आले आहे. जपान ऑस्ट्रेलिया अमेरिका आणि भारत ही चौकडी आपल्याला निष्प्रभ करण्यासाठी पावले उचलत आहेत अशी खात्री पटल्यामुळेच चीन अधिकाधिक अस्वस्थ होत आहे. या चौकडीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून केवळ हॉंगकॉंग नव्हे तर तैवान आणि तिबेट तसेच शिन ज्यांग प्रांत चीनपासून तोडण्याच्या योजनेला अंतिम स्वरूप दिले जात आहे अशी चीनची रास्त समजूत झाली आहे. या समजुतीमुळेच  भारतीय सीमेवरती अधिकाधिक आक्रमक भूमिका चीन घेत आहे. देशांतर्गत आणि देशाबाहेर आपले वजन वाढवण्याचे साधन म्हणून शी जिनपिंग याना लष्करी विजय कोणत्याही परिस्थितीमध्ये नोंदवायचा आहे. आणि त्यासाठी भारत म्हणजे कोपराने खणण्याइतका पोचट फुसका देश आहे अशी त्यांची समजूत झाली असावी. (कदाचित या अगोदरच्या युपीए सरकारने चिनी कम्युनिस्ट पक्षाशी जो पक्षीय करार केला त्यामुळे भारतीयांच्या अंगामध्ये फारसे धाडस नसल्याची समजूत झाली असावी.) या गैर समजुतीमधून भारत हे एक सॉफ्ट टार्गेट असल्याचा निष्कर्ष चीनच्या सरकारने काढला असावा. अर्थात त्याचे हे आडाखे पूर्णपणे चुकले असल्याची चिन्हे त्याला लडाखमध्ये दिसत आहेत पण खरे तर वास्तव काय आहे ते स्वीकारण्याची चीनचीच तयारी नसावी. चीनच्या पुंडाईला आळा घालण्याच्या हेतूनेच क्वाडसाठी हे चार देश तयार झाले आहेत हे उघड आहे. जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका एकत्र आले तर चीनच्या कपाळाला आठ्या पडत  नाहीत पण औकात नसताना भारत त्यामध्ये सामील होतो आणि अन्य देश त्याला सोबत घेतात याने त्याचा तिळपापड झाला आहे. 

क्वाड विषयी अनेकांची अशी समजूत झाली आहे की हे एक नाटक चालू आहे - अमेरिकेला त्यामध्ये रस नाही. चीनने जर अमेरिकेच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का न लावण्याचे आश्वासन दिले तर अमेरिका आज क्वाडच्या व्यासपीठावरून जी भूमिका घेत आहे  ती बासनात गुंडाळून ठेवेल. कदाचित चीनचीही अशीच समजूत असावी. प्रत्यक्षात मात्र अमेरिका क्वाडसंदर्भात अतिशय गंभीर असल्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकन स्टेट सेक्रेटरी पॉम्पीओ यांच्या बोलण्यामध्ये म्हणून क्वाडला संस्थात्मक स्वरूप कसे देता येईल याबद्दल स्पष्ट कल्पना असल्याचे दिसत आहे आणि अन्य देशांना ते त्यासाठी तयार करत आहेत हेही स्पष्ट होत आहे. क्वाड मधील देश एकमेकांना आपापले लष्करी तळ वापरू देण्यासाठी व अन्य प्रकारच्या सहकार्यासाठी सविस्तर चर्चा करून औपचारिक स्वरूपाचे करारही करत आहेत. जर अन्य देशांसोबत भारतानेही अशा पद्धतीचे करार करण्यामध्ये आपण राजी असल्याचे सूचित केले आहे तर मग व ब्रायन असोत की माईक पॉम्पीओ - भारताला "वास्तव स्वीकारा" असे का बरे सांगत आहेत? चीनकडून उदभवलेल्या धोक्याचा विचार करता मोदी सरकारने क्वाड मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि सहकार्य करण्यास मान्यता दिली पण अमेरिकेचे तेवढ्याने समाधान झाले नसावे. त्यांना भारत हा आपल्या लष्करी समझौत्यामधला एक देश बनवा असे मनात असावे. मोदी सरकारने आजवर असे करण्याचे टाळले आहे. आपले स्वतंत्र अस्तित्व अबाधित ठेवून - लष्करी सामग्री आपण कोणाकडून घ्यावी - अन्य देशांशी असे करार असावेत की नसावेत या संदर्भामधले आजचे भारताचे स्वातंत्र्य गमावून अमेरिकेशी सहकार्याचे करार करण्यास मोदी उत्सुक नाहीत. असे आहे म्हणूनंच पॉम्पीओ आणि ओ ब्रायन मोदी सरकारला इशारे देत आहेत. आणि त्यांचे इशारे इथे देणारे अन्य अमेरिकन थिंक टॅंक वाले देखील कमी आहेत काय?

तर आपल्याला आठवत असेल की ट्रम्प म्हणाले होते - Modi is a tough negotiator. वाटाघाटी करताना मोदी बिलकुल नरमाईची भूमिका घेत नाहीत हे मोदींना ट्रम्प सारख्या पक्क्या बिझिनेसमॅन कडून मिळालेले सुयोग्य सर्टिफिकेट आहे. गंमत बघा आज वर अमेरिकन सरकार वर नेहमी टीका होत असते की अमेरिकेचे परराष्ट्र धोरण म्हणजे transactional आहे - . म्हणजे एकेक व्यवहाराला अनुसरून धोरण बनवण्याची अमेरिकेची शैली असून ते व्यापक दृष्टी समोर ठेवून धोरण आखत नाहीत.  त्यामध्ये दीर्घकालीन व्यापक व्हिजन बघायला मिळत नाही. मोदींशी व्यवहार करताना मात्र आज अमेरिका व्यापक व्हिजन वर भर देत आहे तर मोदी transactional नाते जोडू बघत आहेत. अमेरिकेसारख्या सत्तेला व्यापक व्हिजन वर येण्यास भाग पाडणारे मोदी चीन समोर सहजासहजी गुडघे टेकतील अशी अपेक्षा करणेच मूर्खपणाचे आहे. तेव्हा क्वाड अस्तित्वात येणारच पण भारताच्या सर्व अटी मान्य करून!!  मित्रानो आज परिस्थिती अशी आहे की जपान असो की ऑस्ट्रेलिया वा अमेरिका - चीनला धडा शिकवण्यासाठी सगळ्यांना भारताची "गरज" आहे आणि मोदी त्याची पूर्ण किंमत वसूल केल्याशिवाय राहणार नाहीत. 

गहन प्रश्न एवढाच आहे की क्वाड सारख्या पुढाकाराला किती काळाचे जीवन मिळणार आहे. याचे मूळ कारण आहे ते अर्थातच अमेरिकेत होउ घातलेली अध्यक्षीय निवडणूक. या निवडणुकीत ट्रम्प जिंकले तर त्यांनी पुढाकार घेतलेली ही धोरणे निदान पुढची चार वर्षे बिनधोक चालू शकतील पण ट्रम्प पराभूत झाले आणि डेमोक्रॅट नेते जो बायडेन जिंकले तर मात्र भारताने आखलेल्या योजनांचे काय होणार असा प्रश्न  उपस्थित होईल. कदाचित हेच कारण असावे की मोदी आपले सगळे पत्ते उघडून दाखवण्याचे टाळत आहेत.  कसेही करून भारताशी सर्वव्यापी संरक्षण करार आताच करून टाकावेत म्हणून अमेरिकन शिष्टमंडळ दबाव जरूर टाकेल पण मोदी ठाम राहतील. त्यांच्या समोर दोन पर्याय खुले आहेत. ट्रम्प जिंकले तर काय पावले टाकावीत आणि ट्रम्प हरले तर काय पावले टाकावीत. दोन्हीची तयारी करून भारतीय चमू बसला आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अमेरिकन निवडणुकीचे चित्र जसेजसे स्पष्ट होईल तसेतसे चीन संदर्भातले आपले धोरण "बोलके" होत जाईल. उणेपुरे दहा बारा दिवस उरलेत उत्कंठा असली तरी तेवढी कळ आपल्याला काढावी लागणार आहे.  






Sunday 11 October 2020

अडव्हान्टेज बायडेन?

 






अडव्हान्टेज बायडेन?


अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक आता शेवटच्या तीन आठवड्यात प्रवेश करत आहे आणि साहजिकच जिंकणार कोण याची उत्कंठा शिगेला पोचत आहे. सुरूवातीच्या काळामध्ये चीनविरोधात ठाम भूमिका घेणारे ट्रम्प निर्णायकरीत्या कोरोना पीडित अमेरिकेतील सामान्य लोकांचे लक्ष आपल्या भूमिकेकडे खेचून घेत होते. कारण त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन हे चीन विरोधात फारसे काही बोलण्याच्या फंदात पडत नव्हते. तसेच निवडणुकीच्या प्रचार रिंगणामध्येही बायडन हिरिरीने आपली मते मांडताना दिसत नव्हते. म्हणूनच ट्रम्प ही निवडणूक सहजरीत्या जिंकतील असे चित्र होते. मात्र ८ ऑक्टोबरच्या अध्यक्षीय उमेदवारांच्या परिसंवादामध्ये आपल्या हटवादी भूमिकेमुळे ट्रम्प प्रेक्षकांवर छाप पाडण्यामध्ये अयशस्वी ठरले. हेकेखोर अशी आपली प्रतिमा त्यांनी स्वतःच अधोरेखित केल्यामुळे तसेच बायडन यांच्या कथनामध्ये वारंवार अडथळे आणल्यामुळे ही वादफेरी बायडन यांनी जिंकल्याचा कौल आला. त्यातच ट्रम्प तसेच त्यांच्या पत्नी मेलानिया यांना कोरोनाने गाठल्याच्या बातम्यांनी अचानक रिपब्लिकन गोटामध्ये परिस्थिती आमूलाग्र बदलते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

आजच्या घडीला ट्रम्प यांना अनुकूल म्हणता येतील अशा बाबींमध्ये पहिला मुद्दा आहे तो अर्थातच चीन विरोधाचा. अमेरिकेमधल्या ७०%हून अधिक लोकांना चीनविरोधात कडक कारवाई व्हावी असे वाटत आहे. चीन विरोधामध्ये कडक भूमिका घेणारे ट्रम्प म्हणूनच आपली मतपेटी राखून आहेत. कोरोना विरोधातील लढाईमध्ये ट्रम्प यांनी चुकीची पावले उचलल्यामुळे अमेरिकेमध्ये सुमारे दोन लाखाहून अधिक बळी गेले असा प्रचार करण्यात आला आहे. या अकार्यक्षमतेचे खापर विरोधक ट्रम्प यांच्यावर फोडू इच्छितात. राजकारणाचा भाग म्हणून असले युक्तिवाद ठीक आहेत. पण या जोडीला ट्रप यांचा विरोधक आपण चीनवर कारवाई करू असे म्हणत नसेल आणि चीनच्या आहारी गेलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या घोळामुळे ही परिस्थिती ओढवली यावर ब्र ही काढत नसेल तर मग जनतेला तरी कोणता पर्याय राहतो? या विषयावरील तीव्र लोकभावना लक्षात घेऊन आता जो बायडन यांनी चीनचे निदान समर्थन करण्याचा सुप्रसिद्ध डेमोक्रॅट पवित्रा बदलला आहे किंबहुना ट्रप यांच्या जोरदार प्रचारामुळेच त्यांना चीनचे समर्थन आवरते घ्यावे लागले हे उघड आहे. गेल्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी रशियाची मदत घेऊन हिलरींचा पराभव केला असल्याच्या गावगप्पा उठवण्यात आल्या होत्या त्यामध्ये तथ्य असल्याचे कुठेही पुढे आलेले नाही. त्यामुळे ट्रम्प यांच्या शब्दाला वजन प्राप्त झाले आहे. या उलट डेमोक्रॅटच चीनच्या कह्यात असल्याच्या अनेक बाबी पुढे येत असल्यामुळे आपले दोष झाकण्याच्या नादामध्ये ते काय चूक करून बसले आहेत ह्याचे भान आता डेमोक्रॅटस् ना आले आहे. याखेरीज फ्लॉईड या कृष्णवर्णिय आंदोलकाचा प्राण एका पोलिस अधिकार्‍याच्या हेकेखोरीने गेला त्या घटनेचे डेमोक्रॅटस् नी भांडवल केले खरे. पण या घटनेचा न्यायालयीन अथवा योग्य पाठपुरावा करून दोषींना शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लावून धरण्याऐवजी संपूर्ण देशभर हिंसक आंदोलने छेडण्यात आली आणि त्यामध्ये अनेक दुकाने व व्यवसाय यांच्यावर भीषण हल्ले केले गेले. या सर्वाचा डेमोक्रॅटस् नी कधीच निषेध केलेला दिसला नाही. आजपर्यंत कायद्यानुसार चालणार्‍या अमेरिकेला ही दृश्ये नवी होती. आपल्या गार्‍हाण्याचा पाठपुरावा कायदेशीर मार्गाने न करता अशाप्रकारे हिंसेचा वापर करण्यात आला आणि त्यामागे देशातील कोणत्या विध्वंसक शक्ती कार्यरत आहेत हे जनतेपासून लपून राहिलेले नाही. यशस्वी परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून ट्रम्प यांनी विशेष प्रयत्न करून अफगाणिस्तानमधून सैन्य माघारी आणण्याच्या  आपल्या आश्वासनावर कारवाई केली आहे. तसेच मध्यपूर्वेमध्ये आजवर इस्राएलसोबत तीन शांतता करारही घडवून आणले आहेत. या भक्कम परिस्थितीमुळेच ट्रम्प यांचे पारडे निदान ८ ऑक्टोबरपर्यंत तरी जड होते. 

आपल्याला आठवत असेल तर २०१६ च्या निवडणुकीमध्येही अमेरिकन माध्यमे शेवटपर्यंत श्रीमती हिलरी क्लिंटन यांचेच पारडे वादातीत जड असल्याचे सांगत होते. पण शेवटी निकाल आले ते हे सर्व कौल पालटवणारे ठरले. आजदेखील बायडेन यांचे पारडे जड आहे असे माध्यमे म्हणत असली तरी ट्रम्प यांची विश्वासार्हता पूर्णपणे लयाला गेलेली नाही. निवडणुकीमध्ये दोन्हीकडचे पाठीराखे ठाम असले तरी कुंपणावरचा जो मतदार असतो तो महत्वाचा ठरतो. आणि अशा मतदाराला वादफेरीअखेर ना ट्रप आपल्या बाजूला ओढू शकले ना बायडेन. मग असा मतदार मतदानापासून दूर राहण्य़ाची शक्यता वाढेल. आक्रमक वागणूकीमुळे जवळ येऊ न शकलेल्या मतदाराला आकर्षित करण्याचे मार्ग कोणते याची चाचपणी ट्रम्प करत असतीलच. 

असे म्हणतात की गेल्या निवडणुकीत प्रचारमोहिमेमधले शेवटचे दोन आठवडे ट्रम्प यांना हात देऊन गेले आणि हिलरी यांची बाजू क्रमाक्रमाने लंगडी पडत गेली. आता देखील शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये आपल्या पोतडीमधून ट्रम्प महाशय कोणते गौडबंगाल बाहेर काढणार याकडे लक्ष लागले आहे. विरोधकांच्या खोटारड्या प्रचाराला तोंड फोडणे आणि त्यातून ते कसे दुतोंडी आहेत हे दाखवून देण्यातून विरोधकांची विश्वासार्हता जनतेसमोर घालवणे आणि हे पद भूषवण्याच्या त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे तंत्र ट्रम्प यांनी गेल्या निवडणुकीमध्ये वापरले. शिवाय सोशल मिडीयाचा अत्यंत खुबीने केलेला वापर त्यांना हिलरींना हव्या असलेल्या स्त्रीवर्गातील मतदारांची मतेही मिळवून देण्यात यशस्वी ठरला. यावेळी अशी कोणती युक्ती ट्रम्प वापरू बघतात याविषयी कोणतीही माहिती बाहेर आलेली नाही. अर्थातच आपली रणनीती काय आहे हे कोणताही उमेदवार आधीच जाहीर करत नसतो. तरीसुद्धा ट्रम्प यांनी काही गोष्टींकडे अंगुलीनिर्देश मात्र जरूर केलेला दिसतो. आणि या खळबळजनक बाबी शेवटच्या दोन आठवड्यात जर उजेडात आणल्या गेल्या तर निवडणूकीचे पारडे असे फिरेल याविषयी आज तर्क करता येऊ शकतो. ट्रम्प यांच्यासाठी हा दुसर्‍या कारकीर्दीसाठी मागितला जाणारा कौल असल्यामुळे त्यांच्यासाठी incumbency factor चे महत्व कमी करून लोकांचे लक्ष अधिक महत्वाच्या बाबींकडे वळवणे याला एक चाल म्हणून महत्व प्राप्त होणार आहे. म्हणून अशा दोन बाबींचा उल्लेख मला महत्वाचा वाटतो. 

ट्रम्प यांच्या पूर्वीचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकीर्दीमध्ये दोन घटना विस्फोटक ठरल्या होत्या. एक म्हणजे एडवर्ड स्नोडेन आणि दुसरे म्हणजे जुलियन असान्ज. यापैकी स्नोडेन यांनी अमेरिकन सरकार सुरक्षेच्या नावाखाली स्वतःच्या नागरिकांवर टेहळणी करते म्हणून आज अमेरिकेतील कोणत्याही नागरिकाला आपली माहिती नको त्या माणसाच्या हाती निश्चित पोचणार नाही याची खात्री उरलेली नाही असा आरोप केला होता. या साठी स्नोडेन यांनी भरमसाठ माहिती अमेरिकन सरकारी दफ्तरातून मिळवली आणि ती जाहीर देखील केली होती. टेहळणी करण्यासाठी अमेरिकन सरकार टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील कंपन्यांची मदत घेत असून त्यामध्ये Five Eyes Intelligence Alliance मधील ऑस्ट्रेलिया कॅनडा न्यूझीलन्ड युनायटेड किन्गडम या देशांचे सहकार्य घेतले जात आहे असा आरोप स्नोडेनने केला होता. स्नोडेनने आपल्या म्हणण्य़ाच्या पुष्टयर्थ अमेरिकेची हजारो गुप्त कागदपत्रे कॉपी करून घेतली होती. त्याने दिलेल्या मुलाखतीच्या आधारे ही स्टोरी द गार्डियन वॉशिन्गटन पोस्ट डेर स्पीगेल व न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केली होती. यानंतर स्नोडेनना हेर घोषित करून त्याचा ताबा मिळवण्याचे प्रयत्न अमेरिकेने केले पण रशियाच्या मदतीमुळे तो देशाबाहेर ठाण मांडून बसला आहे. जुलियन असान्ज हे आपल्या विकिलिक्स या वेबसाईटसाठी प्रसिद्धी पावले. या वेबसाईटवर अनेक गुप्त कागदपत्रे त्यांनी उपलब्ध करून दिली आहेत. २०१६ च्या निवडणूक मोहिमेदरम्यान असान्ज यांनी काही इमेल्स प्रसिद्ध केल्या व डेमोक्रॅट उमेदवार हिलरी क्लिन्टन यांच्यातर्फे पक्षाचे दुसरे उमेदवार  बर्नी सॕण्डर्स जिंकू नयेत म्हणून केलेल्या कारस्थानांची कथा चांगलीच गाजली आणि हिलरींच्या लोकप्रियतेला खिंडार पाडून गेली. असान्ज यांना काही देशांनी आश्रय दिल्यामुळे तेही ब्रिटन व अमेरिकेच्या ताब्यात आलेले नाहीत. 


आज या दोन व्यक्तींची आठवण येण्याचे कारण काय? तर २०१३ साली श्री ट्रम्प यांनी एक ट्वीट केले होते. ते असे.


"Obamacare is a disaster and Snowden is a spy who should be executed - but it it and he could reveal Obama's records,I might become a major fan.

4.18-31 Oct 13. Twitter 


(ओबामा यांचा आरोग्य वीमा योजनेचा बोर्‍या वाजला आहे. स्नोडेन हा हेर आहे आणि त्याला खरे तर फाशीच दिली जावी. पण तो जर का ओबामांचा पडदाफाश करणार असेल तर मी त्याचा चाहता होईन. 

४.१८. ३१ ऑक्टो.२०१३ ट्वीटर)


२०१३ साली ट्रम्प उमेदवार नव्हते. तरीही त्यांनी केलेल्या या विधानाला आज महत्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीच्या ऐन धामधुमीमध्ये अचानक ट्रम्प यांच्या या ट्वीटकडे काही जण लक्ष वेधत असून वेळ आलीच तर ट्रम्प स्नोडेन या अमेरिकन नागरिकाला अध्यक्षाच्या खास अधिकाराचा वापर करून त्याच्या वरील गुन्हे व शिक्षा यातून पूर्ण माफी देऊन (काही अटींसहित) त्याचा स्वदेशी येण्याचा मार्ग खुला करून देतील काय अशी शंका काहीजण बोलून दाखवत आहेत. अर्थात याचे मोल म्हणून स्नोडेन यांच्याकडे उपलब्ध असलेल्या डेमोक्रॅटस् विरोधातील पुराव्यांना उजेडात आणण्याच्या हमीवर हे केले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच असान्ज यांच्याकडूनही असेच काही गौप्यस्फोट होतील अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असान्ज हे अमेरिकन नागरिक नाहीत त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकारचा फायदा ट्रम्प देऊ शकतील यावर विस्तृत वाचायला मिळाले नाही. परंतु एक बाब मात्र खरी की असे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रश्न एवढाच उरतो की असान्ज व स्नोडेन यांना डाव्या हाताने मदत करणारे पुतिन याच्या बदल्यात काय किंमत मागतील!!! यावर अशी एक शक्यता आहे की आज अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या व्हिक्टर बट्टला पुनश्च रशियाच्या स्वाधीन करण्याच्या बोलीवर असा सौदा होऊ शकतो काय? असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु निवडणुकीच्या ऐन उंबरठ्यावर ट्रम्प असा निर्णय जाहीर करणार नाहीत असे मला वाटते. बट्टवरील गंभीर आरोप पाहता असे करणे त्यांना नुकसानदायक होऊ शकते परंतु निवडून आलेच तर मात्र असा निर्णय ते तडीस नेतील या आश्वासनावर रशियाने विसंबायचे ठरवले तर हे दोन गौप्यस्फोट होण्याची शक्यता अधिकच बळावेल. 

याही पेक्षा अधिक मोठे गौप्यस्फोट अपेक्षित आहेत. काही झाले तरी निवडणुकीत आज काही हिलरी या ट्रम्प यांच्या विरोधक नाहीत.  त्यामुळे हिलरी वा ओबामा यांच्या विरोधातील स्टोरीसाठी ट्रम्प असे पाऊल उचलतील अशी शक्यता नाही पण जो बायडेन वा कमला हॅरिस आणि चीनच्या कम्युनिस्ट पार्टी यांच्यातील आर्थिक बाबीसह अन्य "सहकार्या"वर जर का असा प्रकाश टाकता आला तर त्याचे ते स्वागत करतील. असे करून चीनची नाराजी रशिया कितपत ओढवून घेईल हाही एक प्रश्न असून ट्रम्पना मदत होईल इतपतच (म्हणजे चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या हितसंबंधांना धक्का न लावता) गौप्यस्फोट करण्यास अनुमती देण्याचे पाऊल अशक्य नाही. 


तेव्हा आता प्रतीक्षा आहे ती पुढच्या २०-२२ दिवसांची. त्यातच अध्यक्षीय वादफेर्‍या रद्द होण्याची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारच्या रहस्यांना अधिक वाव मिळेल हेही खरे. हातावर हात ठेवून घडी घालून काय होते त्यावर लक्ष ठेवणे आपल्या हाती आहे. याच २०-२२ दिवसात चीन अडचणीत येत आहे अशी परिस्थिती आली तर भारतही काय पुढाकार घेईल याकडे लक्ष आहे. अध्यक्षीय बदलाचे हे दोन अडीच महिने मोलाचे असतात. त्याचा वापर कसा करायचा हे आपल्या हाती आहे. अपेक्षापूर्ती होणार की नाही हे लवकरच कळेल. 





Wednesday 30 September 2020

सुदूर पूर्वेचा सूर्योदय भारताच्या पथ्यावर



 


सोबतच्या नकाशामध्ये ऑस्ट्रेलिया खंडाच्या आसपास असलेली अनेक छोटी छोटी बेटे दाखवली आहेत. नकाशामध्ये बिंदुस्वरूप असणाऱ्या या बेटांवर लिहिण्यासारखे काय आहे असा प्रश्न साहजिकच पल्या मनात येईल. एक तर भारतापासून लांब असलेली ही बेटे - त्यातून त्यांचा आकार अगदीच मामुली - अशा बेटांबद्दल काय मुद्दा असणार आहे? एक प्रकारे हे खरे आहे. दक्षिण पॅसिफिक महासागरामधल्या या अनेक बेटांवर भारताची साधी वकिलात सुद्धा नाही. फिजी बेटाचा अपवाद वगळता भारताच्या माध्यमांमधून या बेटांची नावे देखील आपल्याला सहसा ऐकू येत नाहीत. - फिजीचे नाव देखील आपण ऐकले आहे कारण इथे मोठ्या प्रमाणावर भारतीय वंशाचे लोक राहतात आणि त्यांनी भारताशी आपले भावनिक नाते आजवर जपले आहे. श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या पंतप्रधान होत्या ज्यांनी फिजी बेटांना १९८१ साली भेट दिली होती. १९८१ नंतर श्री नरेंद्र मोदी यांनी बेटाला भेट दिली ती नोव्हेंबर २०१४ मध्ये म्हणजे सत्तारूढ झाल्याबरोबर केवळ पाच महिन्यांमध्ये. मध्यंतरीच्या वर्षांमध्ये पंतप्रधान पातळीवर बेटाला भेट देणारे कोणीही नव्हते. मग श्री मोदींनीच फिजी बेटाची निवड का केली असावी आणि ती देखील सत्ता हाती घेताच केवळ पाच महिन्यात  असा प्रश्न पडतो. फिजीमध्ये मोदींचे मित्रवर्य श्री बेनिरामन सत्तारूढ असल्यामुळे मोदी तिथे गेले असावेत असे आपल्याला वाटू शकते पण प्रत्यक्षात वैयक्तिक मैत्रीखेरीज अन्य कारणेही प्रबळ होती हे थोडेसे वाचन करताच आपल्या लक्षात येईल.

किरिबाती तुवालू नाऊरू  वनुआतू सॉलोमन कूक सामोआ टोंगा पापवा न्यू गिनी  पालाउ मार्शल बेटे मायक्रोनेशिया आदी बेटे दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये विराजमान आहेत - त्यांच्याशी कोणी भारतीय सत्ताधीश संपर्क ठेवून आहे ही बाब खरोखरच आपल्या साठी नवी आहे. पण मोदींनी मात्र २०१४ नंतर यासाठी अनेक प्रयास केले आहेत. त्यांच्या २०१४ च्या भेटीमध्ये मोदींनी फोरम फॉर इंडिया पॅसिफिक कोऑपरेशन या संस्थेची स्थापना केली.  २०१५ मध्ये संस्थेतर्फे मोदींनी त्यांची परिषद आयोजित केली आणि १४ बेटांनी आपले प्रतिनिधी तिथे पाठवले होते. भारताशी उत्तम संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे देश उत्सुक असल्याचे यातून स्पष्ट झाले. २०१६ मध्ये राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी न्यू झीलंड तसेच पापवा न्यू गिनीला भेट दिली होती. ही सर्वोच्च पातळीवरची पहिली भेट होती. पापवा न्यू गिनी हे राष्ट्र अलिप्त राष्ट्र चळवळीमध्ये सहभागी होत असे आणि त्यांची घटना भारताच्या घटनेशी जुळती मिळती आहे. भारताने या द्वीप समुदायाशी संबंध स्थापन करताना सौर ऊर्जा ह्या क्षेत्राचाही आधार घेतला आहे.

२०१४ मध्ये मोदी सरकार दिल्लीत येईपर्यंत भारताने जगभरच्या महासागरांचा आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वा परराष्ट्र संबंध राखण्याच्या दृष्टीने  फारसा  विचार केला नव्हता. दक्षिण पॅसिफिक महासागरातील या बेटांचे अनन्यसाधारण महत्व आजवर अमेरिका ऑस्ट्रेलिया जपान आदींनी ओळखले होते तसेच ते चीननेही ओळखले होते. मोदींनी या बेटांशी संबंध वृद्धिंगत करण्याचा निर्णय घेऊन एक मोठे पाऊल उचलले आहे. या बेटांचे भौगोलिक स्थान बघता भारताचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे आलेल्या चीनच्या प्रभावाला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रचंड महत्व आहे. चीनच्या महासागरातील माल वाहतुकीवर टेहळणी करण्यासाठी आणि वेळ पडलीच त्याला अटकाव करण्यासाठीही ही बेटे खास महत्वाची आहेत. याखेरीज आपल्या तंत्रज्ञानातील प्रयोगांसाठीही ही भूमी महत्वाची आहे. उदा. उपग्रहांवर देखरेख ठेवण्याचे काम फिजी मधून उत्तमरीत्या केले जाऊ शकते. भारताचा जो  मंगलयान प्रकल्प होता त्याचे नियंत्रण भारत फिजी बेटामधून करत होता. फिजी बेटाखेरीज या महासागरामध्ये दोन जहाजे तैनात करण्यात आली होती ज्यांच्या साहाय्याने यानाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जात होता. भविष्यामध्ये जर उपग्रह सोडण्याच्या जागतिक व्यापारामध्ये पदार्पण करण्याचे भारताने ठरवले तर त्यासाठी फिजी बेटे हे एक महत्वाचे स्थान असेल. म्हणजेच इसरोचे एक महत्वाचे स्टेशन म्हणून फिजी बेटाचा आपल्याला उपयोग आहे. या द्वीप समुदायामध्ये अगणित खनिज संपत्ती तर आहेच शिवाय त्यांच्यामधल्या समुद्रामध्ये काय काय दडले आहे याचे पूर्णतः संशोधन आजवर झालेले नाही. भारताने ब्लू वॉटर ट्रेडिंग चे उद्दिष्ट ठेवले आहे आणि त्यामध्ये या बेटांचे अनन्यसाधारण महत्व असणार आहे. 

हेच सर्व फायदे चीनलाही कळतात आणि चीनने तिथे प्रवेश मिळवण्यासाठी पैशाच्या थैल्या सैल सोडल्या आहेत. अर्थातच भारताकडे चीन इतका पैसे तिथे ओतण्यासाठी नाही परंतु भारताबद्दल या बेटांना जो विश्वास आज वाटत आहे तसा विश्वास चीनबद्दल वाटणे दुरापास्त झाले आहे. चीन आणि फिलिपाइन्स यांच्यामधील सागरी सीमांचा वाद - आंतरराष्ट्रीय कोर्टाने फिलिपाईन्सच्या बाजूने दिलेला निर्णय आणि चीनने तो निर्णय पाळण्यास दिलेला नकार याची धोक्याची घंटा सगळे ओळखतात. आज चीनची दुष्कीर्ती तो देत असलेल्या कर्जामुळे झाली आहे. कारण चीन पैसे देत नाही तर कर्जाचे सापळे लावतो आणि मग सव्याज परतफेड करता आली नाही की जमीन उकळतो हा अनुभव सगळ्यांनाच नकोस झाला आहे. ह्या पार्श्वभूमीवर युनोचे नियम पाळणारा भारत त्यांना जवळचा वाटतो आणि त्याच्याशी होता असलेला आर्थिक व्यवहार जाचक ठरत नाही. या कारणामुळे ही बेटे आज भारताशी सख्य करू पाहत आहेत. चीन साठी दुसरी अडचण अशी की यामधल्या काही बेटांचे आणि तैवानचे राजनैतिक संबंध आहेत. अशा बेटांचे व चीनचे जुळणे अशक्य आहे. पण भारताला अशी काहीच अडचण भासत नाही. उदा चीनने १४ पैकी ८ बेटांमध्ये आपली वकिलात थाटली आहे. 

२०१८ सालाची नाऊरू बेटाच्या पंतप्रधानांसोबत दिल्ली येथील भेट अशीच उल्लेखनीय होती. असेच महत्व तुवालू बेटाला मोदींनी दिले आहे. चीनने वनुआतू बेटाला आपला लष्करी तळ त्यांच्या किनाऱ्यावर बनवण्यासाठी प्रस्तव दिला होता. पण पूर्ण विचारांती वनुआतू ने प्रस्तावाला नकार कळवला हे विशेष. 

युनोच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला कायमस्वरूपी सभासदाचे स्थान मिळावे म्हणून भारत जे प्रयत्न करतो त्याला या बेटांनी पाठिंबा दिला आहे. याचे कारण उघड आहे. दक्षिण चिनी समुद्र आणि दक्षिण पॅसिफिक महासागर यामधील संरक्षणाच्या प्रश्नाबाबत ही बेटे अतिशय सावध आहेत. आज चीन तैवान वर हल्ला करेल या शक्यतेपोटी जपान ऑस्ट्रेलिया आदी देश एकत्र आले आहेत व त्यांनी क्वाडची स्थापना केली आहे त्या पार्श्वभूमीवर क्वाडला  या बेटांचे सहकार्य अमूल्य ठरणार आहे. एकीकडे भारतावर लडाख पासून अरुणाचल पर्यंत चीनने आपले सैन्य उभे करून व कुरापती  काढून एक युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली आहे तिथे बघता चीनचे नाक अन्यत्र दाबण्याचे प्रयोजन केवळ भारतालाच नव्हे तर क्वाड साठी  ही महत्वाचे  झाले आहे. २०१४ साली सत्ता हाती घेतल्यापासून मोदींनी दूरदृष्टी ठेवून जी नाती प्रस्थापित केली त्याचे महत्व आज आपल्याला कळू शकते. 

एकंदरीत चीन विरोधातील जागतिक परिस्थितीमध्ये अशा छोट्या मोठ्या सर्वांचे सहकार्य मोलाचा वाटा उचलू शकते. म्हणूनच मोदींच्या धोरणाचे कौतुक करावे लागते. सुदूर पूर्वेकडील ही मालिका म्हणजे केवळ भटकंती व मुशाफिरी नसून मुलुखगिरी ठरणार का असा प्रश्न आपल्याला जरूर पडतो. जसजसे चीनचे नाट्य रंगत जाईल तसतसे यातील मोदींच्या दूरदृष्टीचे दर्शन आपल्याला घडणार आहे हे निश्चित. 











Sunday 27 September 2020

पॅनगॉन्गच्या तळ्यात की मळ्यात?

 




 




१० सप्टेंबर रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीच्या दरम्यान रशियाच्या पुढाकाराने भारत व चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची स्वतंत्र बैठक झाली. त्यामध्ये दोन्ही देशांतर्फे एक संयुक्त निवेदनही देण्यात आले. यानंतर चीन आपल्या बोलण्यानुसार प्रत्यक्षात रणभूमीवर वर्तन ठेवतो की नाही याकडे सगळ्यांचे बारकाईने लक्ष होते. यानंतर २१ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा लष्करी अधिकार्‍यांची बैठक झाली त्यामध्ये परराष्ट्र खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. इतके होऊनही चीनच्या मनामध्ये नेमके काय आहे - त्याला हा संघर्ष अधिक पेटवण्यात रस आहे की आवरते घेण्यामध्ये या कोड्याची उकल करण्यात भारतामधले तज्ञ गुंतले असून त्यासाठी अनेक दाखले दिले जात आहेत. २१ तारखेच्या बैठकीनंतर दोन्ही देशांद्वारे सध्या उपस्थित असलेल्या सैन्याच्या संख्येमध्ये व तयारीमध्ये आणखी वाढ केली जाऊ नये असा निर्णय झाला असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच रणभूमीवरील परिस्थिती जैसे थे ठेवावी आणि अधिक चिघळू नये म्हणून काळजी घेतली जावी असेही जाहीर करण्यात आले आहे.

इतके होऊनही चीनच्या हेतूंविषयी शंका आहेत आणि उरतात. याला अर्थातच कारणीभूत आहे ते चीनचे प्रत्यक्ष वर्तन - त्याच्या विविध सरकारी निमसरकारी वा अन्य आस्थापनांद्वारे देण्यात येणारी निवेदने तसेच चीनचे भारतामधले हस्तक यांची विधाने लेख निवेदने इत्यादिमुळे चित्र स्पष्ट होत नसून त्यामधील धूसरता वाढत आहे. किंबहुना चीनलाही अशी धूसरता हवीच आहे की काय अशी शंका येण्याइतपत हे प्रयत्न होताना दिसतात. दि. २६ सप्टेंबर रोजी भारताचे परराष्टमंत्री श्री. जयशंकर यांनी टाईम्स नाऊ या सुप्रसिद्ध वाहिनीला दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीमध्ये सध्याच्या संघर्षमय काळात चीनकडून Mind Games म्हणजे मनोवैज्ञानिक  दबावतंत्राचा वापर होत असल्याचे ठासून सांगितले आहे. तेव्हा चीनला अशी धूसरता हवी आहे कारण त्याला ती फायद्याची वाटत असावी असा निष्कर्ष यातून काढला जाऊ शकतो.

खरे तर वाटाघाटीच्या टेबलावर एक भूमिका घ्यायची पण जाहीररीत्या मात्र आक्रमक भूमिका घेण्याचे चीनचे तंत्र सर्वविदित आहे. त्यामुळे चीनच्या सर्वच जाहीर विधानांचे शवविच्छेदन करावे लागते. यापैकी दोन ठिकाणच्या विधानांचा मी आज समाचार घेत आहे. सप्टेंबर ११ रोजी चीनचे मुखपत्र ग्लोबल टाईम्समध्ये त्याचे संपादक हु शीजिन यांनी जो लेख लिहिला आहे त्याने तज्ञमंडळींच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. हु शीजिन म्हणतात की चीनच्या जनतेने आपल्या हितासाठी छेडल्या जाणार्‍या युद्धाला अत्यंत धैर्याने व संयमाने सामोरे जावे आणि त्याची जी असेल ती किंमत चुकती करण्याची तयारी ठेवावी. या विधानाचा अर्थ स्पष्ट आहे की चीन सरकारने आपल्या जनतेच्या मनोनिग्रहासाठी प्रचारयंत्रणा राबवण्याचे ठरवले आहे. अर्थात एका बाजूला अशी युद्धाची तयारी तर करायची पण युद्ध छेडल्याचा ठपका मात्र आपल्यावर यायला नको!!  म्हणून सारवासारव करताना हु शीजिन म्हणतात की जनतेची अशी दृढ तयारी असल्याचे दिसले तर बाहेरील जग युद्ध टाळण्यासाठी आपल्याला मदत करू शकेल. आपण नैतिकतेच्या बाजूचे आहोत हे जनतेला पटवणे चीनमध्ये अत्यंत महत्वाचे मानले जाते. असे युद्ध लढण्यासाठी जनता पाठीशी उभी राहू शकते हे जाणून हु पुढे म्हणतात की "केवळ छेडायचे म्हणून युद्ध खेळले जाऊ नये. त्यात उतरलोच तर जिंकायची तयारी करूनच आपण सुरूवात केली पाहिजे. एक तर शत्रूचा पाडाव करता आला पाहिजे आणि दुसरे म्हणजे आपण जगामधले सर्वाधिक शक्तिमान राष्ट्र आहोत त्यामुळे नैतिकता सांभाळण्याकरिता या युद्धामध्ये पडलो अशी आपल्या मनाची खात्री पटली पाहिजे." 

चीनबद्दल आपण पहिल्यांदाच काही वाचत असलो तर अशा प्रकारच्या लिखाणाला आपणही दाद दिली असती. पण हु शीजिन जे लिहितात त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो हे सवयीनुसार कळते.. मग हु काय म्हणू बघत आहेत बरे? या सभ्य शब्दांच्या बुरख्याआड राहून त्यांना असे म्हणायचे आहे की (प्रत्यक्षात युद्धाला प्रारंभ आपण केला तरी) युद्धाची सुरूवात मात्र चीनने केली नाही - ते त्याच्यावर लादले गेले आहे  असे चित्र उभे राहिले पाहिजे. हु पुढे म्हणतात की "आमच्याशी सीमावाद असणार्‍या राष्ट्रांसोबत असो की चीनच्या किनार्‍याला लागूनच्या समुद्रात अमेरिकेबरोबरचे युद्ध असो यामध्ये चीनच जिंकण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण आपण केवळ प्रतिकार करायचा झटका यावा तसे नव्हे तर पूर्ण तयारीनिशी युद्धात उतरत असतो. एखाद्या छोट्या राष्ट्राला दबवण्यासाठी नव्हे तर परिस्थितीने युद्धाखेरीज अन्य पर्याय ठेवला नाही म्हणून आपण युद्धामध्ये पडलो हे स्पष्ट व्हायला हवे."

अत्यंत निरुपद्रवी वाटणार्‍या या शब्दांच्या आड चीनच्या युद्धखोरीची खुमखुमी कशी दडली आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. ११ सप्टेंबरच्या या लेखाखेरीज १० सप्टेंबर रोजीच ग्लोबल टाईम्सने केलेल्या एका ट्वीटने तर कोणाचीही झोप उडावी अशी विधाने केलेली दिसतात. काय म्हटले आहे या ट्वीटमध्ये? “If India wants peace, China and India should uphold the Line of Actual Control of November 7 1959. If India wants war, China will oblige. Let’s see which country can outlast the other” भारताला जर सीमेवर शांतता हवी असेल तर चीन व भारताने ७ नोव्हेंबर १९५९ रोजीची प्रत्यक्ष ताबा रेषा अंतीम मानणे आवश्यक आहे. भारताला युद्धच हवे असेल तर मात्र चीनचीही तयारी आहेच. बघू या कोणता देश दुसर्‍याला पुरून उरतो ते!"

हे एक अत्यंत खळबळजनक विधान आहे. याचा इनकार चीनच्या अधिकृत आस्थापनामधून झालेला नाही. यामध्ये ग्लोबल टाईम्सने यापूर्वी झालेल्या सर्व समझौते व करारावर पाणी फिरवले असून चीन आता थेट १९५९ च्या परिस्थितीचा दाखला देत तीच आम्ही मानत असलेली सीमा आहे असे बिनदिक्कत सांगत आहे. असेच जर का असेल तर मग बोलणी तरी करण्याची काय आवश्यकता आहे? हे विधान वाचून जर तुमच्या अंगाचा तिळपापड झाला असेल तर त्याआधी १९५९ ची प्रत्यक्ष ताबा रेषा म्हणजे काय हे जरा समजून घेतले पाहिजे. 

१९५० च्या दशकामध्ये चीनने पूर्ण योजनेनुसार अक्साईचीनमध्ये प्रवेश केला आणि भारताचा हा भाग गिळंकृत केला. यानंतर जानेवारी १९५९ मध्ये चीनचे परराष्टमंत्री श्री चाऊ एन लाय यांनी भारताचे पंतप्रधान श्री नेहरू यांना पत्र लिहून असे कळवले की आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून आम्ही पूर्वेकडे मॅकमहॉन लाईनला मान्यता देत नाही तसेच पश्चिमेला कुनलुन सीमाही आम्ही मानत नाही. किंबहुना भारत चीन संपूर्ण सीमारेषेच्या प्रश्नावर आपण चर्चेसाठी तयार आहोत. चाऊ यांनी त्यामध्ये असेही लिहिले होते की मॅकमहॉन लाईन ही वसाहतवादी सत्ताधीशांनी बनवली - आखली सबब आम्ही ती मानत नाही. असे शेखी मिरवत आज चीन भारताला सांगत असला तरी चीनने ही सीमारेषा म्यानमारसोबत केलेल्या करारामध्ये मात्र (अन्य नावाने) मानली आहे. पण भारताशी मात्र तो या सीमारेषेवर वाद उकरून काढू बघत आहे. पुढे १९६० साली चाऊ दिल्ली येथे आले असता जर भारताने पश्चिमेकडे अक्साई चीनमध्ये केलेल्या घुसखोरीला मान्यता दिली तर पूर्वेकडे आपण मॅकमहॉन लाईन आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून मानायला तयार होऊ असे सूचित केल्याचे भारताचे माजी परराष्ट्र सचीव व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री शिवशंकर मेनन यांनी आपल्या पुस्तकामध्ये नमूद केले आहे. चाऊ यांच्या विधानाने देशामध्ये एकच खळबळ तेव्हा माजली होती आणि जनतेची संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. एकंदरीत चीन हात पिरगळून आपल्याकडून जबरदस्तीने अक्साई चीनचा ताबा काढून घेत आहे हे उघड झाले होते. आणि हे भारताने मान्य करावे म्हणून पूर्वेकडे मॅकमहॉन लाईन मान्य करण्याचे गाजरही दाखवले जात होते. यानंतर दोनच महिन्यात म्हणजे मार्च १९५९ मध्ये भारताने तिबेटचे धर्मगुरू श्री दलाई लामा यांना भारतामध्ये राजाश्रय दिला. यामुळे तर भारत तिबेट हा चीनचा अविभाज्य हिस्सा असल्याचे मानणार नाही अशी चीनची खात्री झाली. तसेच अशा कारवायांच्यासाठी अमेरिका भारताच्या बाजूने ठामपणे उभी असल्याचाही चीनचा समज झाला होता. या पार्श्वभूमीवर चीनने १९६२ मध्ये भारतावर हल्ला केला हा इतिहास आहे. 

तेव्हा आज जेव्हा ग्लोबल टाईम्स १९५९ च्या सीमारेषेचा दाखला पुनश्च उकरून काढत आहे तेव्हा या स्मृती जाग्या होणे स्वाभाविक आहे. आज जर चीन पुनश्च असा इशारा देत असेल तर त्याचा निर्देश अर्थातच अक्साई चीनकडे आहे हे उघड आहे. 

याअगोदरच्या माझ्या लेखांमध्ये मी असे म्हटले होते की भारत पाकव्याप्त काश्मिरच नव्हे तर अक्साई चीन आणि पाकिस्तानने १९६३ मध्ये चीनला बहाल केलेले शक्सगम खोरे सुद्धा पुन्हा बळकावू पाहत आहे असा समज झाल्यामुळेच आज चीन चवताळला आहे. कोरोना साथीमुळे जगभर छीथू झाल्यामुळे कमकुवत बाजू असलेल्या चीनला खिंडीत गाठून मोदी सरकार हे तीन प्रदेश आपल्या हातून हिसकावून घेणार या धास्तीने चीनला पछाडले आहे. याची तयारी मोदी सरकारने कलम ३७० व ३५अ रद्दबातल करून केलेली होतीच शिवाय आज १९५९ च्याच जागतिक परिस्थितीनुसार अमेरिकाही चीनसमोर शड्डू ठोकून उभी आहे. म्हणजेच १९५९ चीच परिस्थिती थोड्याफार फरकाने अस्तित्वात आली असल्याचे चीन सरकारचे याबाबतीमधले आकलन असावे. श्री अमित शहा यांनी संसदेच्या व्यासपीठावरून निःसंदेह घोषित केल्याप्रमाणेच शक्सगम खोरेच नव्हे तर पाकव्याप्त काश्मिर व अक्साई चीन जर भारताच्या खरोखरच ताब्यात गेला तर मात्र या प्रदेशातील भूराजकीय समतोल आपल्या पूर्णतया विरोधात जाईल अशी चीनला सुप्त भीती आहे. कारण ही भूमी हातातून गेली तर अत्यंत प्रतिष्ठेचा मानला गेलेला त्याचा सीपेक हा प्रकल्पच बुडीत खाती जमा होईल. इतकेच नव्हे तर पाकव्याप्त काश्मिराच्या सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या वाखान कॉरीडॉरपर्यंत भारताची सीमा जाऊन भिडणार म्हणजेच भारताला मात्र अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करण्याचा आणि पुढे थेट मध्य आशियापर्यंत पोचण्याचा खुष्कीचा मार्ग मोकळा होणार ही चीनची पोटदुखीच आहे असे नाही त्या शक्यतेने त्याच्या पोटामध्ये गोळा उठला आहे. म्हणूनच आजसुद्धा चीन ग्लोबल टाईम्सला पुढे करून त्याच १९५९ च्या सीमारेषेच्या बाता करत आहे.

ही सर्व चिन्हे ठीक नाहीत हे शेंबडे पोरही सांगेल. एकीकडे वाटाघाटीला बसल्यावर एप्रिलपासून जी घुसखोरी त्याने केली आहे तिथून माघार घ्यायची की नाही यावर चर्वितचर्वण करण्याचे नाटक वठवायचे आणि दुसरीकडे १९५९ च्या धमक्या द्यायच्या याच अर्थ न समजणारे मूर्ख सत्ताधारी आज दिल्लीमध्ये बसलेले नाहीत. चीनचे हस्तक खाजगी बैठकांमध्ये काय बोलतात यावर चीन सरकार जर मोदी सरकारचे मोजमाप घेऊ पाहत असेल तर ते स्वतःच शी जिनपिन्गसकट जगामधले एक अत्यंत मूर्ख सरकार आहे यावर शिकामोर्तब करण्यासाठी धावत सुटले आहे असे म्हणता येईल तेव्हा वेळीच सावध होऊन पवित्रा बदलला गेला नाही तर त्याच्या कपाळी कपाळमोक्ष लिहिला जाईल हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. अर्थात मिचमिचे डोळे उघडायचे कष्ट घेतले तर तो प्रकाश डोळ्यातून मेंदूपर्यंत जाईल. अन्यथा चीनच्या डोळ्यासमोरची काळोखी न मिटणारी ठरेल. मग पॅनगॉन्गचे तळे कुठे आणि आसपासचे मळे कुठे हे शोधू म्हटले तरी हकालपट्टी झाल्यावर शोधता येणार नाही हे स्पष्ट आहे. 





आफ्रिका गाथा



२२ सप्टेंबर २०२० रोजी भारत आफ्रिका सहकार्य या विषयावर एक डिजिटल परिषद घेण्यात आली होती. त्या निमित्ताने भारताचे परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर यांनी परिषदेतील उपस्थितांना  संबोधित करताना आपल्या भाषणामधून एक महत्वाचा संदेश दिला आहे. आफ्रिका खंडातील देशांच्या प्रगतीला हातभार लावला नाही तर व्यापक जागतिक विकासाचे उद्दिष्ट अपूर्ण राहील असे प्रतिपादन जयशंकर यांनी केले आहे. याप्रसंगी त्यांनी नोंदवलेली मते ही मोदी सरकारच्या दूरगामी विचारांचे प्रतिबिंब असल्यामुळे त्याची सखोल दखल घेणे गरजेचे आहे.


२०२० वर्षातील कोरोना संकटाचा उल्लेख करत श्री. जयशंकर म्हणाले की १९५०-६० च्या दशकामध्ये जेव्हा वसाहतवाद संपुष्टात आला तेव्हा जागतिक परिस्थितीवर जसा त्या घटनांचा खोलवर ठसा उमटला होता तसाच खोलवर ठसा कोरोनाच्या साथीमुळे जगावर उमटलेला बघायला मिळणार आहे. दुसर्‍या महायुद्धातून डोके वर काढणारे जग आणि या साथीच्या संकटामधून डोके वर काढणारे जग याची तुलना करून जयशंकर यांनी एक वेगळीच तार छेडली आहे. दुसर्‍या महायुद्धाने जसे देशोदेशीच्या जनतेचे नाहक प्राण घेतले तसेच कोरोनाच्या साथीमध्ये कोणतीही चूक नसताना लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या महायुद्धाचा परिणाम म्हणून १९ व्या शतकापासून जगाच्या वेगवेगळ्य़ा भागांमध्ये वसाहती निर्माण करून त्यावर राज्य चालवणार्‍या शक्ती दुबळ्या झाल्या - त्यांचे आर्थिक साम्राज्य संपुष्टात आले तसेच त्यांचा राजकीय प्रभाव सुद्धा अस्ताला गेला होता. अशा वसाहती चालवणार्‍या ब्रिटन फ्रान्स पोर्तुगाल स्पेन आदि देशांना महायुद्धाचा असा फटका बसला की आपल्या वसाहतीवरील नियंत्रण स्वतःहून सोडण्याची पाळी त्यांच्यावर आली होती. आजच्या घडीला जगामध्ये १९ व्या शतकातील वसाहतवाद दिसत नसला तरी खास करून चीनने गेल्या दोन दशकामध्ये ज्या पद्धतीने आपले आर्थिक व राजकीय धोरण पुढे रेटले आहे त्यातून वसाहतवादी देशांची मानसिकता पुन्हा एकदा जगाला अनुभवायला मिळाली होती. 


वसाहतवाद म्हणजे काय? आधुनिक शस्त्रास्त्रे आणि युद्धशास्त्राच्या बळावरती या देशांनी खंडोपखंडामध्ये आपले साम्राज्य प्रस्थापित केले आणि विस्तारले होते. त्यांच्याकडून कच्चा माल कमी किंमतीला आपल्या देशात नेऊन त्यावर प्रक्रिया करून भरमसाठ दराने तोच माल पुन्हा वसाहतींमध्ये विकायचा आणि त्यातून आपल्या गुलामीमध्ये राहणार्‍या देशामधली अमाप संपत्ती लुटून स्वदेशामध्ये न्यायची असा हा व्यवहार होता. असे म्हटले जाते की आज मूल्यमापन करायचे म्हटले तर ब्रिटनने भारतामधून लुटून नेलेल्या संपतीचा आकडा ७५ लाख कोटींच्या घरामध्ये जातो. अशाप्रकारे आपल्या वसाहतीमधून संपतीची लूटमार करून त्या देशांना नागवून पूर्णपणे निर्धन करून मग स्वातंत्र्य देण्याचे निर्णय याच महासत्तांना युद्धातील नुकसानीमुळे घेण्याची नामुश्की आली होती. मग आज जयशंकर यांना दुसर्‍या महायुद्धाची त्यावेळच्या वसाहतवादी देशांची आठवण का बरे यावी?


कारण ज्या मार्गाने वसाहतवादी देश गेले होते त्याच मार्गाने जाणार्‍या चीनने संपूर्ण जगावर हे महामारीचे संकट तर लोटलेच आहे पण त्या आधीच्या दोन दशकामध्ये जी आर्थिक पिळवणूक केली आहे त्यातून हे साम्य शोधण्याचा प्रयत्न जयशंकर यांनी केला असावा. चीनच्या राक्षसी महत्वाकांक्षा केवळ एखाद्या खंडापुरत्या सीमित राहिल्या नव्हत्या. मागासलेल्या आफ्रिकेलाही चीनने वरकरणी आकर्षक वाटतील असे प्रस्ताव गेल्या दोन दशकांमध्ये दिले होते. विकासाचे स्वप्न दाखवत प्रत्यक्षात मात्र कर्जाच्या सापळ्यामध्ये या दुबळ्या देशांना पकडायचे आणि त्याची परतफेड म्हणून त्यांच्याकडून भूमी उकळायची असा व्यवहार चीनने सर्वत्र केलेला दिसतो आणि त्याला आफ्रिकेतील देशही अपवाद नाहीत. आफ्रिका खंडाकडे आजही खूप मोठ्या प्रमाणावर खनिज व अन्य नैसर्गिक संपत्ती उपलब्ध असून त्यावर चीनने आपले लक्ष केंद्रित केले होते. कोरोनाच्या निमित्ताने चीनच्या या मुजोर वागण्याचा पुनर्विचार सर्व जगाला करावा लागत आहे. आणि केवळ आर्थिक सुबत्तेच्या बळावर जगामध्ये आपले प्रस्थ प्रस्थापित करण्याचे त्याचे प्रयत्न आता उघडे पडले आहेत. बळी तो कान पिळी हा जगाचा न्याय असला तरीही त्यामध्ये भरडला जाणारा नवे पर्याय शोधतो आणि तीच परिस्थिती आज चीनने आपल्या सहकारी देशांवर आणली आहे. 


अशा पार्श्वभूमीवर जेव्हा जयशंकर आफ्रिकन देशांना सहकार्य - व्यापार - परस्परातील सौहार्द आणि परस्परांचा विकास या मुद्द्यावर भारत आफ्रिकन देशांशी संबंध प्रस्थापित करू पाहत आहे असे म्हणतात त्याला विशेष महत्व येते. आफ्रिकेचा विकास आणि उदय ही आमच्यासाठी एक केवळ हवीशी वाटणारी बाब नसून ती आमच्या परराष्ट्रधोरणाचा कणा आहे असे निःसंदिग्धपणे त्यांनी सांगितले. त्याचा संदर्भ अर्थातच चीनच्या अन्य देशांशी वागण्याच्या पद्धतीशी होता. २०१५ पासून एकूण ३४ उच्चस्तरीय भेटी भारताने आयोजित केल्या होत्या. यामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान पातळीवरील भेटी गणल्या आहेत. तसेच याला प्रतिसाद म्हणून गेल्या सहा वर्षांमध्ये सुमारे १०० आफ्रिकन नेत्यांनी भारताला भेट दिली आहे. ह्यातूनच भारताने घेतलेल्या विशेष प्रयत्नांची झलक दिसून येते. कोरोना संकटाच्या काळामध्ये भारताने आफ्रिकेतील अनेक देशांना औषधे व अन्य सामग्री पाठवली आहे. याआधी ३३ आफ्रिकन देशांकडून भारतामध्ये पाठवल्या जाणार्‍या मालावरती आयातशुल्क शून्य ठेवण्यात आले आहे. आफ्रिकेतील मोझांबिक आणि दक्षिण सुदान देशांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायु उत्पादन क्षेत्रामध्ये भारताने ७०० कोटी डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूकही केली आहे. जवळजवळ ५०००० आफ्रिकन विद्यार्थ्यांना भारतामध्ये तंत्रज्ञान व अन्य विषय शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०१५ साली नवी दिल्ली येथे घेतलेल्या तिसर्‍या भारत आफ्रिका परिषदेमध्ये तब्बल ५४ देशांनी भाग घेतला होता. असा उत्साह हेच दाखवतो की नवी दिल्ली येथील मोदी सरकारची दखल आफ्रिकन देशांनी घेतली व आपल्याला काहीतरी चांगले हाती पडेल  पिळवणूक न करता आपल्या विकासाचा विचार करणारा सहकारी देश मिळेल या विचाराने हे देश प्रेरित झाले होते. आज भारताच्या ३९ आफ्रिकन देशांमध्ये वकिलाती आहेत यामधल्या ९ वकिलाती तर गेल्या दोन वर्षात आम्ही सुरू केल्या आहेत असे जयशंकर म्हणाले.


"India offers Africa an honest partnership, and room to maximize its space under the sun and multiply its options. Africa is of course not without options, and by no stretch does India claim to be the only one. However, what we can promise is to be Africa’s most steadfast partner." आम्ही एक प्रामाणिक भागीदार म्हणून आफ्रिकेला आमची मैत्रीचा प्रस्ताव देत आहोत. यातून आफ्रिकन देशांना आपापल्या विकासाच्या नव्या वाटा चोखाळता याव्यात हा हेतू आहे. आम्हाला कल्पना आहे की आफिकन देशांना मदत देऊ पाहणारे आम्ही एकटेच नाही आहोत पण आम्ही जे काही देऊ करतो त्यामध्ये आफ्रिकन देशांना एक प्रामाणिक आणि दीर्घकाळचा भरवशाचा दृढ सहकारी देश मिळावा अशी आमची धारणा आहे असे जे जयशंकर यांनी सूचित केले त्याची तुलना चीनच्या विपरित व्यवहाराशी झाली नाही तरच नवल.


बदलत्या परिस्थितीचे भान राखणारा आणि चीनच्या तुलनेमध्ये एक अत्यंत मृदू चेहरा आणि वर्तणूक दाखवणारा आणि तितक्याच तंत्रज्ञानात्मक क्षमतेचा देश म्हणून आज भारत आफ्रिकेमध्ये आपले स्थान प्रस्थापित करू पाहत आहे. या सर्व विचारधारेचे एक छोटे प्रतिबिंब तर जयशंकर यांच्या भाषणामध्ये दिसतेच शिवाय भारताची विश्वासार्हता जगाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यामध्ये कशी वृद्धिंगत झाली आहे याची पावतीही मिळते. हाती उपलब्ध असलेली संधी मोदी सहसा गमावत नाहीत हेच या उदाहरणामधून दिसून येते. मोदी सरकारने जी पावले उचलली ती उचलण्यावर आधीच्या यूपीए सरकारवर कोणती बंधने होती? त्यांना कोणी अटकाव केला होता? कोणीच नाही पण भारताचे स्थान जगामध्ये उंचावण्याचा मानस ठेवून आखलेले जागतिक धोरण हा चमत्कार घडवून आणत आहे हे विशेष.